आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीस्वार युवकाचा कारच्या धडकेत मृत्यू, महामार्गावरील पिंपळविहीर गावाजवळील अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळविहीर गावाजवळ एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरूवारी (दि. ३१) रात्री नऊ वाजताच्या सुमारास झाला आहे. 
 
अक्षय रामचंद्र साबळे (२१, रा. अनकवाडी, ता. तिवसा) असे मृत युवकाचे नाव आहे. अक्षय हा दुचाकीने अमरावतीवरून अनकवाडी जाण्यासाठी निघाला होता. नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिंपळविहीर गावापासून शेंदोळा (बु.) गावाकडे जाण्यासाठी महामार्गावरून वळण घ्यावे लागते. याच वळणावर कारने (क्रमांक एम. एच. ३१ ईके ५७९१) अक्षयच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीसह कारसुद्धा क्षतीग्रस्त झाली आहे. या धडकेत अक्षयच्या डोक्याला इतरत्र गंभीर दुखापत झाली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नांदगाव पेठ पोलिस गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अक्षय गंभीर असल्यामुळे त्याला उपचारासाठी इर्विन रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच शुक्रवारी (दि. १) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी शुक्रवारी कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. अक्षयच्या आकस्मिक मृत्यूने अनकवाडी गावात शोककळा पसरली आहे. 
 
अक्षय काही दिवसांपूर्वीच एका मायक्रो फायनान्स कंपनीत रुजू झाला होता. दरम्यान त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याची अमरावीतवरून कोल्हापूरला बदली झाली होती. त्यामुळे कार्यालयातील इतर सहकाऱ्यांनी बदलीवर जाणाऱ्या सहकाऱ्याला निरोप दिला. हा निरोप समारंभ कार्यालयातच ३१ ऑगस्टला दुपारी पार पडला. त्यानंतर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अक्षय कार्यालयातून बाहेर पडला शहरातून गावी जाण्यासाठी निघाला होता. मात्र २६ किलोमीटर जाताच त्याच्यावर काळाने झेप घेतली. 
बातम्या आणखी आहेत...