आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूची ‘अवदसा’ हाकलण्यासाठी येवद्यात आयाबहिणींचा ‘एल्गार’, पोलिस ठाण्यावर धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दारुबंदीसाठी ठाणेदार नितीन चरडे यांना निवेदन देताना महिला. - Divya Marathi
दारुबंदीसाठी ठाणेदार नितीन चरडे यांना निवेदन देताना महिला.
येवदा - सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्याने बंद झालेले दारूचे दुकान पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर दुकान कायमचेच हद्दपार व्हावे यासाठी येथील शेकडो आयाबहिणींनी सोमवारी महाराष्ट्र दिनी (दि. १) एल्गार पुकारला. गावातील महिलांनी ग्रामसभेला उपस्थित राहून दुकानाला येवद्याच्या हद्दीत परवानगी नाकारण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. दारूबंदीसाठी महिलांनी आज घेतलेल्या चंडिकेच्या भूमिकेची दिवसभर खमंग चर्चा सुरू होती. कोणत्याही परिस्थितीत गावात दुकान पुन्हा सुरू होऊ देण्याची भूमिका महिलांनी घेतली असून गावकऱ्यांचाही यासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. 
 
येवदा येथे अकोट-दर्यापूर मार्गावर एकमेव दारूचे दुकान आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित दुकान बंद झाले होते. परंतु हे दुकान गावात इतरत्र पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची कुणकुण गावातील महिलांसह नागरिकांना लागली. न्यायालयाच्या आदेशानंतर दुकान बंद झाल्यानंतर तळीरामांची नशाच उतरली. त्यामुळे मद्यपींच्या कुटुंबियात शांतता स्नेहाचे वातावरण निर्माण झाले होते. दुकान बंद झाल्यानंतर दारुड्यांच्या कुटुंबियांतील महिलांनी कमालीचा सुटकेचा नि:श्वास टाकला होता. दुकान बंद झाल्यामुळे गावात भांडण-तंट्यातही घट झाली होती. रोज घरी डुलत येणारे पतिराज कामावरुन सरळ घरी येऊ लागले होते. 

तसेच मद्यपींचे मुला बाळात रमणे सुरु झाल्याने मोठ्या जाचातून सुटका झाल्याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर दिसू लागला होता. परंतु, गावात परत दुसऱ्या ठिकाणी दारू दुकान सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने मद्यपींच्या घरात निर्माण झालेल्या आनंदाच्या वातावरणावर पुन्हा विरजण पडणार होते. दुकान सुरू झाल्यानंतर पुन्हा दारूड्या नवऱ्याचा त्रास सहन करावा लागणार असल्याची भीती महिलांमध्ये निर्माण झाली होती. दरम्यान, आज आयोजित ग्रामसभेत ठराव घेऊन गावाच्या हद्दीत पुन्हा दुकान सुरू होऊ नये यासाठी ठराव घेण्याच्या हालचाली सकाळपासूनच सुरू झाल्या होत्या. गावात दारूचे दुकानच नको अशी भूमिका महिलांनी घेऊन गावात तास-दोन तासात ग्रामसभेला उपस्थित राहण्याबाबत महिलांमध्ये जागृती केली. त्यानुसार सकाळी आयोजित ग्रामसभेला गावातील शेकडो महिला ग्रामपंचायत कार्यालयात गोळा झाल्या. यात गावकऱ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता. ग्रामसभेत महिलांसह गावकऱ्यांनीही गावात दारुचे दुकान नकोच अशी भूमिका घेतली. गावातून बंद झालेल्या परवाना धारक दुकानाला ग्रामपंचायतीने येवदा हद्दीत परवानगी नाकारावी या करीता महिलांनी मोर्चेबांंधणी केली. 

दारुमुळे आमचे संसार उघड्यावर आले. मुला बाळांची आभाळ होते आहे. कितीतरी परिवार उद्ध्वस्त झाले. तरीही मोठ्या प्रमाणात दारू पिणे सुरुच आहे त्यामुळे ही अवदसा गावात पुन्हा नकोच अशा संतप्त प्रतिक्रिया सभेत महिलांकडून उमटत होत्या. त्यामुळे सर्वसंमतीने संबंधित दुकानास येवद्याच्या हद्दीत परवानगी नाकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर महिलांनी आपला मोर्चा पोलिस ठाण्याकडे वळवून ठाणेदार नितीन चरडे यांना घेराव घालून आपल्या व्यथा निवेदनातून मांडल्या. गावातील अवैध दारू तसेच इतर अवैध धंदे बंद करण्यात यावे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या महिलांनी केली. महाराष्ट्रदिनी आक्रमक महिलांनी दारूमुळे होणाऱ्या त्रासाला वाचा फोडल्याने दिवसभर गावात याचीच जोरदार चर्चा सुरु होती. 
 
काही झाले तरी आता मागे हटणार नाही 
येवद्याच्या हद्दीत कुठेही वैध, अवैध दारू मिळू नये,गावात कायमची दारूबंदी व्हावी यासाठी ठराव घेतला. यापुढेही पाठपुरावा सुरुच राहील.दारूबंदीसाठी आम्ही आता मागे हटणार नाही. 
- किरण देशमुख, गृहिणी. 

कारवाई करणार 
अवैध दारू विक्री मद्यपींवर कारवाई केली जाईल.जनतेंनी दारू विक्रेत्याची माहिती दिल्यास
लगेच कारवाई करण्यात येईल. 
- नितीन चरडे, ठाणेदार,येवदा पोलिस स्टेशन. 
 
शांतता हद्दपार झाली 
रोजची कमाई दारूत जात असल्याने महिलांना मोल मजुरी करून संसार सांभाळावा लागतोय. रोजच्या कटकटीमुळे घरातील शांती हद्दपार झाली आहे. 
- प्रमिला मोरे,गृहिणी. 
 
फरफट थांबेल 
महिलांनी दारूबंदीचा ठराव पारित करून ग्रामसभेत आपली शक्ती दाखवली. दारूमुळे कुटुंबाची होणारी फरफट तरी थांबेल. 
- अरुणा हिरूळकर, ग्रा.पं.सदस्य. 
 
संसार वाचतील 
दारूमुळे माझा पती गेला. त्यांच्या अवेळी जाण्याने माझा संसार उद्ध्वस्त झाला. मजुरी करुन कसाबसा संसाराचा गाडा हाकावा लागतोय. मुलांच्या भविष्याची चिंता सतावत असल्याने डोळ्याला झोप येत नाही. माझ्या सोबत जे झाले ते इतरांसोबत घडू नये. 
- दुर्गा अरुण चव्हाण, गृहिणी. 
 
ग्रामसभेत ठराव मंजूर 
ग्रामसभेच्या निर्णयानुसार गावात बंद झालेले दारू दुकान पुन्हा येवदा हद्दीत सुरु करण्याची परवानगी नाकारण्याचा ठराव आज पारित झाला. 
- प्रदीप देशमुख ,सरपंच, ग्रामपंचायत येवदा. 

 
बातम्या आणखी आहेत...