आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरातील सिग्नलसाठी मिळणार 50 लाख रूपयांचा निधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - प्रस्ताव आल्यास जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून शहरातील सिग्नलसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करू, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. मंगळवारी ‘दिव्य मराठी’ कार्यालयात त्यांनी ही माहिती दिली. शहरात सध्या 10 सिग्नल चालू आहेत. तीन सिग्नलचे काम अद्याप सुरू झाले नाही. आणखी नव्याने 14 ठिकाणी दिवे बसवण्यासाठी प्रस्ताव तयार झाला आहे.

पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी 2 मार्च रोजीच्या बैठकीत सिग्नल बसवण्यासाठी पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त यांना डीपीसी योजनेतून 50 लाख, महापालिकेतर्फे 50 लाख, तीनही आमदार निधीतून 45 लाख असे दीड कोटी रुपये जमवण्याचे सांगितले. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना दिल्या होत्या. नव्या वर्षात सिग्नलसाठी डीपीसी योजनेतून 50 लाखांचा प्रस्ताव बैठकीत आला तर त्याला मंजुरी देऊ, असे जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी स्पष्ट केले.

जुन्या एम्प्लॉयमेंट चौकात नव्याने दिवे बसवणार

जुन्या एम्प्लॉयमेंट चौकात आडव्या पट्टीचा सिग्नल बसवण्यासाठी सूचना करण्यात येणार आहे. मंगळवारी रात्री पोलिस वाहन अपघातात एका बाजूचा खांब कोसळला आहे. त्याठिकाणी बसवण्यात येणारा दिवा नव्या पद्धतीने बसवण्यासाठी वाहतूक शाखा विनंती करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आडवा पट्टीचा खांब म्हणजे रस्त्याच्या मधोमध लाल, पिवळे, हिरवे दिव्यांचे सिग्नल असतील. म्हणजे लांबून येताना चौकातील दिवे दिसतील. अशा पद्धतीचा दिवा सरस्वती चौकात एका बाजूला आहे. मागील 66 दिवसांपासून सिग्नल दिव्याबाबत ‘दिव्य मराठी’चा पाठपुरावा सुरू आहे. झेब्रा क्रॉसचे पट्टे रंगवण्यात आले आहेत. मात्र, काही ठिकाणी त्रुटी राहिलेल्या आहेत. पादचारी मार्ग नसतानाही तेथे पट्टे रंगवण्यात आले आहेत. त्याची दुरुस्ती अद्याप झालेली नाही.


वाहनधारकांनी पाळले नियम
दरम्यान, बुधवारी आसरा, जुना होटगी नाका, गांधीनगर, डफरीन चौकात झेब्रा क्रॉस पट्टय़ाच्या आत थांबून काही वाहनधारक स्वत:हून नियम पाळत होते. पोलिस सूचना देऊन वाहनधारकांना थांबवत होते. सरस्वती चौकात मात्र कुणीच नियम पाळताना दिसत नव्हते. डफरीन चौकात सायंकाळी वीज नसल्यामुळे सिग्नल दिवे बंद होते. वाहतूक पोलिसांनी मॅन्युअलद्वारे (हातवारे करून) वाहतूक नियोजन करीत होते. आज सार्वजनिक सुटी असल्यामुळे शहरातील चौकांमध्ये वाहतुकीची गर्दी नव्हती.


मोहीम पुन्हा राबवू
वाहतूक पोलिस बंदोबस्त पॉइंटमध्ये होते. त्यामुळे झेब्रा क्रॉसचे नियम तोडणार्‍यांवर कारवाई मोहीम राबवण्यात आली नाही. गुरुवारी पुन्हा ही मोहीम राबवू.’’ खुशालचंद बाहेती, साहाय्यक पोलिस आयुक्त