अमरावती - माहिती तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास झाला आहे. पाच वर्षांपूर्वी ठराविक व्यक्तींपर्यंत पोहोचणारा सोशल मिडिया या अलिकडच्या काळात स्मार्ट फोनमुळे शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत सोशल मीडियाचा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांचा सायबर सेल सोशल मीडियावर विशेष ‘वॉच’ ठेऊन आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीची आचांरसंहिता सुरू झालेली आहे. काही उमेदवार, उमेदवाराचे हितचिंतक, पक्ष
आपआपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपआपल्यापरिने प्रयत्न करत असतात. निवडणुकीमध्ये लाऊड स्पीकर, पोस्टर, बॅनर, फलक या पारंपरिक प्रचार पद्धतीमध्ये यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियासुद्धा महत्वाचा ठरणारा आहे. कारण सद्या ग्रामीण भागातील ‘युथ’सुद्धा स्मार्ट फोन वापरत आहे. त्यामुळे पांरपारिक प्रचार पद्धतींसोबत सोशल मीडियावर केलेला प्रचार निर्णायक ठरू शकतो, ही बाब प्रत्येकाला ज्ञात आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेल सोशल मीडियावर लक्ष ठेवतच आहे.
तूर्तास निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी अजूनही अनेक उमेदवारांची निश्चिती झालेली नाही. त्यामुळे जितके उमेदवार निवडणूकीसाठी ईच्छूक आहेत, ते सुद्धा सोशल मीडियावर आपआपल्या पद्धतीने आपले कार्य मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडिया हा कमी वेळात अत्यल्प खर्चात अधिक व्यक्तींपर्यंत पोहचण्याचा सद्या असलेल्या साधनांमध्ये प्रभावी माध्यम आहे. मात्र सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष असल्यामुळे सोशल मीडियाचा वापरसुद्धा अडचणीत आणणारा ठरण्याची शक्यता आहे.
प्रत्येक तक्रारीची दखल घेणार
सायबरसेलची यंत्रणा सोशल मीडियावर लक्ष ठेवून असतेच मात्र निवडणूक काळात आमचा अधिक वॉच आहे. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची आम्ही तत्काळ दखल घेऊन संबधितांवर कारवाई करणार आहे.'' -विशाल खलसे, एपीआयसायबर सेल प्रमुख, ग्रामीण पोलिस.