आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका धाडसी निर्णयाने वाचला महिलेचा जीव, पतीशी भांडण झाल्यानंतर घेतली होती टाक्यात उडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मध्यरात्री साडेबाराची वेळ. नवरा-बायकोचे कडाक्याचे भांडण सुरू असल्याचा फोन शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गेला. परिसरात कर्तव्यावर असलेली सीआर व्हॅन अवघ्या काही मिनिटात घटनास्थळावर पोहचली. परंतु नवऱ्याने पोलिसांना घरात येऊच दिले नाही. तोपर्यंत महिलेनेही आतून दार बंद करून घराच्या वर असलेल्या पाण्याच्या टाक्यात उडी घेतली. यावेळी नियंत्रण कक्षातील अधिकारी पीएसआय मनीष मानकर यांनी महिला कुठे आहे याची विचारणा केली. परंतु घटनास्थळावरील पोलिसांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे मानकर यांनी त्वरीत दार तोडून महिलेचा शोध घेण्याचा आदेश दिला. तोपर्यंत सदर महिला टाक्यात बुडून अर्धमेली झाली होती. त्वरीत महिलेला रुग्णालयात हलविण्यात आले. महिलेचा जीव वाचला. मनीष मानकर यांनी सेंकदाचाही वेळ वाया घालवता घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे आत्महत्या करुन पाहणाऱ्या महिलेचा जीव वाचला. हा घटनाक्रम शुक्रवारी (दि. १५) मध्यरात्री घडला.
 
शहराचा भाग असलेला परिसर मात्र नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नागरी वस्तीत पती पत्नीचे कडाक्याचे भांडण सुरू असल्याची माहिती नियंत्रण कक्षात देण्यात आली. यावेळी सीआरओ असलेले पीएसआय मानकर यांनी संबधित परिसरात असलेल्या सीआर व्हॅनच्या पोलिसांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यावेळी मात्र घरातील पुरूषाने पोलिसांसोबत वाद घातला. पोलिसांसोबत तो व्यक्ती बाहेर वाद घालत असतानाच महिलेने घराचे आतून दार बंद केले. दुसरीकडे नियंत्रण कक्षातील पीएसआय मानकर‘एअर’वरून सातत्याने घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांच्या संपर्कात होते. त्यांनी सांगितले की, महीलेवर नजर ठेवा मात्र महिलेने आतून दार बंद केल्याचे घटनास्थळावरील पोलिसांनी मानकर यांना सांगितले.

त्यावेळी क्षणाचाही अवधी दवडता मानकर यांनी घटनास्थळी असलेल्या पोलिसांना दरवाजा तोडण्याचे आदेश दिले. कारण घटनास्थळावरील पोलिस पुढील कारवाईसाठी वरिष्ठाच्या आदेशाची प्रतिक्षा करत होते. त्यामुळेच मानकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता दरवाजा तोडण्याचा आदेश दिला. आदेश प्राप्त होताच पोलिसांनी दरवाजा तोडला घरात महीलेचा शोध सुरू केला मात्र महिला दिसली नाही. त्यामुळे घराच्या वर असलेल्या पाण्याच्या टाक्यात पाहिले असता महिला पाण्यात बुडतांना दिसली. तीला तातडीने वर काढले, ती जीवंत होती. पोलिसांनी तीला तातडीने इर्विनमध्ये दाखल केले होते. तीची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी त्या महीलेच्या पतीला ताब्यात घेतले होते. सदर महिलेला सहा वर्षांचे मुल आहे. तिचा पती कामानिमीत्त बाहेरगावी राहतो. सद्या तो शहरात आला आहे. त्याने दारु पिऊन पत्नीसोबत शुक्रवारी मध्यरात्री वाद घतला होता,अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
 
स्थिती पाहून दरवाजा तोडण्याचे दिले आदेश
मध्यरात्री आलेल्या माहितीवरून सीआर व्हॅनला घटनास्थळी पाठवले. पती पत्नीच्या वादानंतर आत्महत्येसारखा निर्णय घेतल्याचे यापुर्वी अनेकदा घडले आहे. त्यामुळेच आम्ही घटनास्थळावरील पोलिसांना महिलेवर नजर ठेवण्यास सांगितले. मात्र महिलेने आतून दरवाजा बंद केल्याचे सांगताच आम्ही दरवाजा तोडण्याचे आदेश दिले कारण ती परिस्थिती तशीच होती.
- मनीष मानकर, पीएसआय.
 
तर मोठा अनर्थ घडला असता
पती पत्नीच्या भांडणानंतर पोलिस मध्यरात्र असूनही तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यामुळे संबधित सीआर व्हॅनवरील पोलिसांची तत्परता महत्वाची ठरली आहे मात्र वरीष्ठांचे आदेश नसताना दरवाजा कसा तोडायचा हा प्रश्न होता. यावेळी सीआरओ मानकर यांनी सूत्रे आपल्या हातात घेता त्यांनीही त्यांच्या एखाद्या वरीष्ठाच्या आदेशाची प्रतिक्षा केली असती तर काही तरी अनर्थ घडला असता मात्र त्यांनी प्रसंगावधान ठेवून घेतलेला धाडसी निर्णय महीलेचा जीव वाचवणारा ठरला आहे.
बातम्या आणखी आहेत...