आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन आराखडा 275 कोटींचा - 23 कोटींचा मिळणार वाढीव निधी;

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील विविध योजनांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढीव 23 कोटी रुपये दिल्याने जिल्हा नियोजनाचा वार्षिक आराखडा 252 कोटींवरून 275 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये अंगणवाडी, नियोजन भवन व महावितरणच्या योजनेसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे.
जिल्हा नियोजनाच्या वार्षिक आराखड्याबाबत पुणे येथे बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीस पालकमंत्री दिलीप सोपल, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. निशिगंधा माळी, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत म्हेत्रे उपस्थित होते. बैठकीत जिल्हा नियोजन समितीने तयार केलेला आराखडा सादर करण्यात आला.
आराखड्यातील योजना व निधी यावर चर्चा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आराखड्यातील योजनांव्यतिरिक्त इतर कामांसाठी 23 कोटी रुपयांची भरीव वाढ केली. सोलापुरात नियोजन भवन बांधण्यासाठी 5 कोटी, अंगणवाडी बांधकामासाठी 4 कोटी 50 लाख, महावितरणच्या योजनेसाठी 7 कोटी 50 लाख तर बांधकाम विस्तारीकरणसाठी 70 लाख, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी 1 कोटी, आषाढी वारीसाठी 4 कोटी व इतर कामांसाठी 1 कोटी असे एकूण 23 कोटी रुपयांचा अधिक निधी मिळाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत म्हेत्रे यांनी दिली.
आराखड्यात झाली दोन वर्षात तब्बल 33 कोटींची वाढ
जिल्हा नियोजन आराखड्यामध्ये गेल्या दोन वर्षात 33 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2012-13 मध्ये वार्षिक आराखडा 242 कोटी, 2013-14 मध्ये 250 कोटी तर 2014-15 चा आराखडा 252 कोटी रुपयांचा तयार करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये 23 कोटी रुपयांची वाढ केल्याने हा आराखडा 275 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.