आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला बचत गट ते मॉल व्हाया "विकासगंगोत्री'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महिलांचे सक्षमीकरण व्हावे, महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासनाच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि विभागीय आयुक्तालयाच्या वतीने महिला जनजागृती विकासगंगोत्रीचे आयोजन १० ते १४ जानेवारीदरम्यान करण्यात आले आहे. सायन्सकोर मैदानावर चार दिवस चालणाऱ्या या विकासगंगोत्रीचा आज (दि. १०) महिला मेळाव्याने शुभारंभ होणार आहे. प्रदर्शनामध्ये महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे सुमारे दोनशे स्टाॅल्स राहणार असून, यापैकी निवडक वस्तूंना थेट महानगरांमधील मॉलमध्ये स्थान मिळवून कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
अमरावती जिल्हा, अमरावती विभाग हा शेतकरी आत्महत्याग्रस्त भाग आहे. या परिसरात मागील अनेक वर्षांपासून सातत्याने शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. अशावेळी शेतकरी कुटुंबात शेतीव्यतिरिक्त अन्य जोडव्यवसाय करता यावा, तोही महिलांनी केल्यास अधिक हातभार लागेल. त्यामुळेच मागील काही वर्षांपासून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोड व्यवसायाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अनेक महिला बचत गटांद्वारे विविध उत्पादनांची निर्मिती करीत आहेत, अशा उत्पादनांच्या विक्रीसाठी योग्य ठिकाण मात्र अनेक महिला बचत गटांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे महिला बचत गटाच्या उत्पादनांना विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, म्हणून शासनाकडून दरवर्षी सायन्सकोरवर विकासगंगोत्री नामक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते. यंदा ते प्रदर्शन आहेच याशिवाय महिलांना शासनाच्या विविध योजनांचा कशाप्रकारे फायदा होऊ शकतो. महिला बचत गटांसाठी कोणकोणत्या पद्धतीने कर्ज उपलब्ध आहे, त्या कर्जाच्या व्याजाला कशापद्धतीने अनुदान उपलब्ध होऊ शकते, अशी सविस्तर माहिती या वेळी दिली जाणार आहे. या वेळी जवळपास २०० स्टॉल्स राहणार असून, यामध्ये अमरावती जिल्ह्यातील महिला बचत गटाचे १४० स्टॉल्स असतील. या स्टॉल्सवर महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेले साहित्य विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. यामध्ये बांबूपासून तयार केलेल्या शोभिवंत वस्तू, मध, विविध प्रकारचे लोणचे, तसेच विकासगंगोत्रीमध्ये मागील काही वर्षांपासून असलेल्या स्टॉल्सपैकी आकर्षण ठरणारे मटण मांडेसुद्धा राहणार आहे. या मेळाव्याच्या तसेच प्रदर्शनाच्या आयोजनासाठी संपूर्ण डीआरडीएची यंत्रणा व्यस्त झाली आहे. याच वेळी महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी येणार आहे.

१५ हजार महिलांची राहणार उपस्थिती
^महिलाबचतगटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी "विकासगंगोत्री'च्या माध्यमातून व्यासपीठ, विभागीय महिला मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले आहे. या वेळी जवळपास १५ हजार महिलांची उपस्थिती राहणार आहे. त्यासाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे. उपस्थित महिलांना विविध योजना, कौशल्यविकास प्रशिक्षण याबाबत माहिती देण्यात येणार आहे. विकासगंगोत्री ही १४ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. नंदकुमार धारगे, सहायकगटविकास अधिकारी. (भातकुली पं.स.)

ने-आण करण्यासाठी दाेनशे एसटी बसेस
रविवारी होणाऱ्या विभागीय महिला मेळाव्यासाठी अमरावती जिल्ह्यासह विभागातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांतील महिलांची उपस्थिती राहणार आहे. त्यांची ने-आण करण्यासाठी महामंडळाच्या तब्बल २०० बसेस राहणार आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यासाठी ९० बसेस तसेच उर्वरित चार जिल्ह्यांतून प्रत्येकी ३० बसेस भरून महिला येतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. या मेळाव्याला अमरावती शहरातूनही हजारो महिलांची उपस्थिती राहणार आहे. कारण महापालिका यंत्रणेचासुद्धा यामध्ये समावेश आहे.