हिवरेबाजार - ग्राम संसद नावाने उभी असलेली ग्रामपंचायतीची देखणी इमारत. समोर मोकळा चौक. सिमेंटचे स्वच्छ रस्ते. गावातील प्रत्येक घराचा रंग एकसारखा. महिनाभराच्या खर्चाचे विवरण सर्वांसमोर मांडलेला फलक. कचरा, अस्वच्छता चुकूनही दृष्टीस पडत नाही. गावाबाहेरच्या डोंगरावरून वाहणारे पाणी अडवलेले. सर्वत्र हिरवाई. नाइलाज म्हणून गाव सोडून गेलेले लोक आनंदाने परतू लागले आहेत. 112 देशांच्या व्यक्तींनी या गावाला भेट दिली आहे.
हे गाव अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी नव्हे, तर राळेगणपासून 30 कि.मी. अंतरावर अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव म्हणजे हिवरेबाजार. परिवर्तनातून दुरवस्थेला मुक्ती देणारे असे हे गाव. अण्णांप्रमाणेच येथे एका व्यक्तीच्या पुढाकारातून चमत्कार घडून आला. त्यांचे नाव पोपटराव पवार. अण्णा गेल्या 20 वर्षांत भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषण करून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. मात्र, पोपटरावांनी यापासून दूर राहत स्वत:ला गावापुरते मर्यादित ठेवले. महाराष्टÑ सरकारने आता त्यांच्याकडे 100 गावांचा विकास सोपवला आहे. यामध्ये शेतक-यांच्या आत्महत्येमुळे कुप्रसिद्ध झालेल्या विदर्भातील यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यातील कुठावडा आणि चालढाणा या गावांचा समावेश आहे. या गावांना हिवरेबाजारचे रुपडे आणले जाईल.
1989 मध्ये पोपटराव पुणे विद्यापीठातून एमकॉमची पदवी प्राप्त करून गावात परतले तेव्हा अण्णांच्या राळेगणसिद्धीची देशभर चर्चा होती. जुन्या राळेगणप्रमाणेच हिवरेबाजारही एक दुष्काळ, मागासलेपण आणि दारूमुळे बदनाम झाले होते. यादरम्यान ग्रामस्थांनी पवार यांना 1989 मध्ये सरपंचपदी अविरोध निवडून आणले. पोपटरावांनी अण्णांची ग्राम सुधारणेची वहिवाट अंगीकारली आणि राळेगणपेक्षाही कमी अवधीत गावाचा चेहरामोहरा बदलला. यासंदर्भात ते म्हणाले, आम्ही 26 जानेवारी 1990 रोजी पहिल्या ग्रामसभेत समस्यांची यादी केली. दुस-या बैठकीत त्यावरील उपाय निश्चित शोधले. यात पाण्याची सर्वात मोठी समस्या होती.
दररोज 18 तास काम करणा-या पोपटरावांनी गावाच्या कामाशी संबंधित सर्व सरकारी विभागांना एकत्र केले. 1994 पर्यंत प्रत्येक घरात शौचालय बांधून गाव पाणंदमुक्त करण्यात आले. यानंतर ‘एक डास दाखवा, शंभर रुपये मिळवा’ असे आवाहन करण्यात आले. आयआयटी आणि आयआयएमचे विद्यार्थी व प्राध्यापक गावाला भेट देण्यासाठी आल्यानंतर त्यांना ग्रामपंचायत सदस्यांनी स्वच्छतेवर एक रुपयाही खर्च केला नसल्याचे सांगतात. आपापले घर, गल्ली स्वच्छ ठेवण्याचे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. यासाठी ग्रामपंचायतीचा पैसा का खर्च केला जावा, असे पवार म्हणाले.
1972-78 दरम्यान भयंकर दुष्काळ पडल्यामुळे अनेक कुटुंबांनी पुण्या-मुंबईला स्थलांतर केले होते. गेल्या 15 वर्षांमध्ये 125 कुटुंबे परत गावात आली आहेत. 38 वर्षे मुंबईत राहून परतलेले भुवनदादा ठाणगे म्हणाले, आम्ही मजुरीसाठी गेलो होतो. तिथे कापड मिलमध्ये काम मिळाले होते. घाणेरड्या वस्तीत राहिलो. गावाचा चेहरा बदलल्याचे ऐकल्यानंतर पुन्हा येथे परतलो.
ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश यांनी गावाला भेट देऊन 12 कोटी रुपये खर्चाच्या एका प्रशिक्षण केंद्राला मंजुरी दिली. रमेश त्या वेळी म्हणाले, एका पोपटरावाने काम पूर्ण होणार नाही, तर आपल्याला त्यांचे क्लोन तयार केले पाहिजे. आता केंद्र अद्याप तयार झाले नाही. मात्र, त्याचे काम सुरू झाले आहे.
छापून आलेल्या बातम्याांमुळे हिवरेबाजारच्या मुलांना मोठी शिकवण मिळाली. पुण्यातील एका मुलासंदर्भातील ही बातमी होती. त्याने आपल्या आईचा खून केला होता. बातमी शाळेत वाचून दाखवण्यात आली. खुनी मुलगा रात्रभर बेपत्ता होता. त्याने फीसचे पैसे उडवले होते. सकाळी घरी परतला तेव्हा त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता. आई रागावल्यानंतर मुलाने हात उचलला. बातमी ऐकल्यानंतर मुलांना रडू कोसळले. मात्र, व्यर्थ पैसे खर्च करायचे नाहीत, ही शिकवण त्यांना यातून मिळाली. गावातील शाळेत 300 विद्यार्थी आहेत. यातील आठवी ते दहावीच्या मुलांनी पॉकेटमनी बॅँकेत जमा करणे सुरू केले असून ही रक्कम 13 लाख रुपयांच्या घरात आहे.
काही कडक नियम
> गावात राहणारे शिक्षकच शाळेत असतील. कोणत्याही शिक्षक संघटनेचे सदस्यत्व स्वीकारू नये. गैरशैक्षणिक कामाशिवाय ड्यूटी असणार नाही. सामाजिक कामात योगदान देऊ शकतात.
> कोणताही शेतकरी बोअरद्वारे शेतीला पाणी देणार नाही. 314 विहिरी आहेत. पिकाला जास्त पाणी देण्यावर बंधन.
> शेतकरी आपली जमीन बाहेरच्या व्यक्तीला विकू शकत नाही.
> आपल्या शेतातील झाड कापण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक आहे.
> दर महिन्याच्या खर्चाचा हिशेब सार्वजनिक