आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दिवसांत १०० किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - त्यानुसार शहरातील प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांच्या विरोधात महापालिका प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. शहराच्या विविध भागात पाच दिवसांत शंभर किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. पुढच्या टप्प्यात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन वापरावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र, स्थानिक पातळीवर या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे. नगर शहरातही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात महापालिका प्रशासनाने गेल्या पाच दिवसांपासून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

सुरुवातीला प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलधारक, किराणा दुकानदार यांना समज देण्यात येत आहे. मनपाच्या या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग नाका, एकविरा चौक, अमरधाम, दिल्लीगेट, गांधी मैदान, माळीवाडा, वाडिया पार्क, केडगाव आदी भागात कारवाई करण्यात आली. पाच दिवसांत तब्बल शंभर किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.

कारवाईमुळे विक्रेत्यांनीदेखील ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देणे बंद केले आहे. जागरूक नागरिकही आता घराबाहेर पडताना बरोबर कापडी पिशवी घेताना दिसत आहेत. मनपाने काही महिन्यांपूर्वी प्लास्टिक वापराच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे अनेक दुकानदारांनी प्लास्टिक पिशवी वापरणे बंद केले. परंतु कारवाईची मोहीम बंद होताच भाजी फळविक्रेते, किराणा दुकान, मेडिकल आदी ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पुन्हा सुरू झाला.

प्लास्टिक पिशव्यांमुळे शहराच्या विविध भागातील ड्रेनेज, गटार, ओढेनाले तुंबले आहेत. त्यामुळे मनपाने पुन्हा एकदा कारवाईचा अॅक्शन प्लॅन तयार करून कारवाई सुरू केली आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या टप्प्यात संबंधितांना केवळ समज देण्यात येते, परंतु मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात दंडात्मक करवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई किती सक्षमपणे चालते, याकडे शहरातील स्वयंसेवी संघटनांचे लक्ष राहणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात दंडात्मक कारवाई करण्यात येणार
प्लास्टिक पिशव्यांचा वापर विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत शहराच्या विविध भागातून शंभर किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. मनपाच्या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारवाई सुरूच राहणार असून दुसऱ्या टप्प्यात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.'' डॉ.एन. एस. पैठणकर, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख.

नागरिकही मनपाच्या रडारवर
विक्रेत्यांनीग्राहकांना प्लास्टिक पिशवी देणे बंद केले, तरी काही ग्राहक पिशव्यांसाठी आग्रह धरतात. ग्राहक नाराज होऊ नये, यासाठी विक्रेतेही त्यांना हळूच पिशवी काढून देतात. हा प्रकार थांबवण्यासाठी मनपा नागरिकांवरही कारवाई करणार आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.

जागरूक होणे आवश्यक
प्लास्टिक पिशव्यांचा वापर विक्री टाळण्यासाठी शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडताना बरोबर कापडी पिशवी ठेवली पाहिजे. प्रत्येक नागरिक जागरूक झाला, तर कारवाईची देखील वेळ येणार नाही. प्रत्येकाने कापडी पिशवीचा आग्रह धरला पाहिजे. बचतगटांनी कापडी पिशव्या तयार केल्या पाहिजेत.'' भालचंद्रबेहेरे, उपायुक्त, मनपा.