आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लैंगिक शोषण प्रकरण; सहा दिवसांनंतर वाजली 'वायपीएस'ची घंटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- शहरातील दर्डानगर परिसरात असलेल्या वायपीएस शाळेत घडलेल्या लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घृणास्पद घटनेचा जिल्ह्यात सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी बंद पाळून प्रशासनाला कठोर कारवाईसाठी निवेदन देण्यात येत आहे. याच गडबडीत मुलांच्या शैक्षणिक नुकसानीची सबब पुढे करत मंगळवारपासून वायपीएस शाळा सुरू करण्यात आली. मात्र, आज पहिल्या दिवशी केवळ २०० विद्यार्थी शाळेत उपस्थित होते, तर पालक वर्ग झालेल्या घटनेने धास्तावलेला असून, आपल्या पाल्यांच्या सुरक्षेबाबत साशंकता व्यक्त करत आहे.

वायपीएस शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणात संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांना अटक करण्यात आली असल्याने शहरातील नागरिकांचा संताप काही प्रमाणात शांत झाला असला तरी आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर शाळा सुरू करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत होती. मात्र, शाळेतील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यावर पालकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे यासाठी आता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत शाळा सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी प्रशासनाच्या वतीने शाळेवर नियंत्रक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या शिक्षणाधिकारी यांनी शाळा सुरू केली. मात्र, शाळेत असलेल्या एक हजार ४६७ विद्यार्थ्यांपैकी केवळ २०० विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत आले होते. त्यावरून पालकांमध्ये असलेली धास्ती अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सकाळी वायपीएस शाळेत काही पालक एकत्र आले होते. त्यांनी प्रशासनाने पालकांची एक बैठक घेऊन त्यात सूचना द्याव्या आणि त्यानंतर शाळा सुरू करावी, अशी मागणी केली होती. मात्र, प्रशासनाच्या वतीने अशा प्रकारची अद्याप कुठलीही बैठक घेऊन शाळा सुरू करण्यात येत असल्याच्या सूचना पालकांना दिल्या नसल्याचे या वेळी सांगण्यात आले. त्यामुळे अद्याप पालक संभ्रमावस्थेत असल्याचे दिसत आहे. आता प्रशासकांनी या शाळेचा कारभार पाहावा अशी मागणी होत आहे.

असेकृत्य करणाऱ्यांना ठार मारले पाहिजे : नांदगावकर
आजभेट दिली असता त्या ठिकाणी घडलेला घृणास्पद प्रकार ऐकला. त्या वेळी असे कृत्य करणाऱ्यांना ठार मारले पाहिजे, असेच मला वाटते. शेवटी मीही एक पालक आहे. मलाही दोन मुली आहेत. त्यामुळे मी पालकांचे दु:ख समजू शकतो, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे नेते बाळासाहेब नांदगावकर यांनी मंगळवारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

