आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बियांचे गोळे घेऊन शहरातील वृक्षप्रेमी युवक निघाले पर्यटनाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जून महिन्यात पावसाला सुरुवात होणार. निसर्ग हिरवागार होणार. परंतु, हा हिरवेपणा काही काळासाठीच टिकत असतो. पावसाळा संपला की हिरवा रंग पिवळ रुक्ष वाटायला लागतो. निसर्गाचा हिरवेपणा कायम टिकावा म्हणून शहरातील वृक्षप्रेमी युवक-युवती पर्यटनाला निघताना त्यांच्यासोबत बियांचे गोळे (सीड बाॅल्स) घेऊन जात आहेत. उद्देश हाच की, या शेणमिश्रित मातीत टाकलेल्या बिया पाऊस आल्यानंतर रुजाव्या आणि त्यांची झाडे तयार व्हावीत.
 
सध्या सोशल मिडियावरील युवकांच्या ग्रुपवर फिरण्याचे कार्यक्रम निश्चित होत असून निघताना प्रत्येकाने स्वत:सोबत सीड बाॅल्स सोबत घ्यावेत असे आवाहनही केले जात आहे. हे आवाहन केवळ युवकांसाठीच नसून सर्वांसाठीच आहे. काही युवक मुद्दाम स्वत:च्या वाहनाने पर्यटनाला निघत असून वाहनाच्या डिक्कीत सीड बाॅल्स ठेऊन सोबत घेऊन जात आहेत. ज्या ठिकाणी कोणतीही झाडे नाहीत अशा ठिकाणी अगदी चेंडू फेकतो त्याप्रमाणे ही सीड बाॅल्स फेकली जात आहेत.
 
शहरातील अनेक वृक्षप्रेमी, वनप्रेमी युवकांचे गट जिल्हा, विभागच नव्हे तर राज्याच्या पर्यटनाला निघाले असून सोबत सर्वांनी सीड बाॅल्स घेतले आहेत. सर्वांचा उद्देश एकच की आपण या बिया फेकतो तेथे एखाद दुसरे झाड तरी उगवावे. यामुळे हिरवाईत निश्चितच भर पडेल. सोबतच निसर्गाचा समतोल राखण्यासाठीही आपला हातभार लागेल.
 
प्रत्येक झाड हे मनुष्यासाठी वरदान आहे. ते आपल्याला केवळ देत असते. आपल्याकडून त्याला काहीच नको. आपल्याला केवळ केवळ बिया टाकायच्या आहेत.
या बिया अशा झाडांच्या आहेत ज्या एकदा रुजल्या की त्यांना फारशी देखभालीची आवश्यकता नाही. यात बोरं, जांभळं, चिंच, आवळा, आंबा, कवठ, निंबोळ्या अशा फळं सावली देणाऱ्या झाडांच्या बियांचा सीड बाॅल्समध्ये समावेश आहे. जी झाडे गर्द शीतल सावली, फळं तर देतात सोबतच जमिनीतील पाणीही धरून ठेवतात अशा झाडांच्या बिया सीड बाॅल्समध्ये टाकून त्या सर्वत्र फेकण्यासाठी युवक पर्यटनाला निघाले आहेत. वृक्षप्रेमी युवकांचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी हितकारक ठरणारा आहे.
 
उपयुक्त झाडांच्या बियांपासून बनवले गोळे
जांभळं,बोरं,निंबोळ्या, चिंच, आवळा तसेच अन्य झाडे ज्यांच्या बिया फेकल्यानंतर झाडं उगवतात अशा झाडांच्या बिया वर्षभर गोळा करून किंवा मागवून त्याचे गोळे तयार केले आहेत. याला आम्ही सीड बाॅल्स म्हणतो. हे गोळे मुद्दाम फिरण्यासाठी निघून स्थळांची निवड करून तेथे फेकून देतो. नीलेशकांचनपुरे, सदस्य, पाेहरा जंगल बचाव समिती.
बातम्या आणखी आहेत...