आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडनेरा एक्स्प्रेस हायवेवर कार-दुचाकी अपघातात पतीपत्नी ठार, दाम्पत्याचा चिमुकलाही जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अंजनगावबारीवरून तिवसा येथे जाण्यासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. या धडकेत दाम्पत्य घटनास्थळीच ठार झाले, तर त्यांचा पाच वर्षीय चिमुकला जखमी झाला. कारमधील एक जण त्यांचे तीन मुले असे चौघे जखमी झाले. अपघात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेवर झाला. 
 
विवेक ऊर्फ चंदू भाऊरावजी लांजेवार (४०) संगीता चंदू लांजेवार (३५, दोघेही रा. सातरगाव, तिवसा) असे मृतकांची नावे आहेत. याच वेळी साहील चंदू लांजेवार (५, सातरगाव), राहुल जीवन गिरी (४०), साहील राहुल गिरी (१०), श्रेयश राहुल गिरी (७) आणि दक्ष राहुल गिरी (४, सर्व रा. कोंडेश्वर कॉलनी, बडनेरा) हे जखमी झाले आहेत. चंदू लांजेवार त्यांच्या पत्नी मुलाला घेऊन अंजनगाव बारीला आले होते. अंजनगावला एका नातेवाइकाकडे असलेला कार्यक्रम आटोपून ते सायंकाळी सातरगावला जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. दरम्यान बडनेराकडून अमरावती एक्स्प्रेस हायवेने ते तिवस्याकडे जात असताना बडनेरानजीकच्या चक्रधर पेट्रोल पंपावर येत होते. त्याचवेळी राहुल गिरी यांच्या भरधाव कारची दुचाकीची धडक झाली. 

या वेळी दुचाकीला वाचवण्याच्या नादात गिरी यांच्या कारने पलटी घेतली कार रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. धडकेनंतर दुचाकी कार रस्त्यापासून काही दूर अंतरावर खाली फेकल्या गेली होती. याचवेळी दुचाकीवरील संगीता चंदू लांजेवार यांना गंभीर मार लागला. तर त्यांचा मुलगा साहील रस्त्यावर पडला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना इर्विन रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी दाम्पत्याला मृत घोषित केले. साहीलच्या हात, पायाला गंभीर दुखापत झाली. कारमधील राहुल गिरी त्यांच्या मुलांनाही दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती बडनेराचे ठाणेदार दिलीप पाटील यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच आमदार यशोमती ठाकूर, तिवसा नगरपंचायतचे उपाध्यक्ष वैभव वानखडे, जि. प. सदस्य अभिजीत बोके तातडीने इर्विनमध्ये दाखल झाले होते. आमदार ठाकूर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निकम यांच्यासोबत संपर्क साधून लांजेवार दाम्पत्याचा मुलगा साहीलवर उपचार करण्याबाबत, आवश्यकता असल्यास खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याबाबत चर्चा केली. दरम्यान बडनेरा पोलिसही घटनास्थळी इर्विनला पोहचले होते. 
 
साहीलच्या आक्रोशाने सारेच गहिवरले 
लांजेवारदाम्पत्याचा पाच वर्षीय चिमुकला साहील या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याचा पाय फ्रॅक्चर आहे. चिमुकल्याला प्रचंड वेदना सुरू होत्या. त्यामुळे तो सतत आई, आई असा आवाज देत टाहो फोडत होता. त्याला हे माहीत नव्हते की, अपघातात त्याचे आई वडील दोघेही जग सोडून गेले आहेत. हा चिमुकला मात्र आई येण्याची प्रतीक्षा करत होता. मला आईजवळ घेऊन चला, घरी घेऊन चला अशी विनवणी करत होता. साहीलच्या या काळीज फाडणाऱ्या टाहोने इर्विनमध्ये उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...