आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस गुणवाढ प्रकरण; उपकुलसचिव यादव कोहचाडे यांचा तुरुंगात मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बहुचर्चित बोगस पदवी व गुणवाढ प्रकरणातील मुख्य आरोपी तसेच माजी उपकुलसचिव यादव नथ्थोबा कोहचाडे (६२) याचा हृदयविकाराने गुरुवारी  मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. बनावट पदवी व गुणपत्रिका घोटाळ्याच्या चौकशीसाठी न बोलावण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकाला सात लाखांची लाच दिल्याप्रकरणात विशेष सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने कोहचाडे याला जुलैमध्ये चार वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती.   

१९९९ मध्ये कोहचाडे विद्यापीठात सहायक कुलसचिव होता. परीक्षा विभागाचा कारभारही त्याच्याकडे होता. या काळात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याच्या बनावट गुणपत्रिका तसेच बनावट पदव्या दिल्या होत्या. यासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेतले. हा घोटाळा उघडकीस येताच सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.  
 
घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्यांनी बंटी उके याला बोलावले होते. चौकशीनंतर त्याला सोडले. याच दरम्यान कोहचाडे याने लोखंडे यांना एकांतात भेटायचे असल्याचे सांगितले. १८ जून १९९९ ला कोहचाडे हा लोखंडे यांना काँग्रेस नगरमध्ये भेटला. बंटी उके याला चौकशीसाठी न बोलावणे, तसेच घोटाळ्यातून वाचवण्यासाठी सात लाख रुपयांची लाच देऊ केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला दोषी  ठरवत चार वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, गुरुवारी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.  

२०० पैकी एकाच प्रकरणात शिक्षा
कोहचाडेविरुद्ध दोनशे विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या घोटाळ्यात कोहचाडेसह विद्यापीठाच्या १६ अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र, एकाही प्रकरणात कोहचाडेला शिक्षा झाली नव्हती. कोहचाडेला शिक्षा होण्याचे हे पहिलेच प्रकरण होते. कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांच्या कार्यकाळात वाहनचालक म्हणून विद्यापीठात रुजू झालेला कोहचाडे पुढे उपकुलसचिव पदापर्यंत पोहोचला. कुलगुरू चोपणे यांच्या कार्यकाळात त्याने संपूर्ण भ्रष्टाचार केला. मात्र, पुराव्याअभावी त्याला एकाही प्रकरणात शिक्षा झाली नव्हती. मुख्य म्हणजे त्याच्यासोबतच्या इतर आरोपींचीदेखील निर्दोष मुक्तता झाली. वाहनचालक म्हणून नोकरीची सुरुवात करणारा कोहचाडे गॅरेज चालवत होता.
बातम्या आणखी आहेत...