आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Not Forget Traditional Manner Pankaja Munde

चूल आणि मूल विसरल्यास लयाला जाईल संस्कृती मूल्य - पंकजा मुंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - समाज केवळ सुशिक्षित होऊन चालत नाही, तर तो सुसंस्कृत व्हावा लागतो. तसे नसेल तर जगाच्या पाठीवर अनेक देश गडगडले, हेही आपण पाहिले आहे. त्यामुळे चूल आणि मूल आम्ही जर विसरलो, तर संस्कृतीच लयाला जाईल, अशी भीती व्यक्त करून या प्रक्रियेतूनच आम्ही महिला संस्कार शिकवत असतो. ते आमचे सौंदर्य आहे. शाप नसून वरदान आहे आणि मला त्याचा अभिमान आहे, असे परखड मत राज्याच्या महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केले.

शासनाच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागीय आयुक्तालयाच्या वतीने सायन्सकोर मैदानात आयोजित चार दिवसीय विभागीय महिला जनजागृती विकासगंगोत्रीचा शुभारंभ रविवारी (दि.१०) मुंडे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला खासदार आनंदराव अडसूळ, आमदार अॅड. यशोमती ठाकूर, बच्चू कडू, रमेश बुंदिले, प्रभुदास भिलावेकर डॉ. अनिल बोंडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके (अमरावती), रेखा खंडारे (बुलडाणा) आरती उपाटे (यवतमाळ), महापौर चरणजीतकौर नंदा, भाजपच्या निवेदिता चौधरी, ग्रामविकास सचिव व्ही. गिरीराज, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, एसडीओ प्रवीण ठाकरे, उपकार्यकारी अधिकारी कैलास घोडके, ग्रामविकास विभागाच्या अधिकारी लीना बनसोड, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार आदी मान्यवर उपस्थित होते.

महिलांची प्रचंड उपस्थिती असलेल्या या मेळाव्यात मुंडे यांचे दिलखुलास भाषण झाले. बालपण तरुणाईचा काळ आणि वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची शिकवण, अशा अनेक बाबींना स्पर्श करून त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, माता सक्षम करणे गरजेचे आहे नव्हे त्यातच सर्व प्रश्नांची उत्तरे दडली आहेत. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी, असे उगाच म्हटले जात नाही. स्त्री कार्यक्षम आणि शिस्तप्रिय आहे. ती एकट्याने निर्णय कधीच घेत नाही. ती कणखर आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये महिला नाहीत, ही बाबही मुंडे यांनी अधोरेखित केली.

महिलांची आर्थिक सचोटी स्पष्ट करताना त्यांनी बरेच बारकावे मांडले. बचतीचा मंत्र तिच्या हातात आहे. घरात दिलेले पैसे कसे पुरवायचे, हे तिला माहीत असते. महिला पैसे कुठे-कुठे ठेवतात, याचाही त्यांनी खुबीने उल्लेख केला. कुंकवाचे डाबले, गव्हाची रास, डाळीचा डबा, कपाटातील कागदाचा तळ, अशा अनेक ठिकाणी पैसे लपवलेले असतात. घरातील आजारपण, नवऱ्याचे कपडे, मुलाचा सदरा, मुलीचा क्लास अादी कित्येक कामांसाठी ही बचत कामी येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी इतर मान्यवरांचीही भाषणे झालीत. प्रारंभी डीआरडीएचे प्रकल्प संचालक कापडे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. संचालन क्षीप्रा मानकर -खाडे यांनी केले, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी आभार मानले.

बचत गटांसाठी ऑन लाइन ‘इ-पोर्टल’
बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी ऑनलाइन ई-पोर्टल’ तयार केले, असे सांगून त्याद्वारे कोणत्या वस्तूंना कोठे बाजारपेठ आहे, हे शोधता येत असल्याची माहितीही पंकजा मुंडे यांनी दिली. कोणत्या वस्तू महानगरात आणि कोणत्या वस्तू शहरे गावांत विक्रीसाठी पाठवायच्या, हेही त्यामुळे ठरवणे अत्यंत सोपे झाले आहे. शिवाय बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध झाली, असे त्यांचे निरीक्षण आहे.

अंगणवाडीला मानधन भेट
अंगणवाडीच्या सेविका मदतनिसांच्या मानधनात २०१४ सालीच वाढ घोषित करण्यात आली होती. मात्र, तत्कालीन सरकारने तरतूद केली नाही. त्यामुळे त्या काळातील अतिरिक्त रकमेसह वाढीव मानधनापोटी राज्यभरात ३२८ कोटी, तर भाऊबीज भेटीची रक्कम म्हणून ४८ कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहितीही महिला बालविकास मंत्री मुंडे यांनी दिली.

बीपीएलसाठी २०११ चा सर्व्हे लागू करू
बीपीएलच्या जुन्या यादीत अनेक गरिबांची नावे नाहीत, हे मान्य करून २०११ चा नवा सर्व्ह घरकुलासाठी लागू करू, असेही मुंडे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. या कृतीमुळे राज्यात लाख नवे घरकुल तयार होतील. त्याचवेळी येत्या काळात ग्रामीणांच्या मुला-मुलींसाठी नवनवीन प्रशिक्षणे सुरू करू, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

घागरमुक्त महिला, दुष्काळमुक्त राज्य
२०१९ पर्यंत घागरमुक्त महिला आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र अशी योजना राबवण्याचा शासकीय संकल्पही मुंडे यांनी स्पष्ट केला. मात्र, प्रत्येक बाबीसाठी शासनावर अवलंबून राहू नका, जमेल तेव्हा स्वत:ची रक्कम खर्च करावे असे मुंडे यांनी विनम्रपणे सुचवले.

नागपूरच्या माॅलमध्ये बचत गटांच्या वस्तू
विदर्भातील बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन नागपुरात मॉल बांधतेय. असाच प्रयोग इतर ठिकाणीही केला जाणार आहे. पंडित दीनदयाल कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षण देण्याची घोषणा मुंडे यांनी आपल्या भाषणातून केली.

पुढे काय होणार?
महिलाबचत गटांमध्ये काम करणाऱ्या महिला सक्षम व्हाव्यात म्हणून लवकरच एक टक्का व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिवाय दारिद्र्य असूनही बीपीएल यादीत नाव नाही अन् स्वत:ची जागाही नाही. त्यामुळे घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, अशी अनेकांची स्थिती आहे. त्यासाठी लवकरच पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजना लागू केली जाईल. या दोन्ही योजनांची घोषणा होईल, असे मुंडे यांनी सांगितले.