आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळंबमध्येही मराठा मोर्चाची ‘क्रांती’, मुस्लिम, जैन समाजाचा दिला पाठिंबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब : तोंडातून एकही शब्द नाही की कानठळ्या बसणाऱ्या घोषणा नाहीत. एका रांगेत लाखावर समाजबांधव एकत्र येऊन आपल्या न्याय्य हक्कासाठी प्रशासनाकडे निवेदन देऊन परत शिस्तीत परततो. कुठलाही गोंधळ, गडबड न करता, मोर्चानंतर झालेला कचरा गोळा करून तरुण-तरुणी शिस्त घालून देतात. एखाद्या मोर्चातला असा हा शिस्तीचा पायंडा आणि वेदनेतला नि:शब्द हुंकार कळंबकरांनी इतिहासात प्रथमच अनुभवला. निमित्त होते मराठा मूक क्रांती विराट मोर्चाचे.

कोपर्डी घटनेतील आरोपींना फासावर लटकवा, मराठा समाजाला आरक्षण द्या आदी मागण्यांसाठी राज्यभर जिल्हास्तरीय मोर्चे निघाले. शासनाकडून या मागण्यांची दखल न घेण्यात आल्यामुळे आता तालुकास्तरीय मोर्चे निघत आहेत.
महाराष्ट्रात औरंगाबादनंतर उस्मानाबादेत दुसरा मोर्चा निघाला होता. त्यानंतर मोर्चाचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरले होते. आता तालुकास्तरीय मोर्चे विविध ठिकाणी निघत आहेत. कळंबमध्येही मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि. ७) दुपारी मराठा समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. मात्र, हा मोर्चा कळंबच्या आजवरच्या मोर्चापेक्षा अत्यंत भिन्न ठरला.
मोर्चामध्ये विशिष्ट समाजाची एक लाखावर उपस्थिती, त्यात घोषणाबाजी किंवा न झालेली हुल्लडबाजी, मोर्चानंतर स्वच्छतेसाठी संयोजकांनी केलेले चोख नियोजन, यामुळे कळंबकरांना पहिल्यांदाच असा मोर्चा अनुभवायला मिळाला. मराठा मोर्चासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने तालुक्यातील गावागावात बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीतून तसेच सोशल मीडियावरून समाजाला एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यामुळे ४० ते ५० हजार समाजबांधव मोर्चामध्ये सहभागी होतील, अशी संयोजकांना अपेक्षा होती.
मात्र, अपेक्षेपेक्षा दुपटीने म्हणजेच १ लाखावर समाजबांधव मोर्चामध्ये सहभागी झाल्याने नियोजन कोलमडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, जिल्हा मोर्चात ज्या पद्धतीने शिस्त होती अगदी तशीच शिस्त तालुकास्तरीय मोर्चातही दिसून आली. त्यामुळे गर्दी दुपटीने होऊनही नियोजन कोलमडले नाही. या मोर्चातून समाजबांधवांनी पुन्हा एकदा एकजुटीचे दर्शन घडवले. विद्याभवन हायस्कूलपासून मोर्चाला सुरुवात झाली.
नगर परिषद मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पाच विद्यार्थिनींनी भाषण करून समाजाच्या मनातील भावना मांडल्या. त्यानंतर उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे निवेदन देण्यासाठी केवळ पाच विद्यार्थिनी पुढे आल्या होत्या. मोर्चाला व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दिला होता. त्यामुळे शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

स्वच्छतेची शिस्त येथेही कायम
लाखोंच्या मोर्चानंतरही रस्त्यावर पडलेला कचरा स्वच्छ करून मराठा समाजाने घालून दिलेली स्वच्छतेची शिस्त कळंबमध्येही कायम असल्याचे दिसून आले. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव येणार असल्यामुळे अनेक ठिकाणी चहा, पाणी व नाष्टा, असे स्टाॅल लावण्यात आले होते. त्यामुळे शहरात कचरा होण्याची शक्यता असल्यामुळे येथे स्वयंसेवकांनी मोर्चाच्या पाठीमागे ग्लास व बाॅटल गोळा करून कळंब स्वच्छ केले.

मुस्लिम, जैन समाजाचा दिला पाठिंबा
कुठल्याही प्रकारची चळवळ युवकच घडवून दाखवू शकतात, असे म्हटले जाते. कळंबमध्येही युवक-युवतींनी पुढे येऊन मराठा मोर्चाचे नियोजन केले तसेच मोर्चा यशस्वी पार पाडून दाखवला. या मोर्चाला विविध समाजांनी, संघटनांनी पाठिंबा दिला होता. मुस्लिम संघटनांपासून लिंगायत, जैन, मारवाडी इत्यादी समाजाने पाठिंबा दिला होता.
या आहेत मागण्या
कोपर्डी प्रकरणातील निकाल जलद गतीने व्हावा, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, मराठा समाजाला तत्काळ आरक्षण जाहीर करून अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा, अॅट्रॉसिटीसारख्या कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकर व्हावे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील व्यक्तींना शासकीय नोकरीमध्ये घ्यावे.
आंदोलनातली शांतता
कुठे काही झाले की मराठवाड्यात अाधी त्याचे पडसाद कळंबमध्ये उमटतात. त्यामुळे कळंबकरांनी दगडफेकीसह अनेक दंगली अनुभवल्या आहेत. त्यामुळे बुधवारच्या मूक मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. संवेदनशील असलेल्या शहरात काय होणार, याचीच चिंता दिसत होती. मात्र, मराठा मूक क्रांती मोर्चाने शहराला काहीसा वेगळा अनुभव दिला.
मोर्चामध्ये १ लाखावर समाजबांधव, महिलांसह सहभागी झाले होते. मात्र, कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही, काही घोषणाबाजी नाही. त्यामुळे पोलिसांवरही ताण आला नाही. मोर्चामध्ये महिला, मुली, वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, तरुण, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी,
मजूर, विविध संघटनांतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध पक्षांतील समाजाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...