Home »Maharashtra »Vidarva »Nagpur» Widows In Vidarbha Tortured From Their Own Home

Exclusive: तुले व तुह्या पोरा-बारायले काय बी कमी पडू देनार न्हाइ, तू फक्त ‘मर्जी’तनी राह्य

अतुल पेठकर | Apr 21, 2017, 08:34 AM IST

नागपूर - नापिकी, कर्जबाजारीपणा किंवा इतर नानाविध कारणांनी घरातील कर्ता पुरुष, शेतकरी आत्महत्या करतो. मात्र, त्याच्या पश्चात राहिलेली पत्नी, तिची कच्चीबच्ची यांना मात्र सासरी थारा मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव विदर्भात दिसून येते.
वर्धा येथील ‘नाम’चे समन्वयक हरीश इथापे यांनी शेतकऱ्यांसाठी काम करत असताना अालेले हे अनुभव ‘दिव्य मराठी’कडे मांडले अाहेत. केवळ संपत्तीतून बेदखल करण्यापर्यंतच तिच्या सासरच्यांची मजल राहत नाही, तर काही ठिकाणी तिला ‘वश’ करण्याचे अमानुष प्रकारही यानिमित्ताने चव्हाट्यावर अाले अाहेत.
‘मर्जी’त राह्यचं मंजी झालं
‘तुह्यामुळं आमचं पोरगं गेलं. तू काय आम्हाले वावर मांगते?’, ‘आमचं तर पोरगं गेलं. आता तुह्या पोरायले कायले पोसू. जाय आपल्या घरी’, ‘हे पाह्य तुले व तुह्या पोरा- बारायले काय बी कमी पडू देनार न्हाइ. तू फक्त ‘मर्जी’तनी राह्य मंजी झालं’
अशी चित्रपटातील खलनायकाच्या ताेंडी शाेभणारी वाक्यं विदर्भातील २२ ते ३२ वय असलेल्या शेतकरी विधवांना चक्क सासरच्या मंडळींकडून एेकावी लागत अाहेत.

माहेरचाच अासरा
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील योगिता (बदललेले नाव) २३ वर्षांची आहे. सोळाव्या वर्षी तिचे लग्न झाले. नवऱ्याने दारू पिऊन आत्महत्या केल्याने सरकारी मदतही मिळाली नाही. सासरचे आता नांदवायला तयार नाहीत. दोन मुलांसह जायचे कुठे, असा प्रश्न योगितासमोर होता. सध्या ती माहेरी परतली आहे.

बदनाम करण्याचे षड्यंत्र
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील घटना. २८-२९ वय असलेल्या कल्पनाच्या (बदललेले नाव) नवऱ्याने आत्महत्या केली. तिला एक मुलगी आहे. तिने आपल्या ‘मर्जी’त राहावे, अशी इच्छा भासऱ्याने (पतीचा माेठा भाऊ) अनेकदा आडून आडून बोलून दाखवली. परंतु कल्पना बधली नाही. एक दिवस ती घरीच असताना भासऱ्याने त्याचा एक माणूस घरात घुसवला व बाहेरून कडी लावली. नंतर बोंबा मारत गाव गोळा केला; पण कल्पना खंबीर होती. तिने गावासमोर भासऱ्याची नियत उघड केली. आता ती गावातच मुलीला घेऊन वेगळी राहते.

पाच मिनिटांची बायको..!
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील संगीताला (बदललेले नाव) लग्न झाल्यापासून सासरच्या घरात कधीच मानाचे स्थान मिळाले नाही. नवऱ्याच्या अात्महत्येनंतर तर जणू ‘केरसुणी’चीच जागा तिला देण्यात अाली. ‘तू फक्त पाच मिनिटांची बायको’ ही नवऱ्याची भूमिका होती. साबणापासून तेलापर्यंत सासू काढून देईल तितकेच वापरायचे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिच्या नावे झालेली साडेसहा एकर जमीनही सासरची मंडळी तिला कसू देत नाही.
सर्व फोटो प्रतिकात्मक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended