आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Literacy Become Movement Rajendrasingh Rana

पाणी साक्षरता चळवळ व्हावी , जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भविष्यात महाराष्ट्रावर पाण्याचं मोठं संकट येणार आहे. राज्यात पाण्याचे जेवढे स्रोत आहेत, त्यावर रिअल इस्टेटवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. हे अतिक्रमण कसे होते, त्यावर ते कशा प्रकारे कब्जा करतात हे काेणालाच ठाऊक नाही. पण, हे अतिक्रमण थांबवावे लागणार आहे. याशिवाय महाराष्ट्र पाणीदार करण्यासाठी राज्यात पाणी साक्षरता चळवळ उभी करावी लागणार आहे, असे भाकीत मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जलबिरादरीचे प्रणेते जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी शुक्रवार, २२ जानेवारीला अमरावती येथे वर्तवले.

प्रभात एज्युकेशन सोसायटी, पर्यावरण स्नेही मंडळी यांच्या सहकार्याने मार्डी रोडवरील ग्रीन सर्कल येथे २२ वी विदर्भ पर्यावरण परिषदेचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या उद््घाटनासाठी राणा अमरावतीत आले होते. त्या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

पाण्याचा मुद्दा हा ग्लोबलस्तरावर चिघळत चालला आहे. पुढील जागतिक युद्ध हे कदाचित पाण्यासाठी होईल, ही शक्यता नाकारता येणार नाही. कारण पाण्यासाठी राज्यासह देशादेशांत एक संघर्ष सुरू आहे. पाण्याच्या स्रोतावर अतिक्रमण, नद्यांमध्ये वाढलेले प्रदूषण आणि पाण्याचा अति प्रमाणात उपसा यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. हीच परिस्थिती भविष्यात राज्यातही बघायला मिळेल. यासाठी राज्याला पाणीदार करण्यासाठी पाणी चळवळ राबवणे गरजेचे झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, स्वातंत्र्यानंतर पाण्यासाठी महाराष्ट्राचे काम अग्रेसर होते. एकट्या राज्यात ४० टक्के धरणे असल्यामुळे महाराष्ट्र हा प्रदेश इतर राज्यांच्या तुलनेत पाण्यासाठी सधन होता.

परंतु, असे असतानाही याच राज्यात आत्महत्येचे प्रमाणही अधिक आहे. हे असं का झालं, याचा जर विचार केला तर विकास नीतीत लालचीपणा वाढला आहे. कुठल्याही प्रकारची शिस्त शिल्लक राहिली नाही. याशिवाय पीक, पाऊस आणि जमिनीचा खोलवर अभ्यास केला नाही. ज्या ठिकाणी पावर आहे, त्याचा उपयोग केला गेला, किंबहुना त्याचा उपभोग घेण्यात आला. परिणामी, माती, पाणी आणि पर्यावरणाचे विभाजन झाल्यामुळे राज्यात आपत्तीची स्थिती निर्माण झाली असल्याची खंत राणा यांनी व्यक्त केली. या वेळी नागपूरचे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ दिलीप गोडे, धनंजय धवड, संजय सोनटक्के, मधू घारड, सुनील मुंदे मुख्य आयोजक विलास पवार आदी उपस्थित होते.
विदर्भाचं राजस्थान झालं
राज्यात मोठे प्रकल्प आहेत. परंतु, यामुळे विदर्भात एक टक्का पाणी वाढले नाही. या प्रकल्पात कोट्यवधी खर्च केले. फायदा झाला तो कंत्राटदारालाच, असा आरोप त्यांनी केला. यामुळे विदर्भाचं राजस्थान झालं. सिंचनाचा अनुशेष भरून निघालेला नाही. राज्यातील जलयुक्त शिवार हा चांगला उपक्रम आहे. भ्रष्टाचाराला थांबवण्याचा हा उत्तम प्रकार आहे. पण, भ्रष्टाचार वाढला तेव्हा पाणी चळवळीसाठी तयार राहण्याचे आवाहन त्यांनी केले. नद्यांचे पुनरुज्जीकरण होणे गरजेचे आहे. नद्यांची मॅपिंग, ओळख आणि पाण्याचे स्रोत वाढवणे गरजेचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रभात ऐज्युकेशन सोसायटी पर्यावरण स्नेही मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने २२ व्या विदर्भ पर्यावरण परिषदेचे आयोजन मार्डी रोडवरील ग्रीन सर्कल येथे करण्यात आले होते. तीन दिवस ही परिषद चालणार आहे. या परिषदेचे उदघाटन जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी ग्रीन सर्कलचे डॉ. व्ही. टी. इंगाेले, पर्यावरण तज्ज्ञ दिलीप गोडे, मुख्य आयोजक विलास पवार इतर मान्यवर.
जनजागृतीपर फलक
निसर्गाच्या सानिध्यात आहात तुम्ही बसून निसर्ग झाला नष्ट, तर जाल तुम्ही खचून...एक वृक्ष लावून पाहा, जाल तुम्ही हसून निसर्ग नाही बसणार, तुमच्यावर रुसून..कितीही पाऊस पडला तरी, धूप कमी होत नाही, तरी मानवाला वृक्ष का लावावे असे का वाटत नाही...असे पर्यावरण संवर्धन जनजागृतीपर फलक लावले होते.