आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wood Market Fire In Amaravati News In Divya Marathi

लाकूड बाजाराला भीषण आग; सात दुकाने झाली खाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- शहरातीलजयस्तंभ चौक ते अचलपूर मार्गावर असलेल्या लाकूड बाजाराला मंगळवारी (दि. १६) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचे सागवान लाकूड फर्निचर खाक झाले. या आगीत सात दुकाने भस्म झाली. तब्बल सहा तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या चार बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारणही स्पष्ट होऊ शकले नाही.

परतवाडा येथे जयस्तंभ चौक ते अचलपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात सागवान फर्निचरच्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास येथील पौर्णिमा काच भांडार मागे असलेल्या एका फर्निचर दुकानाला आग लागली. ही बाब एका चौकीदाराच्या लक्षात आली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनेची माहिती त्वरित नगरपालिकेला कळवली. या वेळी अनेक दुकानदारांना माहिती देण्यात आली. या आगीत संजय जैन यांचे पौर्णिमा कांच भांडार, सादीक भाई यांचे टिपटॉप फर्निचर, शंकर शर्मा यांचे पूजा आॅटो पार्ट््स, अशोक दुबे यांचे बांबू, आरिफभाई यांचे फर्निचर, अकबर फर्निचर, मुन्ना फर्निचर, जाकीर मिस्त्री, अब्दुलभाई, रियाज भाई यांचे अदमान फर्निचर जळून खाक झाले.

पहाटे चार वाजताच्या सुमारास लागलेली ही आग सकाळी दहा वाजेपर्यंत धुमसत होती. जागरूक नागरिकांनीही नगरपालिकेला फोन करून आग लागल्याची माहिती दिली. ही आग विझवण्याकरिता अचलपूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच परिसरातील नागरिक व्यावसायिक आपापल्या परीने अन्य दुकाने वाचवण्याकरिता प्रयत्न करत होते. दरम्यान, आगीचे रौद्ररूप पाहून अमरावती, चांदूरबाजार येथील अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. चार बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मोठी हानी टळली असली तरी कोट्यवधी रुपयांचे फर्निचर या आगीत खाक झाले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मनोज लोणारकर, नायब तहसीलदार आर. एन. काळे, प्रभारी मुख्याधिकारी पी. एम. शुक्ला, ठाणेदार किरण वानखडे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर पोहोचून आगीवर नियंत्रण पुढील अनर्थ टाळण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले.

आगीच्याकारणावरून चर्चेला उधाण :
लाकूडबाजारातील आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. काही नागरिकांच्या मते ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली तर काहींच्या मते रात्री पत्ते खेळणाऱ्यांची शेकोटी या आगीस जबाबदार असल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती.

सुरक्षेकडेअक्षम्य दुर्लक्ष :
यालाकूड बाजारात अनेक ज्वलनशील व्यवसाय करणारे प्रतिष्ठाने आहेत. लाखोची प्रतिष्ठाने, सुरक्षेची मात्र कवडीची व्यवस्था नाही. शहरातील नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून फर्निचर व्यावसायिकांचे दुकाने असून, मोठ्या प्रमाणात लाकडांचा साठा या ठिकाणी असतो. यापूर्वीही अनेक आगीच्या घटना झाल्या असूनसुद्धा सुरक्षेच्या अनुषंगाने मात्र येथील व्यवस्था नगण्य आहे. येथील कोणत्याच दुकानात आग विझवण्याचे साधे यंत्र, पाण्याचे टाकेही िदसून आले नाही.

मदतीलाधावले अनेक हात :
लाकूडबाजारात लागलेली आग आटोक्यात आणण्याकरिता प्रत्येकाने सर्वतोपरी प्रयत्न केले. आग लागलेल्या दुकानचे दुकानदार येण्यापूर्वीच अनेकांनी शटर उघडून त्यातील साहित्य वाचवण्याकरिता प्रयत्न केला. घटनास्थळी नीलेश सातपुते, रूपेश लहाने, अनिल तायडे, ओमप्रकाश दीक्षित, प्रवीण पाटील, गजानन हिवसे, प्रवीण तोंडगावकर, प्रतीक घुलक्षे, दिनेश ठाकरे, श्याम क्षीरसागर, तिवारी आदींच्या उपस्थितीसह अनेकांनी मदतीसाठी प्रयत्न केले.

आगीच्या घटनेची माहिती िमळता अचलपूर नगर पालिकेने अग्निशमन बंब त्वरित घटनास्थळी पाठवून ही आग नियंत्रणात आणली. याकामी पी. एम. शुक्ला, राजाभाऊ देशमुख, मो.जहिर,आरोग्य विभाग अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

पालिकेचा पुढाकार - वरिष्ठांना देणार अहवाल
लाकूड बाजारात लागलेल्या आगीत झालेल्या दुकानदारांच्या प्रतिष्ठानांचा पंचनामा करून माहिती घेऊन नुकसानाचा तसा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल. तहसीलदार लोणारकर यांनी मंडळ अधिकारी तलाठ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून, तशी प्रक्रिया सुरू झाली आहे.

फेब्रुवारीतील आतापर्यंतची तिसरी मोठी आगीची घटना
जयस्तंभ चौक परिसरातील या लाकूड बाजारात शंभरहून अधिक व्यावसायिक फर्निचरचा व्यवसाय करतात. या बाजारात फेब्रुवारी १९९७ मध्ये आग लागून ३० ते ४० दुकाने खाक झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी २००४ मध्ये पुन्हा आग लागली होती.आज पुन्हा फेब्रुवारी महिन्यातच आग लागली. या बाजारातील ही तिसरी मोठी आग असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते.