नागपूर - १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकूब मेमनला ३० जुलै रोजी नक्की फाशी दिली जाणार की नाही याबाबत तर्क- वितर्क लढवले जात अाहेत. मंगळवारी त्याचा चुलतभाऊ उस्मान मेमन हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात याकूबची भेट घेण्यासाठी आला होता. परंतु कारागृह प्रशासनाने उस्मानला याकूबच्या भेटीची परवानगी नाकारली.
याकूबला ३० जुलै रोजी फाशी देण्यासंदर्भात विशेष टाडा कोर्टाने काढलेल्या ‘ब्लॅक वॉरंट’ला स्थगिती देण्याची मागणी करणारी फौजदारी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे याकूबची संभाव्य फाशी टळू शकते, अशी कायदेतज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी ४ वाजता याकूबचा चुलतभाऊ उस्मान हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात आला. त्यापूर्वी दुपारी ३.३० च्या सुमारास याकूबचा नागपुरातील वकील अनिल गेडाम हे कारागृहात दाखल झाले आणि त्यांनी याकूब व उस्मानच्या भेटीसाठी कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांना अर्ज दिला. परंतु योगेश देसाई यांनी महाराष्ट्र कारागृहाच्या नियमानुसार याकूबच्या भेटीसाठी परवानगी नाकारली.
याकूबला भेटण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून अॅड. गेडाम यांनी बराच प्रयत्न केला. उस्मान जवळपास तीन तास म्हणजे संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कारागृहाच्या मुलाखत कक्षात होता. परंतु प्रशासनाने त्यांना परवानगी दिली नाहीच. शिवाय कारागृहातील कैद्यांना भेटण्याची वेळ ही संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच असते. त्यामुळे उस्मानला परतपावली फिरावे लागले. यादरम्यान अॅड. गेडाम यांनी याकूबची भेट घेतली. उद्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेसंदर्भात अनेक दस्तऐवजांवर स्वाक्षरी घेतली. कारागृहातून बाहेर पडताना उस्मान यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
पुढे वाचा... अाता आई भेटीसाठी येणार!