आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचे अर्थकारण : उस्मानाबाद जिल्हयात पाण्यावर 24 कोटी खर्च

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - जिल्ह्यात वर्षभरात टँकर, अधिग्रहण आणि पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर सुमारे 23 कोटी 65 लाख 88 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. पैकी शहरी भागात 10 कोटी 16 लाख रुपये आणि ग्रामीण भागात 13 कोटी 39 लाख रुपये खर्च झाले. यातील सर्वाधिक 9 कोटी 16 लाख रुपयांचा खर्च एकट्या उस्मानाबाद शहराच्या पाणीपुरवठय़ावर झाला आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर व अधिग्रहणाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आगामी काळातही पाण्यावरील खर्चात वाढ होणार आहे.

अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे जिल्हावासीयांना टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासह विहीर, बोअर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 767.5 मिमी एवढे आहे. सन 2011 मध्ये 520.4 मिमी आणि सन 2012 मध्ये 397.0 मिमी पावसाची नोंद झाली. 2012 मध्ये पडलेल्या पावसाची टक्केवारी 51.70 टक्के आहे. अल्प पावसामुळे प्रकल्पातील पाणी पातळीतही वाढ झाली नाही. जिल्ह्यात एक मोठा, 17 मध्यम आणि लघु 192 प्रकल्प आहेत. सध्या या प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा नाही. लघु प्रकल्पांत 2.606 दलघमी पाणीसाठा आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेली 438 गावे आहेत.

सर्वाधिक खर्च उस्मानाबाद शहरावर

मागील दोन वर्षांपासून उस्मानाबादला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, टँकरवरील खर्चामध्ये उस्मानाबाद शहर जिल्ह्यात अव्वल आहे. शहराच्या पाणीपुरवठय़ावर तब्बल 9 कोटी 16 लाख रुपये खर्च झाला आहे. शिवाय उजनी पाणीपुरवठा योजनेसाठी यंदा 25 कोटी रुपये पालिकेला दिले आहेत. सध्या शहरात चोराखळी येथून 24 हजार लिटर क्षमतेच्या 33 टँकरद्वारे, आळणी येथून 20 टँकरद्वारे व जलशुध्दीकरण केंद्रातील 10 असे एकूण 63 टँकर सुरू आहेत.


88 कोटी 22 लाखांचा कृती आराखडा
सन 2012-13 करिता जून 2013 अखेर पाणी टंचाई कामाचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये ग्रामीण व शहरी भागासाठी विविध टंचाईच्या उपाययोजनेची एकूण 6 हजार 807 कामे प्रस्तावित असून, त्याचा अंदाजपत्रकीय खर्च 88 कोटी 22 लाख 58 हजार एवढा आहे. कृती आराखड्यानुसार ग्रामीण भागात 132 आणि शहरी भागात 73 असे एकूण 205 टँकर, ग्रामीण भागात 812 व शहरात 27 असे एकूण 839 खासगी अधिग्रहण, ग्रामीण भागात 387 व शहरात 15 असे एकूण 402 बोअर घेणे, ग्रामीणमधील 217 व शहरातील 63 असे एकूण 280 विंधन विहिरी विशेष दुरुस्ती, ग्रामीण 36 नळजोडण्या दुरुस्ती व ग्रामीण 26 व शहरी 3 अशा 29 तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजना आदी उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, कामे प्रगतीपथावर आहेत.


नगरपालिकेचा झालेला खर्च (लाखांत)
उस्मानाबाद 916.18
तुळजापूर 0.82
उमरगा 22.50
परंडा 76.77
एकूण 1016.27


वीजबिल माफी
50 पेक्षा कमी पैसेवारी असणार्‍या 438 गावांचा टंचाईग्रस्त यादीमध्ये समावेश झाला आहे. पैकी 74 गावांनी पाणीपुरवठय़ातील वीजमाफीचा लाभ घेतला आहे. या गावांना 32 लाख 80 हजार 86 रुपये रक्कम मंजूर करण्यात आली आहे.


पंचायत समितीचा खर्च (लाखांत)
उस्मानाबाद 233.18
तुळजापूर 182.18
उमरगा 172.58
लोहारा 94.46
कळंब 278.91
भूम 249.97
वाशी 78
परंडा 60.12
एकूण 1349.63


प्रशासनाला 19 कोटी 83 लाख रुपये प्राप्त
पाणीटंचाई निवारणासाठी 19 कोटी 83 लाख 87 हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला शासनाकडून प्राप्त झाला आहे. पैकी 10 कोटी 76 लाख 23 हजार रुपये ग्रामीण भागास व 9 कोटी 7 लाख 64 हजार रुपयांचा निधी शहरी भागास वितरीत करण्यात आला आहे. जनावरांच्या छावणीसाठी 2 कोटी 8 लाख रुपये निधी प्राप्त झाला असून, तो निधी भूम तहसील कार्यालयाला वितरित केला आहे.