आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार राजकीय पक्षप्रणालीचे धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- तरुणांनी राजकारणात यावे, असे आवाहन वेळोवेळी विविध राजकीय पक्षांकडून केले जाते. त्यासाठी त्यांचा प्रयत्नही असतो. मात्र, राजकीय पक्षप्रणालीची माहिती सर्वच तरुणांना असते, असे नाही. त्यामुळे त्याविषयीची माहिती माध्यमिक स्तरावरच देण्याचा प्रयत्न दहावीच्या नव्या अभ्यासक्रमातून करण्यात आला आहे. यंदाच्या इतिहास व राज्यशास्त्र या पुस्तकात राजकीय पक्षांची ओळख त्यांच्या चिन्हांसह विस्ताराने देण्यात आली आहे. यामुळे नव्या पिढीला शालेय दशेतच राजकीय पक्षांची ओळख होणार आहे. तसेच प्रयत्नपूर्वक केलेला हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम करणाराही ठरू शकतो. शिवाय यामुळे तरुणांना राजकारणाकडे आकर्षित करण्यासाठीचा हा नवा फंडा तर नव्हे ना, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी दहावीसाठी आधुनिक जग (इतिहास) व नागरिकशास्त्र अशी दोन पुस्तके होती. नागरिकशास्त्रामध्ये केंद्रीय कायदेमंडळ, केंद्रीय कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, नागरी स्थानिय शासन संस्था, ग्रामीण स्थानिक शासन संस्था, पंचायतराज आदी पाठ होते. यंदापासून दहावीचा अभ्यासक्रम बदलला. त्यात आता इतिहास व राज्यशास्त्र हे विषय एकाच पुस्तकात आहेत. राज्यशास्त्रात राजकीय पक्ष असा एक पाठ आहे.

यात राजकीय पक्ष म्हणजे काय, चिन्हे का असतात, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष म्हणजे काय, त्यांच्यातील फरक व जबाबदारी, राज्यस्तरीय व प्रादेशिक पक्ष म्हणजे काय, आघाडी किंवा युती म्हणजे काय, राजकीय पक्षांचे प्रकार, त्यांची कार्ये, मान्यताप्राप्त प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठीच्या अटी आदींचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर या पुस्तकात सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या गॅस दरवाढीविरोधात निघालेल्या राजकीय पक्षाच्या मोर्चाचे एक छायाचित्रही आहे.

राजकीय पक्षांचा इतिहास
विद्यार्थ्यांना विविध राजकीय पक्षांची पार्श्वभूमी सहज व चटकन लक्षात यावी, यासाठी राजकीय पक्षांच्या स्थापनेचा इतिहास यात देण्यात आला आहे. याशिवाय विविध पक्षांची संकेतस्थळेही दिली आहेत.

राज्यात अंमलबजावणी
पूर्वीच्या अभ्यासक्रमातून राजकीय पक्ष, त्यांची पार्श्वभूमी याची विद्यार्थ्यांना माहिती मिळत नव्हती. गेल्या अनेक वर्षांपासून सीबीएसईच्या अभ्यासक्रमात हे आहे. त्याच धर्तीवर राज्यात याची अंमलबजावणी होत आहे. विद्यार्थ्यांना राजकीय पक्षांची माहिती मिळेल. सुहास पाटील, राज्यशास्त्राचे शिक्षक

शाळेतच पक्षांची माहिती
आता महाविद्यालयात विद्यापीठ प्रतिनिधीच्या निवडणुका होतील. त्या पार्श्वभूमीवर शालेय दशेतच राजकीय पक्षांची माहिती देऊन तरुणांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा पक्षीय दृष्टिकोनही विकसित होईल. मल्लिनाथ अंजुनगीकर, प्राध्यापक, राज्यशास्त्र