आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'राजकारणात आलो नसतो तर रंगभूमी गाजवली असती\'; शोभायात्रेने पंढरपूरकरांची मने जिंकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शं. ना. नवरे नाट्यनगरी, पंढरपूर - अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झाले. मुख्य आकर्षण असलेली नाट्यदिंडी शोभायात्रा शनिवारी (दि. 1) सकाळी सात वाजता येथील टिळक स्मारक मैदानावरून निघाली. या नाट्यदिंडीने पंढरपूरकरांची मने जिंकली. त्यानंतर नाट्यसंमेलनाच्या उदघाटनाला प्रारंभ झाला आहे. नाट्यसंमेलनाचे उदघाटक केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, संमेलनाचे मावळते अध्यक्ष मोहन आगाशे, संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि नुकतेच राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार रामदास आठवले, राज्याचे सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, लता नार्वेकर, भारत भालके उपस्थित आहेत.
राजकारणात गेलो नसतो तर रंगभूमी गाजवली असती असे सांगत उदघाटक सुशीलकुमार शिंदे यांनी भागवत धर्माचे पीठ असलेल्या या नाट्यसंमेलनात रंग देवतेची पुजा करण्याची मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद दिले. सोलापूरच्या अनेक कलावंतांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. सोलापूरात होणारे हे तिसरे नाट्य संमेलन असल्याचे शिंदेंनी सांगितले.
राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक तालुक्यांमध्ये नाट्यगृह निर्माण करण्याच्या योजनेचे कौतूक करताना शिंदे म्हणाले, राज्यातील तालुक्या-तालुक्यांमध्ये कलेचा वारसा जपणारे अनेक कलाकार आहेत. रंगभूमीकडे वळण्याची नव्या कलाकारांना त्यामुळे संधी मिळेल. यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे कौतूक केले.
'मुंबईची माणेस' या नाटकात स्त्री भूमिका करण्याची संधी मिळाल्याचा उल्लेख करुन अनेक नाटके केल्याची आठवणी शिंदेनी सांगितल्या. त्या मंतरलेल्या दिवसांच्या आठवणीने आजही अंगावर शहारे येतात असे ते म्हणाले.
राजकारणाकडे वळलो नसतो तर रंगभूमी गाजवली असते असे सांगत मोहन जोशींविरोधात नाट्यपरिषदेची निवडणूक लढविली असती असे शिंदे म्हणाले. त्याच बरोबर मोहन जोशी हे कामगार रंगभूमीवरुन आले आहेत आणि मी देखील पहिले नाटक हे कामगार रंगभूमीवर केले. कामगारांच्या यातना काय असतात त्या जोशींना चांगल्या कळतात त्यामुळे त्यांच्या विरोधात लढण्याचे धाडस केले नसेत अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
मराठी रंगभूमीच्या दैदिप्यमान इतिहासाचा आढावा शिंदेंनी त्यांच्या भाषणात घेतला. यात प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी आणि दलित रंगभूमीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. त्याच बरोबर रंगभूमीवरील कलाकारांच्या अदाकारीचे कौतूक करतानाच पडद्यामागे काम करणा-यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
नाटकाने हलकी फूलकी करमणूक केली पाहिजे मात्र त्याच बरोबर संस्कृतीचे सोनेही नाटकाने लुटले पाहिजे अशी अपेक्षा शिंदेंनी व्यक्त केली. हे एका रात्रीत होणार नाही याची जाणीव असल्याचे सांगत त्यांनी नव्या प्रतिभेला वाव देऊन त्यांच्यात याची रुजवण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

साहित्या - नाटकातून राजकारण वेगळे करता येणार नाही - आठवले
खासदार आठवले यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, साहित्य, नाटक आणि चित्रपट राजकारणाशिवाय होत नाही, त्यामुळे दोन्ही क्षेत्र एकमेकांना पूरक आहेत. त्यांना वेगळे करुन चालणार नाही. त्यामुळे साहित्य व नाटककारांनी राजकारण्यांना टाळणे योग्य नाही. त्यासोबतच नाट्यसंमेलनाचा निधी सरकारने वाढविला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. सध्याच्या महागाईच्या युगात सरकारने किमान एक कोटी रुपये दिले पाहिजे. तसेच नाट्य कलावंताच्या मानधनातही वाढ करण्याची मागणी त्यांनी केली.
पुढील काही महिन्यात महायुतीचे सरकार राज्यात येणार असल्याची भविष्यवाणी करुन आठवले म्हणाले, आमचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर नाट्यकलावंतांना दरमहिना किमान पाच हजार रुपये मानधन देऊ., असे आश्वासन त्यांनी दिले.
पुढील स्लाइडमध्ये, संमेलनाच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक मेजवानी