आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात फक्त १८ टक्के पेरण्या, पाऊस रूसला अन् बळीराजा खचला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - यंदाच्या वर्षी मान्सूनने वेळेत हजेरी लावली. पण, मोजक्याच भागात पाऊस पडल्यानंतर पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान, पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात फक्त १८ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक ६७ टक्के पेरणी अक्कलकोट तालुक्यात अन् सांगोल्यात शून्य टक्के पेरणी झाली. मान्सून वेळेवर दाखल होणार, कधी सरासरीपेक्षा कमी तर कधी जास्त पाऊस होणार, असे अनेक विसंगत अंदाज हवामान खात्याकडून जाहीर केले जात असतानाच जिल्ह्यात मान्सून वेळेत दाखल झाला.
वेगवेगळ्या भागात पहिली सलामी दिली. त्यामुळे ज्या भागात अल्प का होईना पाऊस झाला, त्या भागात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी तिफणीवर मूठ धरली. विशेषत: बार्शी, अक्कलकोट तालुक्यातील काही भागात समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणी उरकली. मात्र, अन्य बहुतांश भागात केवळ हलका पाऊस झाला आहे. बहुतांश भाग अद्याप कोरडाच आहे. जिथे पेरणी झाली तेथेही चिंताजनक स्थिती आहे.

पाणीटंचाईचा सामना : पावसानेआेढ दिल्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ५० लघु प्रकल्पांसह ८० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडे आहेत. शहरालगतच्या दक्षिण उत्तर सोलापूरसह, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. वैरणाचे दर वाढले आहेत. कोरडे हवामान सोयाबीनसाठी घातक : अडचणींवरमात करून तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. सोयाबीन उगवूनही आले. परंतु, तालुक्यात दहा दिवस झाले पाऊस नाही त्यामुळे सोयाबीन पिकाने मान टाकली आहे. सोयाबीन पेरणीनंतर पीक उगवणी ते काढणीदरम्यान हवामान उष्ण कोरडे असल्यास पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

पेरणीची करू नका घाई
सोलापूरहा रब्बीचा जिल्हा असून जिल्ह्यात परतीचा मान्सून चांगला पडतो. पण, खरिपाचे थोडेफार पीक हाती येईल अशी अपेक्षा आहे. जुलै महिन्यात पाऊस चांगला होण्याची शक्यता असते. पण, पहिल्या पावसात पेरलेल्या पिकांचे पावसाअभावी नुकसान होते. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी, जमिनीत पुरेशी ओल होईपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमी पाऊस असला तरी खरीप हंगाम साधणार आहे, असा अंदाज असून, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे कृषी विभागाने कळवले आहे.

तर दुबार पेरणी करावी लागेल
मृगनक्षत्राच्या तुरळक पावसावर खरिपाची पेरणी उरकून घेतली. पाऊस पडेल या आशेवर मका, तूर, सोयाबीन पेरले. परंतु, पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पिकांनी पुरती मान टाकली आहे. आठवड्यात पाऊस झाला नाही तर दुबार पेरणी करावी लागणार. वैरणीच्या किमती वाढल्या आहेत. राजूकोरे, शेतकरी, मंद्रूप


खरिपासाठी ११ हजार क्विंटल आले बियाणे
यंदाच्या खरीप हंगामासाठी २५ हजार ३९३ क्विंटल बियाणे एक लाख ८३ हजार २०० टन विविध खतांचे नियोजन आहे. मागणीपैकी १० हजार ४३० क्विंटल बियाणे जिल्ह्यात आले आहे. जिल्हा परिषद कृषी विकास विभागातर्फे खरीप हंगामासाठी खतं बियाणे पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अप्रमाणित बियाणांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाची दोन लाख ९५ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. यावर्षीही पावसाने हुलकावणी दिली तर काय करायचे, अशी चिंता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात ५७९ मिलिमीटर पाऊस पडला असून गेल्यावर्षी (सन २०१४) जूनमध्ये ३९८.७३ मिलिमीटर पाऊस झाला. सध्या पावसाने हुलकावणी दिली आहे.

पाऊस झाल्यास पातळी वाढणार
अनियमितपाऊस हा जिल्ह्याच्या पाचवीला पूजलेला आहे. अपुऱ्या पावसामुळे खरिपानंतर रब्बी हंगामात पाण्याअभावी पिकांना फटका बसतो. यावर्षी जिल्ह्यात २८० हून अधिक गावात जलयुक्त अभियानअंतर्गत कामे करण्यात आलेली आहेत. चांगला पाऊस झाल्यास यामध्ये जलसंचय होऊन भूगर्भातील पाणीपातळी वाढेल.