आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही बातम्या वाचता, इंटरनेट वापरता काय? न्या. झोटिंग आयोगाचे एकनाथ खडसेंना प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पुणे जिल्ह्यातील भोसरी एमआयडीसीमध्ये पत्नी आणि जावयाने जमीन खरेदी केल्याची ६ जून २०१६ पूर्वी आपल्याला कल्पनाच नव्हती, असे घूमजाव करणारे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना सोमवारी आयोगाने तुम्ही वर्तमानपत्रे वाचता काय, बातम्या वाचता काय, असे प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तरे देताना खडसे यांनी आपली भूमिका कायम ठेवली.  
 
सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास खडसे पुन्हा एकदा न्या. झोटिंग आयोगाच्या समक्ष सुनावणीसाठी हजर झाले. सोमवारी स्वतः आयोगानेच त्यांना काही प्रश्न केले. त्या प्रश्नांनंतरही खडसे पत्नी आणि जावयाने संबंधित जमीन खरेदी केल्याची आपल्याला ६ जून २०१६ पूर्वी कल्पनाच नव्हती, या आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. वर्तमानपत्रांमध्ये यासंबंधीच्या बातम्या मे महिन्यापासूनच येत होत्या. त्यामुळे खडसे यांना पत्नी आणि जावयाच्या जमीन खरेदीची कल्पना कशी नव्हती, असा प्रश्न एमआयडीसीच्या वकिलांनी आयोगापुढे वारंवार उपस्थित केला आहे. 

त्या पार्श्वभूमीवर न्या. दिनकर झोटिंग यांनी स्वतःच खडसे यांना तुम्ही पेपर वाचता काय, बातम्या वाचता काय, इंटरनेटचा वापर करता काय..वगैरे प्रश्न केले. त्या प्रश्नांना खडसे यांनी उत्तरेही दिली. मात्र, जमीन खरेदीची सुरुवातीला कल्पना नव्हती, या दाव्यावर ते ठाम राहिले. याशिवाय आयोगाने खडसे यांना अनेक प्रश्न विचारून त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
दरम्यान, सोमवारची सुनावणी दुपारी दोन वाजताच संपविण्यात आल्याने अपूर्ण राहिली. आयोगाने उद्याही सुनावणी ठेवली असून त्याला खडसे हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील सुनावणीत खडसे यांनी जमीन व्यवहाराची कल्पना नसल्याचे सांगताना आपण मुंबईला तर पत्नी जळगावला राहते, याकडे आयोगाचे लक्ष वेधले होते.
बातम्या आणखी आहेत...