आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या विषय समित्यांवर ‘महिलाराज’, चारपैकी तीन समित्या महिलांकडे, काँग्रेसचे वर्चस्व!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेच्या विषय समित्यांवर महिलाराज प्रस्थापित झाले आहे. चारपैकी तब्बल तीन सभापती तीन उपसभापती पदांवर महिलांची निवड करण्यात आली आहे. विषय समिती निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व अबाधित राहिले आहे. शिवाय, काँग्रेसवासी झालेले संजय खोडके यांचा गटदेखील पूर्णपणे काँग्रेसमय झाल्याचे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत आहे.
विधी समिती सभापतिपदी काँग्रेसच्या संगीता वाघ, तर उपसभापतिपदी वंदना हरणे, शहर सुधार समिती सभापतिपदी अर्चना राजगुरे, तर उपसभापतिपदी राजेंद्र महल्ले यांची निवड करण्यात आली आहे. शिक्षण समिती सभापती म्हणून आरीफ हुसैन मुनाफ हुसैन, तर उपसभापतिपदी लुबना तनवीर नवाब आणि महिला बालकल्याण समिती सभापतिपदी सारिका महल्ले, तर उपसभापतिपदी फहमिदा नसरीन हबीब शहा यांची अविरोध निवड झाली आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या उपस्थितीत ही निवडणूक घेण्यात आली. सकाळी ते १०.३० वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी अवधी देण्यात आला होता. सभापतिपदासाठी उपसभापतिपदासाठी एवढेच अर्ज प्राप्त झाल्याने उमेदवारांची अविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. मागील विधानसभेच्या निवडणुकीत संजय खोडके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र, पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याने त्यांच्या गटातील नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट म्हणून नोंदणी आहे. महापौर तसेच स्थायी समिती निवडणुकीत खोडके गट म्हणजेच एनसीपी फ्रंटने अस्तित्व टिकून ठेवले. मात्र, विषय समिती निवडणुकीत संपूर्ण शहर सुधार समिती शेखावत गटाकडे देण्यात आली. त्यामुळे पद वाटपावरून पूर्वी होत असलेला दोन गटामधील वाद या वेळेस निवळला असल्याचे चित्र दिसून येत आहे. या वेळी उपायुक्त विनायक औगड, नगर सचिव मदन तांबेकर, विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, प्रकाश चक्रे, नंदकिशोर पवार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...