आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक: जिल्हाधिकारी कक्षात तिघांनी घेतले विष; यवतमाळमधील खळबळजनक प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी कक्षाच्या बाहेरील प्रतिक्षालयात एका शेतकरी कुटुंबीतील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षक रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाताना. - Divya Marathi
जिल्हाधिकारी कक्षाच्या बाहेरील प्रतिक्षालयात एका शेतकरी कुटुंबीतील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षक रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाताना.
यवतमाळ- शेतीच्या वादावरून दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथील एकाच कुटुंबातील तीन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना गुरुवार, २७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ही घटना लक्षात येताच उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता गृहात त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. उमेश दत्तासिंग गौतम वय २८, आशिष अरुण गौतम वय ३२ आणि कुंदनसिंग रामचरणसिंग गौतम सर्व रा. डोल्हारी ता. दारव्हा अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तिघांची नावे आहे. 

दारव्हा तालुक्यातील डोल्हारी शेंद्री गावात सरस्वतीबाई बैस यांची पाच हेक्टर आठ आर शेती होती. २००४ मध्ये मृत्यूपूर्वी त्यांनी हिस्सेवाटणी दस्त करून ही शेती गंगाबाई ठाकूर, रवी जनकवार, अमोल ठाकूर या तिघांच्या नावे केली. मात्र, उमेश गौतम, आशिष गौतम, सोनू गौतम कुंदनसिंह गौतम यांनी जमिनीवर हक्क सांगून न्यायालयात आव्हान दिले. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून परिस्थिती जन्य पुरावे तपासून निर्णय दिला. हा निर्णय गंगाबाई ठाकूर, रवी जनकवार अमोल ठाकूर यांच्या बाजूने लागला. शेतीचा ताबा विरोधी पक्षाकडून खाली करून गंगाबाई ठाकूर यांच्यासह रवी जनकवार, अमोल ठाकूर यांना देण्याचेही न्यायालयाने पोलिसांना दिलेल्या आदेशात नमूद केले होते. 

दरम्यान २०१४ मध्ये दारव्ह्याचे तत्कालीन ठाणेदार सूर्यकांत राऊत यांनी पोलिस पथकासह डोल्हारी (शेंद्री) गावात जाऊन शेतीचा ताबा खाली करून गंगाबाई ठाकूर इतर दोघांना देण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर उमेश गौतम, आशिष गौतम, सोनू गौतम, कुंदनसिंग गौतम या चौघांनी वरिष्ठ न्यायालय, जिल्हाधिकारी, पोलिसांकडे पत्रव्यवहार करून शेतीचा ताबा कायम ठेवण्याची विनंती केली.
 
काही दिवसांपूर्वी उमेश, आशिष, सोनू कुंदनसिंग गौतम या चौघांना बुधवारी पुन्हा दारव्हा ठाणेदार अनिलसिंह गौतम पोलिस पथकासह डोल्हारी येथे येऊन शेताचा ताबा न्यायालयाच्या आदेशात नमूद व्यक्तींना देणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून ते चौघेही दारव्हा ठाणेदार अनिलसिंह गौतम यांना भेटायला गेले. त्यांनी ठाणेदार गौतम यांना ही कारवाई करू नये, अशी गळ घातली. मात्र, ठाणेदार गौतम यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काही करता येणार नाही. असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे चौघांपैकी उमेश गौतम, आशिष गौतम, कुंदनसिंग गौतम हे तिघे गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी पोलिस कारवाई थांबावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. 

सकाळी ११ पासून ते दुपारी १२.३० पर्यंत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निरोपाची वाट बघितली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली नाही. पोलिसांकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून कुठलीच मदत मिळत नसल्याचे पाहून तिघेही व्यथित झाले. त्यातूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेरील प्रतीक्षालयातच त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिस प्रशासनाने तिघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केले. 

घटनेची माहिती मिळताच यांनी दिल्या भेटी 
जिल्हाधिकारीकार्यालयात शेतकरी कुटुंबातील तिघांनी विष प्राशन केल्याची माहिती मिळताच यवतमाळचे प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी रवींद्र देशमुख, दारव्हाचे उपविभागीय अधिकारी देशपांडे, यवतमाळ तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाणून तिघांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सायकांळपर्यंत तिघांची प्रकृती चिंताजनक होती. 
बातम्या आणखी आहेत...