आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्या 55 वंचित महिलांना मिळणार आधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- वंचित जीवन जगणार्‍या त्या 55 महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व निरामय आरोग्यधाम संस्थेने पुढाकार घेतला असून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे याकरिता मोफत शिलाई मशिनचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे या वंचित घटकांच्या जीवनाला आशादायक वळण मिळणार आहे.

बुधवारी होणार्‍या एका छोटाशा कार्यक्रमात महापौर अलका राठोड यांच्या हस्ते या 55 महिलांना शिलाई मशिनचे वाटप केले जाणार आहे. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण, मनपा आयुक्त अजय सावरीकर, सभापती निला खांडेकर यांची उपस्थिती राहणार आहे. निरामय आरोग्यधाम संघटनेच्या मार्गदर्शनाखाली शिवणकलेचे प्रशिक्षण घेऊन गेली अनेक वर्षे या महिला शिवणकाम करतात. परंतु, त्यांच्याकडे स्वत:ची मशिन नव्हती. ही बाब लक्षात घेऊन मोफत मशिन वाटप करण्यात येत आहे.

शासनानेही जाणले मन

जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून विशेष आर्थिक तरतुदीतून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या महिलांना पालिकेच्या महिला व बालकल्याणच्या वतीने कपडे शिवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. तसेच निरामय आरोग्य धामच्या सीमा किणीकर यांच्या प्रयत्नाने विविध डिझाईन्सचे ब्लाऊज, परकर, सलवार कमीज, फ्रॉक्स, बंडी, पेटिकोट, टोपडी, दुपटी, छोट्या बाळांचे कपडे, झबली या महिला शिवतात.
सरकार नेहमीच सोबत
शिलाई मशिनच्या माध्यमाने महिलांनी नव्याने विधायक कामाची सुरुवात क रावी असे वाटते. त्यांना सरकारची नेहमी साथ राहील. . दीपक ढेपे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

स्वाभिमान मिळाला
शिवणकामाने स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळते आहे. त्याचा पुरेपूर वापर करणार आहे. अर्थार्जन व रोजगार या दोन्हीची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. नर्मदा, (बदललेले नाव)

सकारात्मक दिशा मिळेल
या कामाने या वंचित महिलांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळेल. तसेच भविष्यात त्यांना कुणाकडे हात पसरावा लागणार नाही. सीमा किणीकर, संचालिका, निरामय आरोग्यधाम