आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर कोरड्या विहिरींना फुटू शकतो पाण्याचा अखंड झरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- नदीही समृद्धीचे प्रतीक असल्याने पूर्वीपासून गावे ही नदीकाठीच वसली आहेत. तीच काळी माती जीवनदाती होऊन सर्वांसाठीच हितकारक लाभदायक ठरली. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन एकीकडे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबवून पाण्याची सोय कशी करून देता येईल, यावर भर देत असताना अचलपूर चांदूर बाजार तालुक्यातील अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांची बिकट अवस्था झाली अाहे. या बंधाऱ्यांची दुरुस्ती झाल्यास शेतकऱ्यांच्या कोरड्या पडलेल्या विहिरींना पाण्याचा झरा फुटू शकतो. त्यातून शेतकऱ्यांचे हित जपले जाऊ शकते.

अचलपूर-चांदूर बाजार मार्गावर त्रिवेणी संगम येथे असणाऱ्या पिवळ, अंबाळ, नदी जित नाला एकत्रित येतो. म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध होतो. या जमा होणाऱ्या पाण्याच्या साठ्याचा शेतीसाठी उपयोगी होईल या हेतूने जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री वसुधा देशमुख यांनी पुढाकार घेत जिल्हा परिषद लघू सिंचन विभागाच्या माध्यमातून ३० ते ३५ वर्षांपूर्वी १६ दरवाजे असणारा हा कोल्हापुरी बंधारा बांधला. या परिसरातील तोंडगाव, बेलज, कविठा, जवर्डी, घोडगाव, तळेगाव, शेकापूर येथील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली होती.

त्रिवेणी संगम येथे असणाऱ्या या बंधाऱ्यांचा लाभ ते वर्षांपर्यंत शेतकऱ्यांना चांगला झाला. मात्र, या बंधाऱ्याची स्थिती अत्यंत विदारक झाली असून, या बंधाऱ्याला लावण्यात आलेल्या पाट्या पूर्णत: बेपत्ता झाल्या असून, पाण्याच्या थेंबाचीही साठवणूक होत नसल्याने परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी घटत असून, त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

दोन नद्या एका नाल्याचा संगम असणाऱ्या या कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडवण्याची योजना कुचकामी ठरली आहे. या बंधाऱ्याची दुरुस्ती झाल्यास सिंचन क्षमता वाढून शेतकऱ्यांना सोयीचे ठरू शकते. तातडीने पाणी अडवण्याची गरज असून, या कोल्हापुरी बंधाऱ्याला केवळ दरवाजांचे संरक्षण आवश्यक आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून लाखो घनलीटर वाया गेलेले पाणी भविष्यात सुरक्षित राहू शकते. या बंधाऱ्याला केवळ दरवाज्यांची आवश्यकताच असून, अन्य खर्च मात्र नगन्य आहे, तरीसुद्धा शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.

बंधाऱ्याच्यादुरुस्तीचे काम आवश्यक : जलयुक्तशिवार, महात्मा फुले बांध बंदिस्ती विविध योजनेतून नादुरुस्त असलेले बंधारे दुरुस्त केल्या जाऊ शकते. त्याकरिता जिल्हा परिषदेने लक्ष घालणे आवश्यक आहे. सप्टेंबर महिन्यात बंधाऱ्याचे लोखंडी दरवाजे बंद झाल्यास पाण्याचा साठा उपलब्ध होऊन पुन्हा दरवाजे सुरू करता येतात. याची सोय सिंचनासाठी उपयुक्त ठरू शकते.

१५०हेक्टरमध्ये होऊ शकते सिंचनाची सोय : याकोल्हापुरी बंधाऱ्यावर केवळ दरवाजेच बसवावे लागतात. ही सोय झाल्यास या परिसरातील १० पेक्षा जास्त गावांना लाभ होऊन दीडशे हेक्टरपेक्षा जास्त शेतीची सिंचन क्षमता वाढू शकतेे.

बंधाऱ्याच्यापाट्या गेल्या चोरीला : लाखोरुपये खर्च करून निर्माण केल्या गेलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाणी अडवण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाट्या चोरी गेल्या आहेत. याकडे संबंधित विभाग ग्रामस्थांचे लक्ष नसल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे.

दोन नद्या एक नाल्याचा संगम असलेल्या बंधाऱ्याची दुरवस्था झाल्याने परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

पाण्या अभावी बागा करपल्या
सहा एकर बागायत शेती करताना पाण्याची सोय मुबलक होती. आज बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. बंधाऱ्यात पाणी नसल्याने विहिरीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.बोरवेलसुद्धा पाणी फेकत नाही. परिणामी बागायत शेती करपू लागली आहे. माणिकराव कडू, शेतकरी.

१०५ फूट खोदली विहीर; पाणी नाही
माझ्याकडे तीन एकर बागायती शेती असून, विहिरीला खोदून खोदून १०५ फूट केले, तरीसुद्धा पाण्याचा पत्ता नाही. ज्या वेळी बंधाऱ्यात पाणी अडवले जायचे, त्या वेळी मात्र विहिरीतील पाण्याची पातळी उत्तम होती. बंधाऱ्यावर पाट्या लावणे गरजेचे आहे. गणेश नांदुरकर, शेतकरी.
बातम्या आणखी आहेत...