आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Should Owner Of Forest Live Misreable Condition ? Governor C.Vidyasagar

जंगल मालकाचे असे हाल का? एवढे बालमृत्यू कसे? राज्यपालांचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मेळघाटातील मोथा, आमझरी येथे भेट देऊन आदिवासी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.
आमझरी मेळघाट (अमरावती) - राज्यातील जंगलांचे मालक असलेल्या आदिवासींना आजही हालअपेष्टा का भोगाव्या लागत आहेत, असा सवाल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील जंगलांचे खरे मालक हे जंगलात वास्तव्यास असलेले आदिवासी आणि गैरआदिवासी आहेत. मात्र, तरीही रुग्णालयात जाताना आदिवासींना हाल सोसावे लागतात. जन्म होताच बालकांचा मृत्यू होतो, अशी परिस्थिती आदिवासींवर का ओढवली, असा सवालही राज्यपालांनी उपस्थित केला. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात असलेल्या आमझरी येथे निसर्ग पर्यटन केंद्राला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवार, नोव्हेंबरला भेट दिली.
या वेळी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत राज्यपाल सी. विद्यासागर राव बोलत होते. राज्यपालांनी आदिवासींना सांगितले की, जंगलातील ही सर्व जमीन तुमच्या मालकीची आहे. जंगलातील वन्यजीव वगळता सर्वच वनौपज आदिवासींच्या मालकीचे आहे. या जंगलातील फळ, फुले, मध, मोहफुले, डिंक आदी सर्व वनौपज आदिवासींच्या मालकीचे आहे. मात्र, आदिवासी भागातून आतापर्यंत किती जण आयएएस, आयपीएस आणि डॉक्टर झाले, असा सवालही त्यांनी केला. आदिवासींना त्यांच्या हक्काचे सर्वकाही मिळावे म्हणूनच केंद्र सरकारने पेसा कायदा आणला, असे राज्यपालांनी सांगितले. राज्यपाल म्हणाले की, या कायद्याचा उपयोग करून प्रश्न सोडवता येतील. राज्यातील आदिवासी भागात वास्तव्यास असलेल्या गैरआदिवासींनाही राज्य सरकारमार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येईल. आदिवासी आणि गैरआदिवासी यांच्यात कोणताही वाद नाही.

मेळघाटातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी
मेळघाटात अद्यापही बऱ्याच भागात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर जावे लागते. पुरेसे पाणी उपलब्ध असूनही बऱ्याच ठिकाणी त्याचा लाभ घेता येत नाही. यासाठी पेसा कायद्यांतर्गत योजना राबवून पिण्याच्या पाण्याचा सिंचनाचा प्रश्न सोडवावा, असे निर्देश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले. मेळघाटातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ, असे सांगत राज्यपालांनी आदिवासी जनतेला दिलासा दिला.

यांची होती उपस्थिती
या वेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार प्रभुदास भिलावेकर, राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव परिमल सिंग, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, विशेष पोलिस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, मुख्य वनसंरक्षक संजय गौड, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. दिनेशकुमार त्यागी, विभागीय वन अधिकारी रवींद्र वानखडे, वन परिक्षेत्र अधिकारी युवराज टोरा आणि आदिवासी बांधव उपस्थित होते. या वेळी आदिवासी युवक - युवतींनी रोप ॲडव्हेंचर आमझरीच्या वतीने नेट क्लॅबिंग, मंकी क्रॉलिंग, कमांडो नेट, ब्रम्हा ब्रिज, स्लिदरिंग रोप आदि साहसी क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन केले. राज्यपालांनी या युवकांचे कौतुक केले.

अधिकाऱ्यांचे पथक पाठवा
मेळघाटातीलसर्व समस्यांचा आढावा घेण्यासाठी दहा अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक तयार करा, असे निर्देश राज्यपालांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. हे पथक मेळघाटात फिरून अभ्यास करेल आणि त्यानुसार आदिवासींना पेसा कायद्यांतर्गत सोयीसुविधा उपलब्ध करून द्या, असे राज्यपालांनी सांगितले. राज्यपाल म्हणाले की, या परिसरात पाणी उपलब्ध आहे, परंतु महिलांसाठी जलवाहिनीद्वारे घरी पाणी येण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर जावे लागते तसेच उपलब्ध पाण्याच्या साठ्याचा सिंचनासाठी उपयोग करून घेण्यासाठी ठिकठिकाणी चेक डॅम, पाझर तलाव घेण्याची त्यांनी सूचना केल्या.