Home »Maharashtra »Vidarva »Nagpur» Will Soon Be Out From Alliance: Raju Shetty

रालोआतून लवकरच बाहेर पडणार, मंत्रिपदात रस नाही; राजू शेट्टींचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी | Aug 13, 2017, 02:00 AM IST

  • रालोआतून लवकरच बाहेर पडणार, मंत्रिपदात रस नाही; राजू शेट्टींचे स्पष्टीकरण
नागपूर- राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याबाबत येत्या पंधरा दिवसांत संघटनेच्या कार्यकारिणीत निर्णय घेतला जाणार असून केंद्रातील मंत्रिपदातही आपल्याला कुठलाही रस नाही, असे स्पष्टीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी नागपुरात बोलताना दिले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानीने रालोआत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र, केंद्र तसेच राज्य सरकारही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असंवेदनशील आहे. पंतप्रधानांनी सत्तेत येण्यापूर्वी दिलेली कुठलीही आश्वासने पाळलेली नाहीत. स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीचे आश्वासनही पोकळ ठरले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही. राज्य सरकारने केलेली कर्जमाफी ही केवळ मलमपट्टी असून प्रत्यक्षात ही कर्जमाफी १७-१८ हजार कोटींच्या वर नाही, असा आरोप शेट्टी यांनी केला. त्यामुळे यापुढे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहायचे की नाही याचा निर्णय येत्या पंधरा दिवसांत संघटनेच्या कार्यकारिणीत घेतला जाणार आहे. केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा माध्यमातून सुरू असली तरी आपल्याला त्यात कुठलाही रस नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

२० नोव्हेंबरला जंतरमंतरला एल्गार
किसान मुक्ती यात्रेचा दुसरा टप्पा १५ सप्टेंबरपासून हैदराबाद येथून सुरू होणार असून त्यात मराठवाड्यातून ही यात्रा जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. २० नोव्हेंबरला देशभरातील शेतकरी पुन्हा जंतरमंतर येथे एकत्र येऊन केंद्र सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सदाभाऊंनी राजीनामा द्यावा
सदाभाऊ खोत यांना संघटनेने निलंबित केले आहे. ते आमचे प्रतिनिधी म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात होते. त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा. ते कोणाचे प्रतिनिधी आहेत हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी खासदार शेट्टी यांनी केली. दरम्यान, यावर आता सदाभाऊ खोत काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.

Next Article

Recommended