आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

972 रिक्षांना लागले मीटर; अद्याप 4333 आहेत बाकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका क्षेत्रातील रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती मागील वर्षी राज्य सरकारने केली. मात्र, त्याचा म्हणावा तसा प्रभाव पडला नव्हता. सोलापूर उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेनंतर मात्र चित्र पालटले. दोन आठवड्यांतच सोलापुरातील 972 रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर लागले आहे. उर्वरित 4,333 रिक्षावाल्यांनाही मीटर बसवणे बंधनकारक झाले आहे.


*सोलापूरच्या रिक्षावाल्यांनीदेखील केले मीटरसक्तीचे स्वागत


इलेक्ट्रॉनिक मीटरच्या सक्तीने रिक्षावाल्यांना बसली धास्ती
अनेकदा रिक्षाचालक आपल्या मनाला वाटेल तसे भाडे वसूल करतात. त्यांना निर्बंध असणे गरजेचे होते. इलेक्ट्रॉनिक मीटरमुळे मनमानी पद्धतीने दर आकारण्याला आळा बसेल. तसेच अनेक रिक्षा चालक 1 किंवा 2 रुपयांनी जरी पेट्रोलचे दर वाढले असतील तरी लगेच 5 ते 6 रुपये दर वाढवितात. ते आता थांबेल. प्रवाशांची होणारी आर्थिक फसवणूक ही थांबेल. मीटर बसविणे हे चांगलेच आहे.’’ निवेदिता लेले, महिला प्रवासी

मनमानी थांबेल
प्रवाशांनीही आग्रह धरावा
रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणे सर्वांच्या दृष्टीने चांगले आहे. मात्र, प्रवाशांनी देखील रिक्षाचालकांकडे मीटर चालू करण्याचा आग्रह करावा. अनेकदा प्रवासीच मीटर चालू करू नका असे सांगतात. त्यामुळे आमचाही नाईलाज होतो. इलेक्ट्रॉनिक मीटरमुळे अंतराप्रमाणेच भाडे मिळेल.’’ शंकर बाबर, रिक्षाचालक

रिक्षेवाल्यांसाठीसुद्धा मीटर फायद्याचेच
शहरातील सर्व रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवून घेणे आता अतिशय गरजेचे आहे. आम्ही आमच्या रिक्षांना ते बसवले आहेत. मीटर बसवल्याने रिक्षाचालक व प्रवाशी यांच्यात प्रवासी भाडयावरून नेहमी होणारा वाद संपुष्टात येईल. तसेच प्रवाशांना आपण योग्य भाडे दिले. आपल्याकडून अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याची भावना संपुष्टात येईल. रिक्षाचालकांसाठीही हे फायद्याचे आहे.’’ सुभाष वाघमोडे, रिक्षाचालक

इलेक्टॉनिक मीटर बसवणे बंधनकारक
सोलापुरातील सर्व अधिकृत रिक्षाधारकांनी आपल्या रिक्षांना लवकरात लवकर इलेक्ट्रॉनिक मीटर बसवून घेणे आवश्यक आहे. या पुढील काळात ज्या रिक्षांना मीटर नसतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शहरात जे अनधिकृत व स्क्रॅप रिक्षाधारक आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. अनधिकृत रिक्षांना शहरातून लवकरच पूर्णपणे हद्दपार करण्यात येईल. रिक्षांना मीटर बसवल्यामुळे नागरिकांची होणारी फसवणूक थांबणार आहे. तसेच रिक्षाचालकांविषयी लोकांमध्ये असणारी प्रतिमाही चांगली होण्यास यामुळे मदत होणार आहे.’’ अशोक पवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

हकीम समितीचा अहवाल काय सांगतो
राज्य सरकारच्या वतीने 2012 मध्ये रिक्षावाल्यांच्या अडचणींबाबत अभ्यास करण्सासाठी एम. ए. हकीम यांची समिती स्थापन करण्यात आली. 13 एप्रिल 2012 मध्ये या समितीने अहवाल दिला. त्यानुसार जेव्हा पेट्रोल व डिझेल मध्ये दरवाढ होते. त्या वेळेस रिक्षा संघटनांनी भाडे वाढवण्याचा प्रस्ताव दिला. तर त्यावर विचारविनिमय करून पेट्रोल दरवाढीनुसार प्रवाशी भाड्यात दरवाढ करण्यात येते. मात्र, त्यासाठी रिक्षा संघटनांनी तसा प्रस्ताव आरटीओकडे देणे गरजेचे आहे. परस्पर दर वाढवू शकत नाहीत.

प्रवाशांकडून योग्य भाडे आकारणे गरजेचे
रिक्षावाले अनेकदा प्रवाशांकडून जास्त भाडे घेतात. त्याला कोठेतरी पायबंद बसावा. प्रवाशांकडून योग्य भाडे घेतले जावे म्हणून राज्य सराकारकडून मीटरची सक्ती करण्यात आली. मात्र, याला महाराष्ट्रातील रिक्षा संघटनांनी विरोध दर्शवला होता. रिक्षा संघटनांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च् न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल राज्य सरकारच्या वतीने लागला. त्यानंतर रिक्षा संघटनांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. तेथे त्यांची याचिका फेटाळण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल ग्राह्य धरण्यात आला.

मीटरचे दर कशाच्या आधारे
राज्यातील प्रत्येक शहरातील रिक्षा भाड्याचे दर वेगवेगळ आहे. मीटरचे दर ठरवताना त्या शहराची भौगोलिक स्थिती, त्या शहरातील नागरिकांचे आर्थिक स्तर, आदींबाबत परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मीटरचे दर ठरवण्यात येते.

सोलापुरातील मीटरचे दर
पहिल्या किलोमीटरसाठी 11 रुपये आहे. त्यानंतरच्या प्रत्येकी किलोमीटरसाठी 10 दर आकारण्यात येतो.

11 जुलैपासून कारवाईस प्रारंभ
रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यात यावे म्हणून सोलापूर उप-प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी 11 जुलैपासून मोहीम सुरू केली आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर न बसवणार्‍या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.

या कारवाईत 1 लाखाचा दंड वसूल करण्यात आला
मीटरच्या किमती अधिक.. सोलापुरात जवळपास चार कंपन्यांचे मीटर उपलब्ध आहेत. त्याची किंमत 2,500 ते 3,000 रुपयांपर्यंत आहे. ही किंमत अधिक असल्याचे आरटीओच्या निदर्शनास आणून दिले.

मीटर झाले स्वस्त.. आरटीओ प्रशासनाच्या सूचनेनंतर मीटरची विक्री आणि दुरुस्ती करणार्‍या दुकानांनी ही किंमत कमी केली आहे, ते आता सोलापुरात 2,200 रुपयांना उपलब्ध होत आहे.

आरटीओच्या सूचनेनंतर..
अधिकृत 5,305 रिक्षा
सोलापुरात अधिकृत (परमीटधारक) रिक्षा 5305 आहेत. सर्व रिक्षांना मीटर बसविणे सक्तीचे.
1 जुलै 2012
राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे केले.

नाइट चार्जेस
रात्री उशिरा रेल्वेने किंवा एसटीने येणार्‍या प्रवाशांची नेहमीच रिक्षावाले अडवणूक करतात. प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते.अडचणीच्या वेळी दुसरा पर्याय नसल्याने प्रवाशांचा नाईलाज होतो.