आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिवसेना, भाजपने मारली मुसंडी, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी दोन टप्प्यामध्ये मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीचा गुरुवार, २३ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक जागांवर शिवसेनेने विजय मिळवला असून, एक जागा अपक्षाने पटकावली. मात्र, जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करताना अडचणी येण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे पाणीपत करून शिवसेना, भाजपने चांगलीच मुसंडी मारली. गुरुवार, २३ फेब्रुवारी रोजी सर्व १६ तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी झाली. तब्बल २० जागा घेऊन शिवसेना अव्वल, १७ भाजप, ११ काँग्रेस १२ आणि ११ राष्ट्रवादी, तर एक अपक्ष, असे ६१ उमेदवार विजयी झाले. मात्र बहुमतासाठी आवश्यक असलेला जादूचा ३२ चा आकडा गाठताना ओढाताण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 
 
विधानसभेची रंगीत तालीम म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकडे पाहिल्या जाते. त्या अनुषंगाने शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही प्रमुख पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. अत्यंत अटीतटीची निवडणूक होण्याचे संकेत पूर्वीपासून मिळाले होते. पहिल्या टप्प्यात ५५ गट आणि ११० गण तर दुसऱ्या टप्प्यात गट आणि १२ गणासाठी मतदान झाले. दरम्यान, आज जिल्ह्यातील सोळाही तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी झाली. यामध्ये शिवसेनेच्या २०, भाजपच्या १७, काँग्रेस १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ११, एक अपक्ष उमेदवार निवडून आलेला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात जास्त जागेवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. 

गतवेळी जिल्हा परिषदेत काँग्रेस २२, राष्ट्रवादी २१, शिवसेना १३, भाजप ४, मनसे, अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल होते. यामध्ये सुरुवातीच्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी, तर दुसऱ्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. यंदा काँग्रेस, राष्ट्रवादीबाबत मतदारांमध्ये तीव्र रोष व्यक्त केल्या जात होता. हा रोष मतदानाच्या स्वरूपात मतदारांनी दाखवून दिला. परिणामी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडणुकीत पाणीपत झाले. 

यामध्ये दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील पाच गटावर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व गाजवले. यामध्ये दारव्हा तालुक्यातील पाच जिल्हा परिषद सर्कल, दिग्रस तीन आणि नेर तीन, उमरखेड २, यवतमाळ २, महागाव, घाटंजी, कळंब, पांढरकवडा, वणी या ठिकाणी प्रत्येकी एक, असे मिळून २० सदस्य शिवसेनेचे विजयी झाले. तर भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर यवतमाळ तालुक्यातून २, बाभुळगाव २, पुसद २, घाटंजी २, राळेगाव ३, वणी ३, झरी जामणी २, तर महागाव आणि आर्णी तालुक्यातून प्रत्येकी एक, असे मिळून १८ उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे उमरखेड २, महागाव एक, आर्णी ३, कळंब एक, मारेगाव २, पांढरकवडा दोन, असे मिळून ११, राष्ट्रवादी पुसदमध्ये ६, उमरखेड २, महागाव २, पांढरकवडा एक, असे मिळून ११, तर कळंबमध्ये तालुका विकास आघाडीकडून एक उमेदवार विजयी झाला आहे. अशा परिस्थितीत जादुई ३२ चा आकडा गाठण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पाणीपत करून शिवसेना, भाजपने सर्वाधिक जागांवर विजय संपादन केला आहे. 
 
विजयानंतर उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा जल्लोष : तालुक्याच्या ठिकाणी आज सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण आकडेवारी जमा झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात उमेदवार विजयी झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले. अशा परिस्थितीत उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक दिसून येत होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात विजयी उमेदवारांचे नाव घोषित करताच गुलाल उधळला. 
 
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, यवतमाळमधील जिल्‍हा परिषद आणि पंचायत समित्‍यांचे निकाल
बातम्या आणखी आहेत...