आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्गजांचा झाला दारूण पराभव, यवतमाळ जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना-भाजपची धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष, अर्थ बांधकाम सभापती, तर माजी उपाध्यक्ष, दोन माजी सभापतींसह विद्यमान सदस्यालाही मतदारांनी चक्क घराचा रस्ता दाखवला. जिल्हा परिषदेत आलेल्या अनपेक्षित निकालामुळे सर्वच नव्या चेहऱ्याला संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. सत्ता स्थापनेकरिता आवश्यक असलेली ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी भाजप, शिवसेनेला कसरत करावी लागणार आहे. 
 
गेल्या पंचवार्षिकमध्ये ६२ गट, तर १२४ गण होते. यामध्ये यंदा फेरबदल झाला असून, ६१ गट आणि १२२ गण झाले. यातही काही गण नव्याने तयार झाले. अशा परिस्थितीत ऑक्टोबर महिन्यातच गटाचे आरक्षण जाहीर झाले होते. तेव्हाच विद्यमान अध्यक्ष, सभापती आणि काही सदस्यांनी सोयीचे सर्कल शोधून प्रचार सुरू केला होता. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी आर्णी तालुक्यातील लोणी-जवळा गटातून उमेदवारी देण्यात आली.
 
त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून किरण मोघे होती. या ठिकाणी विद्यमान अध्यक्षाला पराभव पत्कारावा लागला. असाच काहीसा फटका बोरी-तळेगाव गटातून विद्यमान अर्थ बांधकाम सभापती सुभाष ठोकळ यांना बसला. त्यांना शिवसेनेचे श्रीधर मोहोड यांनी पराभूत केले. 

लाडखेड गटातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणाऱ्या समाजकल्याण सभापती लता खांदवे यांना शिवसेनेच्या विनोद खोडे यांनी पराभूत केले. मोहा ई- भंडारी गटातून माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ययाती नाईक यांना भारतीय जनता पक्षाच्या अमेय नाईक यांनी पराभव चाखण्यास भाग पाडले. पार्डी गटातून माजी सभापती देवानंद पवार यांचा भाजपचे आशिष लोणकर यांनी निसटता पराभव केला.
 
ईचोरा गटातून माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, तर मुळावा जिल्हा परिषद गटातून माजी बांधकाम सभापती तातू देशमुख यांना काँग्रेसचे बंडखोर चिंतागराव कदम यांनी शिवसेनेच्या तिकिटावर पराभूत केले. गेल्या पंचवार्षिकमधील बोटावर मोजण्याईतक्याच सदस्याला परत जिल्हा परिषदेमध्ये येण्याचा चान्स मिळाला, तर दिग्गज नेत्यांना मात्र पराभव स्वीकारण्याची वेळ आली. मतदारांनी त्यांना घराचा रस्ता दाखवला. 
 
बातम्या आणखी आहेत...