या वेळी बाळासाहेब नांदगावकर पुढे म्हणाले की, वायपीएस शाळेत घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. आम्ही पक्षाच्या मेळाव्यात व्यस्त असल्याने त्याची माहिती उशिरा मिळाली. त्यामुळे मी या ठिकाणी उशिरा दाखल झालो, त्यासाठी मी माफी मागतो, असेही ते म्हणाले. मात्र, आज यवतमाळ येथे येताच सर्वप्रथम मी पालकांची भेट घेऊन त्यांचा संताप ऐकून घेतला. या प्रकरणात पालकांनी व्यक्त केलेला संताप चुकीचा नाही. त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांचा आजही शाळेवर विश्वास आहे, असे दिसून आले. मात्र, शाळेतील शिक्षक आणि शाळेचे ट्रस्टी यांच्यावर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत शाळेत मुलांना कुणाच्या भरवशावर पाठवायचे, असा प्रश्न त्यांनी केला आहे. पालकांशी बोलताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन महिला पालकांचा संपर्क करून दिला. त्या वेळी राज ठाकरे यांनी मी तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे, असा धीर पालकांना दिल्याचेही ते बोलले. ते पुढे म्हणाले की, या प्रकरणासंदर्भात मी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि नव्याने नियंत्रक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या सुचिता पाटेकर यांच्याशी चर्चा केली. त्यात त्यांना पालकांची बैठक घेऊन प्रशासन त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास देण्याबाबत सांगितले. या प्रकरणाची जबाबदारी असलेले विजय दर्डा अद्याप समोर आलेले नाही. ज्या यवतमाळकरांनी त्यांना भरभरून प्रेम दिले, आज त्याच लोकांसोबत ते असे वागत आहेत. त्यामुळे तेही गुन्हेगार तर नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो. त्यांनी आजपर्यंत इतका पैसा या महाराष्ट्रातच कमावला, मात्र त्यांच्या शाळेत इतकी गंभीर घटना घडल्यानंतरही ते जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. या प्रकरणात पालकांनी तक्रार केल्यानंतरही शाळा व्यवस्थापनाच्या ज्यांनी ही तक्रार दडवून ठेवली ते सर्व या प्रकरणात समान दोषी आहेत. त्यामुळे या प्रकरणात कलम ३४ लावण्यात यावे त्यासोबतच लैंगिंक शोषणाचा गुन्हा आणि हे पूर्वनियोजित केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. त्यासोबत शाळेवर किमान दोन वर्षांसाठी तरी प्रशासक बसवावा, अशीही मागणी त्यांनी केली.

या प्रकरणात पालकांवर दंगलीचे गुन्हे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्याशी मी चर्चा करून त्यांना या प्रकरणात पालकांच्या वतीने वकीलपत्र घेण्याची विनंती केली असल्याचेही ते बोलले. या पत्रकार परिषदेला मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, राज्य उपाध्यक्ष आनंद ऐंबडवार, राजू उंबरकर, देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, वर्धा जिल्हाध्यक्ष अजय हेडाऊ, विकास पवार, संजय देठे आदी उपस्थित होते.

शहरातपोलिस बंदोबस्त कायम : वायपीएसशाळेत घडलेल्या घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून शहरात नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याकडून करण्यात येत असलेली निदर्शने पाहता कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरातील हा बंदोबस्त आज घटनेच्या सातव्या दिवशीही कायम होता. त्यातच किशोर दर्डा यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने त्यांना ठेवण्यात आलेल्या शहर पोलिस ठाण्यासह न्यायालयाच्या परिसरात सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर दर्डा यांना न्यायालयात हजर करण्यासाठी शहर पोलिस ठाण्यातून ताफा बाहेर पडताच न्यायालयाकडे येणाऱ्या सर्व मार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती.

निकालाचीलागली होती उत्कंठा : मंगळवारीकिशोर दर्डा यांची एक दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात नेण्यात आले. यावेळी त्यांना न्यायालय पोलिस कोठडी वाढवून देणार की, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात येणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. न्यायालयाच्या निर्णयापर्यंत सोशल मिडीया आणि फोनद्वारे मेसेज फॉरवर्ड होताना दिसत होते.

दगडफेक कुणाच्या आदेशावरून?
रविवारी यवतमाळात पालकांचे आंदोलन सुरू असताना एका बाजूने दगडफेक सुरू झाली. त्यातले दगड पालकांनाही लागले. त्यामुळे पालकांनी ते फेकले नाही हे नक्की. त्यामुळे आता हे दगड कुणाच्या आदेशावरून तर फेकण्यात आले नाही ना, याची चौकशी करणे महत्त्वाचे असल्याचे सांगत नांदगावकर यांनी टोला लावला.

मंगळवारी वायपीएस शाळा सुरू करण्यात आली यावेळी त्या ठिकाणी असा पोलिस बंदोबस्त लावला होता. पत्रकार परिषदेत बोलताना मनसेचे नेते बाळासाहेब नांदगावकर.
बातम्या आणखी आहेत...