आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठ्याची आदर्श २४ बाय ७ योजना सुरू, नागपूर जिल्ह्यातील सहा गावांचा समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- पाणीपुरवठ्याची आदर्श अशी २४ बाय ७ योजना प्रत्यक्षात लागू करण्यात नागपूर जिल्ह्यातील गोंडेगाव या छोटेखानी गावाला महिनाभरापूर्वी यश आल्यावर आता अर्धा डझन गावांमध्ये ती लागू करण्याचे प्रयत्न नागपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू आहेत.
पाणीपुरवठ्याच्या २४ बाय ७ योजनेतून पाण्याची बचत होत असल्याचे अभ्यासकांचे निष्कर्ष आहेत. ही बाब लक्षात घेऊन नागपुरात मागील चार वर्षांपासून या योजनेवर काम सुरू आहे. ते अद्याप पूर्ण व्हायचे असताना नागपूर शहराचा आदर्श घेत जिल्हा परिषदेने नरखेड तालुक्यातील गोंडेगाव या एक हजार वस्तीच्या गावात २४ बाय ७ योजनेचा प्रयोग सुरू केला. त्यासाठी गावाच्या एका बाजूला पाच हजार लीटरची टाकी उभारण्यात आली. त्या टाकीत विहिरीतून पंपाद्वारे पाण्याची सोय करण्यात आली. टाकीतून गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करण्याची यंत्रणा उभारण्यात आली. ही यंत्रणा उभारताना पाण्याच्या अपव्ययास कारणीभूत ठरणारे सार्वजनिक नळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. नळ यंत्रणेत प्रवाह नियंत्रक यंत्रणा बसवण्यात आल्याने तोट्या चोरी गेल्या तरी पाण्याचा फार अपव्यय होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली.

गोंडेगाव ठरले मॉडेल
चोवीस बाय सेव्हनचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरताना दिसत असल्याने उत्साहित झालेल्या अधिकाऱ्यांनी आता काटोल तालुक्यातील मलकापूर, मिनिवाडा, चवरेपठार आणि पांढरटाकणी तसेच नरखेड तालुक्यातील पिलापूर, माणिकवाडा अशा सहा गावांना चोवीस बाय सेव्हन पाणीपुरवठ्याच्या नकाशावर आणण्याची योजना आखली आहे. या भागातील जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता संजीव हेमके यांनी सांगितले की, योजनेवर अंमलबजावणीपूर्वी त्या गावांपुढे गोंडेगाव येथील योजनेमुळे झालेले फायदे मांडले जाणार आहेत.