आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकने घेतला महिलेचा नाहक बळी, वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - अचलपूर-पतरवाडाशहरात वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. बुधवारी (दि. १३) भरधाव ट्रकने धडक दिल्याने नारायणपूर येथील महिलेचा जागीच मृत्यू झाला. जयस्तंभ चौक ते बसस्टँड मार्गावरील ईझी हार्डवेअरसमोर दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. मागील सहा दिवसांमधील अपघाताची ही दुसरी घटना असल्याने नागरिक धास्तावले आहेत. बेबी धाकडे (रा.नारायणपूर) असे मृतक महिलेचे नाव आहे.
बेबी धाकडे या आपला मुलगा कपिलसह येथील युनियन बँकेत आल्या हाेत्या. दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रकने (एमएच ०४/ एस ५९४१) बेबी धाकडे यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, भरधाव ट्रकने त्या दहा ते पंधरा फुटापर्यत फरफटत गेल्या. सुदैवाने कपिलचा हात सुटल्याने तो थोडक्यात बचावला. अपघात होताच क्षणातच परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. अपघाताची माहिती नागरिकांनी वाहतूक शाखेला देण्याचा प्रयत्न केला, परंतु, तेथे कोणताही प्रतिसाद मिळाल्याने नागरिकांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधनू माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले.

शहरात सतत होणाऱ्या अपघातांबाबत नागरिकांनी वाहतूक पोलिसांवर रोष व्यक्त केला. वर्दळीच्या या मार्गावर एकही वाहतूक पोलिस तैनात नसल्याने नागरिकांचा हकनाक बळी जात असल्याची संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

आणखीकिती बळी घेणार : अचलपूर-परतवाडाशहरासह ग्रामीण भागातही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासन आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी घेणार, असा सवाल नागरिक करत आहेत.

तीन वर्षांत घेतला अनेकांचा बळीे:
जयस्तंभचौक जणू दुर्घटनेचा साक्षीदार ठरू लागला आहे. या चौकात तीन वर्षांत पाचपेक्षा अधिक नागरिकांना आपल्या जीवाला मुकावे लागले. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी एकही कर्मचारी येथे दिसून येत नाही.

सहा दिवसांत दुसरी घटना
यापूर्वी म्हणजे एप्रिल रोजी याच परिसरामध्ये अचलपूर येथील मंजुरपुरा येथील रहिवासी युवक मो. राजिक शे. महेबूब याला ट्रकने चिरडले होते. ही घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा ट्रकने महिलेचा बळी घेतला. वाहतूक कोंडीकडे पाेलिस, नगर परिषद, बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.