आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्ताचा ताण कमी करण्यासाठी पोलिस अधीक्षकांचे सरप्राईज, पोलिस कर्मचाऱ्यांना नेले सिनेमाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - गणेशोत्सवामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने तनावाच्या स्थितीत बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा त्राण कमी व्हावा यासाठी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या पोलिस कर्मचाऱ्यांना नकळत एक सुखद धक्का दिला. या सुखद धक्क्याने पोलिस कर्मचारीही गहिवरुन गेले होते. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांचा हा फंडा यापूर्वी जिल्ह्यात कुणीही वापरलेला नसल्याने त्याचे अधिकच कौतुक होत आहे. 
 
गेल्या काही वर्षात गणेशोत्सवादरम्यान जिल्ह्यात काही अप्रिय घटना घडल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील बराच भाग अतिसंवेदनशील आणि संवेदनशील परीसर म्हणून ओळखल्या जात होता. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून तयारी चालवली होती. त्या तयारीचा परिणाम म्हणून यंदा जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात शांततेत आणि कायद्याचे भान राखून गणेशोत्सव साजरा झाला. त्यासाठी जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी आणि अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने रात्रंदिवस तनावात बंदोबस्त पार पाडत होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी झटत होते. त्यांच्या या अथक प्रयत्नाला यश येऊन जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत पार पडला. 
 
या बंदोबस्तात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांपैकी प्रत्येक पोलिस ठाण्यातील काही कर्मचारी याप्रमाणे सुमारे २५० कमर्मचाऱ्यांना बुधवारी सकाळी पोलिस मुख्यालयात पाचारण करण्यात आले होते. यावेळी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक अमरसिंह जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयुष जगताप यांनी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यात पोलिस अधीक्षकांनी सर्वांच्या सहकार्यानेच गणेशोत्सव शांततेत पार पडल्याचे सांगत सगळ्यांचे अभिनंदन केले. याचवेळी पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आर्णी मार्गावर गोंधळ झाल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच त्या ठिकाणी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षकांनी तातडीने वाहनात बसून घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले. त्यावरुन सर्व कर्मचारी त्या ठिकाणी असलेल्या पोलिस वाहनात बसले. त्यानंतर या पोलिस वाहनांचा मोठा ताफा आर्णी मार्गाने निघाला. यावेळी नेमके काय झाले हे शहरवासीयांनाही कळत नव्हते. मात्र वेगाने निघालेला हा ताफा अचानक बायपास मार्गावर असलेल्या एलीमेंट मॉलमध्ये येऊन थबकला. मात्र त्याच दरम्यान पोलिस अधीक्षकांनी आपण येथे सिनेमा पहायला आलो असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व कर्मचारी अधिकारी यांनी एकत्र बसून सिनेमाचा आनंद घेतला. 
 
आता तयारी नवरात्री बंदोबस्ताची 
सिनेमा पाहून बाहेर पडल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी त्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यात गणेशोत्सव पार पडला. आता दोन दिवस विश्रांती घ्या आणि नवरात्री उत्सवाचा बंदोबस्त याच पद्धतीने पार पाडण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन केले. त्यासोबतच आजचा अनुभव इतर सहकाऱ्यांशी वाटुन त्यांनाही धन्यवाद द्या असेही सांगितले. 
 
आपलीही काळजी होते ही भावना महत्वाची 
जिल्हा पोलिस दलाच्या प्रत्येक घटकाने केलेल्या सहकार्यामुळे गणेशोत्सवादरम्यान एक साधी अदखलपात्र तक्रारही जिल्ह्यात दाखल झाली नाही. यासाठी गेल्या पंधरादिवस सातत्याने तनावात असलेल्या कर्मचाऱ्यांना थोडा रिलॅक्स मिळावा यासाठी हा उपक्रम राबवला. त्यात शेवटपर्यंत गुढ कायम ठेवण्यात यश आल्याने तो धक्का सुखद ठरला. शेवटी आपलीही काळजी आपला विभाग घेतो ही भावना कर्मचाऱ्यांमध्ये रुजणे आवश्यक होती. 
 
‘मॉक ड्रील’च्या सरावाचा संशय 
पोलिस मुख्यालयातुन अचानक सायरन वाजवून निघालेल्या पोलिस वाहनात बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ही धावपळ मॉक ड्रीलसाठी असेल अशी चर्चा सुरू होती. काहींनी तर एसपी साहेब आपण कीती तत्परतेने कारवाईच्या ठिकाणी पोहचतो हे पाहण्यासाठी आपल्याला पाठवत असल्याचा कयास बांधला. मात्र यापुढे काही वेगळेच घडणार आहे याची साधी कल्पनाही कुणाच्या डोक्यात आली नाही. मात्र चित्रपट पाहून त्यांना आनंद झाला होता. 
 
सिनेमासोबत चहा-नाश्त्याची व्यवस्था 
पोलिस कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे अचानक सिनेमाला नेण्याची कल्पना पोलिस अधीक्षकांच्या पूर्वीच लक्षात असल्याने त्यांनी पूर्वीपासूनच मॉलमधील दोन सिनेमागृह आरक्षित करुन ठेवले होते. त्या ठिकाणी सिनेमा पाहताना कर्मचाऱ्यांसाठी नाश्ता, पाणी, चहा बसल्या जागी उपलब्ध होईल याची व्यवस्थाही करण्यात आली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आनंद झाला. 
बातम्या आणखी आहेत...