आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती : राजुरा बेड्यावर युवकाचा चाकूने भाेसकून खून; चार जणांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती : घरासमोर गोंधळ घालणाऱ्या परिसरातीलच चौघांना समजवण्यासाठी गेलेल्या एका ३२ वर्षीय युवकाच्या छातीत चाकू भोसकून निर्दयीपणे खुन करण्यात आला. ही घटना रविवार, २९ मे रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास राजुरा बेड्यावर घडली. या प्रकरणातील मुख्य मोरकऱ्यांसह चारही जणांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली आहे. 
 
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार खुद्दार पुरणसिंग पवार (३२, रा. राजुरा बेडा) असे मृतक युवकाचे नाव आहे. खुद्दारच्या खूनप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी टेरलींग रामसागर पवार (५५), सुदेश टेरलींग पवार (३०), अजय नूरमन भोसले (२३) आणि अरुण टिल्लू सोळंके (३५, सर्व रा. राजुरा बेडा) यांना अटक करण्यात आली आहे. खुद्दार शहरातीलच एका हॉटेलमध्ये काम करत होता. त्याच्या घरासमोर रविवारी रात्री टेरलींग, त्याचा मुलगा सुदेश, अजय आणि अरुण हे चौघे दारु पिऊन गोंधळ घालून भांडण करत होते. या चौघांचा पैश्याच्या वाटण्यांवरून वाद सुरू होता. 
दरम्यान बराचवेळ पासून हे चौघेही घरासमोर कल्लोळ करत असल्यामुळे घरात झाेपलेला खुद्दार उठून बाहेर आला. त्याने या चौघांनाही त्याठिकाणाहून निघून जाण्यास सांगितले. यावेळी टेरलींगने क्षणाचाही विचार करता खुद्दारच्या छातीत चाकू भोसकला. हा वार इतका गंभीर होता कि, खुद्दार घटनास्थळीच रक्तबंबाळ होवून खाली कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
 
या घटनेची माहीती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळताच ठाणेदार पंजाबराव वंजारी आपल्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी मारेकऱ्यांची माहीती काढली. त्यावेळी टेरलींग त्याचा मुलगा सुदेश नागपूर महामार्गावरील पिंपळविहीर या गावी गेल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांचे एक पथक पिंपळविहीरला रवाना झाले होते. पोलिसांनी पहाटे तीन वाजताच्या सुमारास टेरलींग सुदेशला पिंपळविहीरमधून ताब्यात घेतले. तसेच अन्य एक पथक अरुण अजय यांचा शोध घेत होते. हे दोघेही बेड्याला लागून असलेल्या जंगलात दडून बसले होते. पोलिसांनी त्यांनाही हुडकून काढत पहाटे चार वाजता ताब्यात घेतले. या प्रकरणी ख़ुद्दारची पत्नी रजनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांनाही पहाटे अटक केली आहे. ही कारवाई फ्रेजरपुराचे ठाणेदार पंजाबराव वंजारी यांच्या नेतृत्वात एपीआय सतीश इंगळे, पीएसआय जितेंद्र ठाकूर,गौतम धुरंधर, ईशय खांडे, शशिकांत शेळके, वचन पंडीत, विनय गुप्ता, रवि देशमुख, सतीश विघे आणि प्रविन्द्र राठोड यांनी केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...