आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरारक पाठलागानंतर 1 कोटी 14 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल, गांजा जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर : तोफखाना पोलिसांनी शनिवारी सकाळी पेट्रोलिंग करताना संशयास्पद वाहनांचा पाठलाग केला. २० मिनिटांच्या थरारक पाठलागानंतर आशा टॉकीज चौकात पोलिसांनी वाहने अडवली. त्यातून तब्बल ६४३ किलोग्राम गांजा जप्त केला. उस्मानाबादहून आणलेला हा गांजा नगरमध्ये वितरित होणार होता. जवळपास काेटींचा गांजा, १७ लाखांची दोन चारचाकी वाहने, रोकड असा एकूण १ कोटी १४ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखान्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या टीमने शनिवारी सकाळी ही जिगरबाज कामगिरी केली. 
 
 
पोलिस निरीक्षक मानगावकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय इस्सर, कॉन्स्टेबल योगेश भिंगारदिवे, संजय काळे, धिरज अभंग, भास्कर गायकवाड, महिला कॉन्स्टेबल छाया आढाव, हारुण शेख हे औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी सरकारी जीपमधून गस्त घालत होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास हॉटेल सनी पॅलेससमोर त्यांना औरंगाबादकडून एक इनोव्हा (एमएच २४ व्ही १६९९) पांढऱ्या रंगाची बोलेरो जीप (एमएच १७ एजे ६९४३) भरधाव वेगाने येताना दिसल्या. पोलिसांनी त्यांना हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. 
 
मात्र, दोन्ही वाहने वेगाने नगरच्या दिशेने पुढे गेली. तोफखाना पोलिसांनी सरकारी जीपमधून दोन्ही वाहनांचा पाठलाग केला. इनोव्हा बोलेरो वाहने एकापाठोपाठ वेगाने पोलिस अधीक्षक चौकातून पुढे गेली. पोलिसांचा पाठलाग सुरूच होता. दोन्ही वाहनांनी हायवे सोडून शहरात प्रवेश केला. सुमारे वीस मिनिटे हा पाठशिवणीचा खेळ चालला. वाजून ५० मिनिटांच्या सुमारास पोलिसांनी आशा टॉकीज चौकामध्ये दोन्ही वाहनांना अडवले. इनोव्हा कारमध्ये एक पुरुष महिला, तर बोलेरो जीपमध्ये दोन पुरुष एक महिला बसलेले होते. 
 
दोन्ही गाड्यांमध्ये मागच्या बाजूला राखाडी रंगाची काही पाकिटे रचलेली दिसली. पोलिसांनी चौकशी केली असता गाडीत बसलेल्या लोकांनी पाकिटांमध्ये गांजा असल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल, वाहने ताब्यात घेतली. इनोव्हा कारमध्ये संदीप दिलीप अनभुले (२८, घुमरी, कर्जत) सीमा राजू पंचारिया (४६, कासार दुमाला, संगमनेर), तर बोलेरोमध्ये सागर भिमाजी कदम (२८, आश्वी, संगमनेर), गणेश निवृत्ती लोणारी (जोर्वे, संगमनेर) शोभा कृष्णा कोकाटे (नालेगाव, नगर) यांना अटक केली. 
 
सीमा पंचारिया हिच्याकडून ८६ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात अाली. इनोव्हा कारमध्ये १५०, तर बोलेरो जीपमध्ये १३६ राखाडी रंगाची चौकोनी पाकिटे होती. प्रत्येक पाकhट अडीच किलोग्राम वजनाचे होते. त्यात सुकलेला गांजा मिळून आला. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याने मुद्देमाल मोजण्यात आला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात एन. डी. पी. एस. अॅक्टच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे गांजातस्करीचे आंतरजिल्हा रॅकेट उजेडात आले आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मानगावकर हे करीत आहेत. 

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये संगमनेरच्या तिघा जणांचा समावेश आहे. गांजाच्या तस्करीमध्ये संगमनेरचे आरोपी यापूर्वीही पोलिसांच्या रडारवर आलेल आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा गांजा-तस्करीच्या रॅकेटमध्ये संगमनेरचा सहभाग पुन्हा एकदा समोर आला आहे. या गुन्ह्याच्या तपासात आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे पोलिस निरीक्षक मानगावकर म्हणाले. 
 
सर्वात मोठी कारवाई 
जिल्ह्यातयापूर्वीही अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाया झालेल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी तोफखाना पोलिसांनीच सुमारे चाळीस लाख रुपयांचा गांजा जप्त केला होता, तर किरकोळ स्वरूपात गांजा जप्त करण्याचे प्रकारही होत असतात. मात्र, तब्बल ६४३ किलो (९६ लाख रुपयांचा) गांजा जप्त करण्याची ही पहिलीच सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या कारवाईबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोफखाना पोलिसांचे कौतुक केले आहे. 
 
रॅकेटची व्याप्ती मोठी 
प्राथमिक चौकशीत जप्त केलेला गांजा उस्मानाबाद जिल्ह्यातून आणल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे गांजा-तस्करीचे रॅकेट आंतरजिल्हा चालत असल्याचे स्पष्ट आहे. यातील एका महिलेवर गांजातस्करी केल्याबद्दल मुंबईतही गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे तोफखाना पोलिसांनी पकडलेले आरोपी सराईत असल्याचे दिसून येते. गांजातस्करीचे रॅकेट आंतरजिल्हा असल्यामुळे या गुन्ह्याची व्याप्तीही मोठी आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करून आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 
 
वितरण कोणाला? 
जप्त केलेला गांजा नगर जिल्ह्यात वितरित केला जाणार होता, अशी माहिती तोफखाना पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये समोर आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजा नगरमध्ये आल्यानंतर तो कोठे-कोठे वितरित केला जाणार होता, याची चौकशी आता पोलिस करीत आहेत. तसेच गांजातस्करीत कोण-कोण सहभागी आहे, याचाही पोलिस कसून शोध घेत आहेत. एकूणच जिल्ह्यातील गांजातस्करीची पाळेमुळे शोधून काढण्याचे आव्हान आता तोफखाना पोलिसांपुढे आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...