आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील कठोरा मार्गावर ‘लक्ष्मी’ प्रसन्न; अन् ‘कुबेर’ ही झाला उदार, 6 कोटीचे डांबरीकरण उखडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- एकीकडे शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था खड्ड्यांमुळे हातपाय मोडून घेण्यासारखी झाली आहे. खड्डे बुजवण्यासाठी मुरूमही या रस्त्यांच्या नशीबी आला नाही. परंतू कठोरा नाका ते कठोरा गाव या पाच किलोमीटर मार्गावर सद्या लक्ष्मी मुक्त हस्ताने प्रसन्न झाली असून कुबेरही उदार झाला. सहा महिन्यांपूर्वीच पावणेसहा कोटी खर्च करून केलेले डांबरीकरण उखडून आता त्यावर ५४ कोटी खर्चून काँक्रिटीकरण करणार असल्याने या मार्गाचे भाग्य फळफळले. जनसामान्यांच्या कराच्या पैशातून डांबरीकरणासाठी केलेल्या पावणे सहा कोटींचा सहा महिन्यात राजकीय प्रशासकीय नियोजनशून्यतेमुळे कडेलोट झाला. 
 
वर्षानुवर्षे डांबरी रस्त्यांवर त्यापेक्षा अधिक खड्डे बुजवण्यावर होणारा कोट्यावधीचा खर्च हा नुकसानकारक आहे. त्यानंतरही या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारी जीवितहानी भरून निघणारी आहे. डांबरी रस्त्यांपेक्षा काँक्रिटीकरण केलेले रस्ते टिकाऊ असल्यामुळे डांबरी रस्त्यांवर होणारा खर्च टळून खडखडाट झालेल्या शासनाच्या तिजोरीत काही अंशी जमा होणारी गंगाजळी किमान ‘पांदण’ रस्त्यावर खर्च होऊन बळीराजाची पेरणी, कापणी आदी विकास कामासाठी खर्च होऊ शकेल. याशिवाय विकासाचा दिवाही पोहोचलेल्या गावात या गंगाजळीतून किमान उजेड पडण्याची आशा आहे. एकीकडे जिल्ह्यातील शेतकरी, शहरातील वस्त्या, गाव खेड्यातील शाळांपर्यंत पायाभूत सुविधा पोहचू शकल्या नसल्याचे भयाण वास्तव आहे. 
 
अशा स्थितीत जनसामान्यांच्या करातून उभी राहिलेल्या पावणे सहा कोटी रुपयांच्या खर्चातून सहा महिन्यापूर्वीच कठोरा नाक्यापासून ते कठोरा मार्गाचे रुंदीकरण डांबरीकरण करण्यात आले. परंतु आता या पाच किमी लांबी असलेल्या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणासाठी ५४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. गुळगुळीत चकाचक झालेला रस्ता पुन्हा उखडणे सुरू झाल्यामुळे या मार्गावरील रहिवाशी बुचकळ्यात पडले आहे. 
 
दरम्यान कॉंक्रिटीकरणासाठी या मार्गाचे काम सुरू झाल्यामुळे पावणे सहा कोटी जनसामान्यांचा पैसा मातीत गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खोदकाम सध्या शहरातील समंजस जाणकार नागरिकांच्या डोळ्यात खुपू लागला आहे. शासन प्रशासनाचा ताळमेळ असता तर हा पावणे सहा कोटी रुपयांचा मातीत गेलेला निधी वाचून इतर विकास कामे होऊ शकली असती अशा भावना आता व्यक्त होऊ लागल्या आहेत. शहरातील रहाटगाव रिंग रोड, शेगाव नाका ते शेगाव गावा पर्यंतचा मार्ग, नवाथे - साईनगर भागातून जाणारा अकोली मार्ग आदींसह इतर अनेक मार्गांची सध्या भीषण अवस्था झाली आहे. कठोरा नाका ते कठोरा गाव या पाच किलोमीटरसाठी राज्याच्या २०१४ - १५ या अर्थसंकल्पात रुंदीकरणासह डांबरीकरणाच्या कामासाठी कोटी रुपये मंजूर झाले होते. या कामाला प्रत्यक्षात २३ नोव्हेंबर २०१५ ला सुरूवात झाली. हे काम अर्धवट असतानाच केन्द्र पुरस्कृत योजनेमधून याच पाच किलोमीटरच्या मार्गावर मार्च २०१६ ला कॉक्रीटीकरण मंजूर झाले. यासाठी ५४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. 

