आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलंब्रीच्या बाबाचे पाणी पिण्यासाठी बुलडाण्यात रांगा; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- अनेक असाध्य आजारांवर बाबाचे पाणी जादू करत असून पाणी प्यायल्यानंतर आजार बरे होतात अशी श्रद्धा बसलेल्या  बुलडाणा तालुक्यातील (दहीद बु.) येथील गावकऱ्यांनी पाणीवाले बाबाचे पाणी पिण्यासाठी रांगा लावल्या अाहेत. हे पाणी  विनामूल्य मिळत असले तरी दक्षिणेच्या स्वरूपातून हजारो रुपयांंची माया जमवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धाव घेऊन या प्रकाराबाबत पोलिसांना कळविले आहे. बाबाला २२ ऑक्टोबर रोजी पोलिस ठाण्यात हजर करणार आहेत.  
 
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील आळंदजवळ असलेल्या जातवा या गावचे अशोक नथ्थू पवार (५६) ऊर्फ अशोक बाबा पाणीवाले यांची मराठवाड्यातील अंनिसच्या आंदोलन व पाठपुराव्यामुळे हकालपट्टी करण्यात आली होती. वडोदाबाजार पोलिस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाला होता. हकालपट्टी झाल्याने पाणीवाले बाबांनी बुलडाणा तालुक्यातील (दहीद बु.) येथे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात हनुमान मंदिरासमोर ठिय्या दिला आहे. दर शनिवारी या ठिकाणी हजारो रुग्ण बाबांकडे पाणी पिण्यासाठी येत आहेत. बाबा विनामूल्य पाण्याचे औषध देत असून, रुग्ण ते ग्रहण करत आहेत. या बदल्यात महाराजांचे शिष्य लोकांसमोर फिरून डब्यामध्ये पैसे गोळा करत आहेत. बाबांचे पाणी पिण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी मात्र याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. पाणीवाले बाबा आता वेगवेगळ्या ठिकाणच्या मंदिरावर जाऊन विनामूल्य पाणीवाली औषधी वाटप करत आहेत.  

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भेट   
अंधश्रद्धा निमूर्लन समितीला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी नरेंद्र लांजेवार, पंजाबराव गायकवाड व अन्य सदस्यांनी भेट दिली. त्यांनी या ठिकाणी पाण्याची तपासणी केली असता मीठमिश्रित पाणी असल्याचे समितीला जाणवले. समितीने याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली असून, पोलिसांनी बाबाला शहर पोलिस स्टेशनला बोलावले असल्याची माहिती नरेंद्र लांजेवार यांनी दिली.

लोकांचा औषधीवर विश्वास लाेकांच्या विश्वासाने संजीवनी मुळीचे औषध वाटप करत आहोत. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी एकदा मला अटक केली होती. परंतु गावकऱ्यांनीच मला बाहेर काढले. जातवा मूळ गावी गर्दी मावत नसल्याने गावकऱ्यांच्या आग्रहास्तव आल्याचे पाणीवाले अशोकबाबा सांगतात.   

या आजारासाठी देतात पाणी  
पाणीवाले बाबा जे पाण्यात वनौषधीचे मूळ टाकतात ते ग्रहण केल्यास हमखास कोणताही आजार बरा होतो. त्यातही अल्सर, मूतखडा, थायराॅइड, कावीळ, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, डोळ्यांची, छातीची जळजळ, पोटदुखी, स्त्रियांचे आजार बरे होत असल्याचा दावा बाबांकडे केला जातो.
बातम्या आणखी आहेत...