आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरगव्हाणला ४८ तासांतून मिळते फक्त १५ मिनिटे पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विरगव्हाण येथील पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून करण्यात आलेली उपाययोजना ‘थिटी' पडत असल्याचे वास्तव गुरूवारी (दि. ७) दिसून आले. दरम्यान, दैनिक दिव्य मराठीच्या चमूने गावाला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर सुरू केलेल्या बोअरवेलमधून ४८ तासांनंतर केवळ पंधरा ते वीस मिनिटे पाणीपुरवठा होत असल्याचे गाऱ्हाणे गावकऱ्यांनी मांडले. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गावकऱ्यांची ससेहोलपट अद्यापही कायम आहे.
अमरावती-कुऱ्हा मार्गावरील विरगव्हाण (ता. तिवसा) येथे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचे वास्तव दैनिक दिव्य मराठीने मंगळवारी (दि. ५) मांडले होते. यावृत्ताची दखल घेऊन तहसीलदारांसह इतर अधिकाऱ्यांनी विरगव्हाणला भेट देऊन एक बोअरवेल तातडीने सुरू केले होते. यानंतर गावात पाणीटंचाई नसल्याचा दावा प्रशासनाने केला होता. दरम्यान, वास्तव जाणून घेण्यासाठी विरगव्हाण येथे गुरुवारी भेट दिली असता, केलेल्या उपाययोजेनेतून गावकऱ्यांना ४८ तासांतून केवळ पंधरा ते वीस मिनिटे पाणी मिळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे ही उपाययोजना अपुरी पडत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी एक विहीर आहे. मात्र सध्या या विहिरीत ते फूट पाणी असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावात पाच हातपंप असून, एकाच हातपंपाला पाणी आहे. दोन विहिरी आहेत,परंतु त्या कोरड्या पडल्या आहेत.दरम्यान, मागील वर्षी गावात एक बोअरवेल तयार करून ठेवले होते. त्यामध्ये तातडीने मशीन बसवून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये पाणी सोडण्यात आले. हे बोअर ३६० फूट खोल असून, त्यामधून पावणे दोन इंच पाणी तीन ते साडेतीन तास मिळते. एक उपसा झाल्यानंतर पुन्हा काही तासाने बोअरमध्ये पाणी जमा झाल्यानंतर पुन्हा उपसा करण्यात येतो. उपसा केलेले पाणी, पाणीपुरवठ्याच्या विहिरीत सोडण्यात येते. त्यानंतर विहिरीतील पाणी जलकुभामध्ये पोहचवले जाते. बोअरवेलमधून एकाच दिवशी संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने अर्ध्या गावाला पहिल्या दिवशी तर उर्वरित गावाला दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येताे. यातही जेमतेम १५ ते २० मिनीट पाणीपुरवठा होतो. ज्या नागरिकांचे घर उंच भागात असेल त्यांना पिण्याचे पाणी भरणेसुद्धा कठीण होत आहे. या पाणीपुरवठ्यामुळे विरगव्हाणवासी कशीबशी तहान भागवत आहेत. मात्र वापराचे पाणी पाणी गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. गावात विवाह सोहळा, कार्यक्रम असल्यास सध्या प्रथम पाण्यासाठी पाच-सहा हजार रुपयांची तरतूद करून टंॅकर विकत घ्यावा लागत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

५०टक्के जनावरे गावाबाहेर : गावातीलएकमेव तलाव कोरडा पडल्याने गावातील जवळपास ५० टक्के गुरे गावाबाहेर पाठविण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तलावातील पाण्याने तळ गाठल्याने गढूळ पाणी गुरेसुद्धा पित नसल्याचे वास्तव आहे.

पाणी समस्या बिकटच
^आम्हाला दोनदिवसातून एकदा नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यावेळी १५ ते २० मिनिटे पाणी येते. त्यामुळे पिण्याचे पाणीसुद्धा पूर्ण भरता येत नाही. गुरांना तर आम्ही पाणीसुध्दा पाजू शकत नाही. पाणी समस्या अतिशय बिकट आहे. चंदा ढेंबरे, माजीसरपंच, विरगव्हाण-भिवापूर गट ग्रामपंचायत.

तलावात बोअरची मागणी
^गावात पाण्याची व्यवस्था करण्याचा ग्रामपंचायत पुरेपूर प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच आम्ही तातडीने ३६० फूट बोअरमध्ये मशिन टाकून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र हे पाणी पुरेसे नाही, त्यामुळे तलावात बोअर विहीर नव्याने मिळावी, अशी प्रशासनाकडे मागणी आहे. प्रकाश जाधव, ग्रामपंचायतसदस्य.

एसडीओंना दिले पाहणीचे आदेश
^गावात सध्या बोअरवेल सुरू केलेे. मात्र,ही समस्या कायमस्वरुपी सुटावी,याकरिता प्रत्यक्ष पाहणीसाठी एसडीओंना विरगव्हाणला पाठविणार आहे. किरण गित्ते, जिल्हाधिकारी.

परिस्थितीची माहिती घेणार
^विरगव्हाण येथील पाणीटंचाईबाबत आपण तत्काळ माहिती घेणार आहे. अमरावतीत आल्याबरोबर यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन तोडगा काढू. प्रवीण पोटे, पालकमंत्री.
बोरवेलमधून विहिरीत अन् विहिरीतून पाणी टाकीत पोहोचवले जाते. व्हॉल्व्हमधून पडणारे थेंब थेंब पानी भरताना गावकरी. गावचा तलावही असा कोरडा पडला आहे.