हे काम मंजूर झाल्यानंतर राज्य शासनाकडून मंजूर झालेले डांबरीकरणाचे काम कठोरा नाक्यापासून सुरू झाले होते. सुमारे तीन किमी लांबीचे काम जवळपास पूर्ण झाले होते. काँक्रिटीकरण मंजुरीमुळे जुन २०१६ ला डांबरीकरणाचे काम बंद केले. मात्र तत्पूर्वी या मार्गावर डांबरीकरणासाठी कोटींपैकी जवळपास पाच कोटी ८० लाख खर्च केले. त्यानंतर आता २८ जून २०१७ ला केन्द्र पुरस्कृत योजनेमधून मंजूर ५४ कोटींच्या कॉक्रीटीकरणाच्या कामाची वर्कऑर्डर काढली. या कामाला सुरूवात झाली असून यात कठोरा नाका ते कठोरा गावा पर्यंतचा रस्ता ३० मीटर रुंदीचा होणार असून यात एका पुलाचे काम होणार आहे. मात्र सहा ते दहा महिन्यांपूर्वी तयार झालेला पावणेसहा कोटींचा डांबरीकरणाचा रस्ता उखडण्याचे काम सद्या प्रगतीपथावर आहे. या मार्गावरील डांबरीकरण उखडण्यात येत असले तरी काँक्रिटीकरणासाठी आवश्यक काही काम डांबरीकरण करताना केल्याचेही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  
आता रुंद होणार रस्ता 
कठोरा नाका ते कठोरा गाव हा पाच किलोमीटरचा रस्ता आता सिमेंट कॉक्रीटचा होणार आहे. त्यामुळे या रस्त्याची रुंदी वाढवण्यासाठी या मार्गावरील काही झाडे कापण्यात आली आहे. त्यासाठी संबधितांकडून तशी परवानगी घेण्यात आली आहे.’’ 
- विवेक साळवे, अधीक्षक अभियंता, साबांवि. 
 
समन्वयाअभावी पावणे सहा कोटींचे नुकसान : सामुहिक विकासासाठी रस्त्यांची मोठी भूमिका आहे. मेळघाटासह जिल्ह्यातील अनेक गावांत पक्के रस्ते नसल्यानेे आरोग्य सेवेसह इतर पायाभूत सुविधा आवश्यक त्या स्थळी पोहचू शकत नसल्याचे वास्तव आहे. अशा स्थितीत कॉंक्रिटीकरणासाठी ५४ कोटींचा केंद्राचा निधी मंजूर होत असल्याची बाब राजकीय प्रशासकीय धुरिणांना कळू शकली असती तर जनसामान्यांच्या खिशातून कर रुपात वसूल केलेले पावणे सहा कोटींचा केलेला या मार्गावरील खर्च पाण्यात गेला नसता. राज्य केंद्र शासनाच्या समन्वयाअभावीच कोट्यवधीचा निधी वाया गेल्याची भावना या मार्गावरील जनसामान्यांची आहे. समन्वय साधला असता तर या पावणे सहा कोटींची बचत होऊन तो निधी अत्यावश्यक गरजेसाठी वापरता आला असता अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 
 
शासन चार कोटी वृक्ष लागवडीचा प्रकल्प राबवत आहे. असे असताना रस्ता रुंदीसाठी कठोरा नाका ते गावा दरम्यान २० ते २५ वर्षाची झाड मुळासकट तोडली. ७१ झाडे तोडणार असल्याचे साबांविच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या ७१ झाडांच्या बदल्यात एक हजार झाडे लावून पाच वर्षांपर्यंत त्याची निगा राखण्याचे कंत्राटदाराला सांगितले. रस्त्याच्या कामात नाली बांधण्यात येईल, त्यानंतर झाडे लावणार असल्याचे साबांविचे अधिकारी सांगत आहे. झाडे तोडण्यासाठी एसडीएमची परवानगी घेतली. झाड कापल्यानंतर झाडे लावली जातात मात्र जगवली जात नसल्याचे वास्तव आहे. याचे उदाहरण अमरावती ते नागपूर महामार्ग आहे. 
 
आवश्यक बाबी पूर्ण 
या मार्गाच्या डांबरीकरणा साठी कोटी मंजूर झाले होते. त्यापैकी कोटी ८० लाखाचे काम केले. दरम्यान काँक्रिटीकरणाचे काम मंजूर झाले. डांबरीकरणाचे काम करतानाच अनेक बाबी पुर्ण केल्या. त्या काँक्रिटीकरणात करण्याची गरज नाही. 
- ए. बी. शिरभाते, उपविभागीय अभियंता, साबांवि.