आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनात अपशकुन करू नका; विवेकानंद आश्रमाकडून ‘अं.नि.स.ला प्रत्त्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवरा आश्रम- ९१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे आयोजित करणे निश्चित झाल्यानंतर आयोजक विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष शुकदास महाराज यांच्या चारित्र्यावर पुन्हा एकदा शिंतोडे उडवण्याचे काम अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव व त्यांच्या सहकाऱ्यांनी चालवले होते. त्यांच्या सर्व आरोपांना विवेकानंद आश्रमाचे मुख्य प्रवक्ते तथा सचिव संतोष गोरे यांनी सोमवारी विवेकानंद आश्रमातच पत्रकार परिषद घेऊन चोख प्रत्युत्तर दिले. 

शुकदास महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करू नये, असा मनाई हुकूम २००१ मध्ये अकोल्याच्या सहदिवाणी न्यायाधीशांनी बजावला होता. त्या आदेशाचे उल्लंघन मानव व त्यांचे सहकारी करत असून, हा प्रकार म्हणजे कोर्टाचा अवमान आहे. तसेच, साहित्य संमेलनाच्या तोंडावर निव्वळ चीप पब्लिसिटी मिळवण्याचा त्यांचा खटाटोप आहे, या शब्दांत गोरे यांनी अंनिसवर टीकास्त्र डागले. या संमेलनासाठी आवर्जुन या, साहित्यातील रसिकता अनुभवा, असे निमंत्रणही गोरे यांनी मानव यांना दिले.  

पत्रकार परिषदेत गोरे म्हणाले, ‘इतकी तपश्चर्या करून मला हेच सत्य कळले, की प्रत्येक जीवाच्या ठिकाणी भगवंतांचा वास आहे, याखेरीज ईश्वरबिश्वर आणखी काहीही नाही. जीवाची सेवा हीच ईश्वर सेवा होय.’ या युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना जीवनाचे ध्येय मानून मानवहितकारी संत, कोट्यवधी व्याधीग्रस्तांना अॅलोपॅथीसारख्या अतिउच्च चिकित्सा पद्धतीद्वारे व्याधीमुक्त करणारे कुशल धन्वंतरी शुकदास महाराज यांनी आपले जीवन व्यतीत केले. त्यांनी कधीही कुणाचे शोषण केले नाही, फसवणूक केली नाही! आजही विवेकानंद आश्रमाच्या रूपाने या क्षेत्रांत संस्थात्मक काम केले जात असून, दरिद्री, पीडित, रोगी, अज्ञ हेच आमचे देव आहेत. आज संस्था त्याच आदर्शावर वाटचाल करत आहे, असा विश्वासही गोरे यांनी व्यक्त केला. 
 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव व त्यांचे सहकारी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे आणि प्रसारमाध्यमांद्वारे शुकदास महाराज व विवेकानंद आश्रम या संस्थेवर घाणेरडे आरोप करत आहेत. मानहानी करत आहेत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची आम्ही स्वतंत्र नोंद घेत आहोत. त्याचे रेकॉर्डिंगही करत आहोत. या पत्रपरिषदेद्वारे आम्ही श्याम मानव व त्यांच्या सहकाऱ्यांना आठवण करून देऊ इच्छितो, की सहदिवाणी न्यायाधीश, अकोला यांनी आपणास १५ डिसेंबर २००१ च्या विवेकानंद आश्रमाच्या याचिकेवरील निकालात सुस्पष्टपणे शुकदास महाराज अथवा विवेकानंद आश्रमाविरोधात कोणत्याही हेतूने, कोणत्याही माध्यमांद्वारे बदनामीकारक वक्तव्ये करू नये, असा मनाई हुकूम जारी केलेला आहे. यापूर्वीही दोनवेळा आपण अशाप्रकारे पूजनीय महाराजांवर चिखलफेक करणारे, त्यांचे चारित्र्यहनन करणारे आरोप केले आहेत. या आरोपांना आपण “भंडाफोड” असे म्हणत आला आहात. माननीय सहदिवाणी न्यायालयाचा आदेश आमच्या बाजूने असतानाही आपल्या आरोपांकडे आम्ही जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. परंतु, आता ९१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन विवेकानंद आश्रमात आयोजित करणे प्रस्तावित आहे, त्या पार्श्वभूमीवर आपण पुन्हा शुकदास महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून सहदिवाणी न्यायालयाच्या मनाई हुकमाचे उल्लंघन करत आहात. हा एक प्रकारे न्यायालयाचा अवमान असून, आपणाविरोधात न्यायालयीन अवमाननेची केस कोर्टात दाखल करण्यासाठी आम्ही लवकरच पाऊल उचलणार आहोत, असा इशाराही गोरे यांनी दिला. 
बातम्या आणखी आहेत...