आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर: आता दहावीच्या परीक्षांवर बहिष्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मुख्याध्यापकांच्या वेतनश्रेणीबाबत न्यायालयाचा निकाल येऊनही शासन उदासीन आहे. वेतनश्रेणी व इतर प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास दहावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

शासन, संस्थाचालक व समाज या सर्व घटकांचा योग्य समन्वय साधून मुख्याध्यापक विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षकांना बरोबर घेऊन ज्ञानदानाचे काम करतो. मात्र, शासनाला याची जाणीव नाही. मुख्याध्यापकांच्या वेतणश्रेणीबाबत न्यायालयाचा निकाल येऊनही शासन वेळकाढूपणा करत आहे. हा निर्णय तातडीने न घेतल्यास दहावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकून कोणताही मुख्याध्यापक केंद्रसंचालक पद स्वीकारणार नाही. सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे वेळ बदलून शाळा सकाळी भरवाव्यात, शालेय पोषण आहार कोरड्या स्वरूपात देण्याचे आदेश द्यावेत, उच्च माध्यमिक विद्यालयांचा ‘कायम’ शब्द वगळून प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मूल्यांकनाच्या जाचक अटी रद्द करून अनुदान द्यावे, सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेत्तर अनुदान द्यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांना निवेदन देऊन मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, कोषाध्यक्ष बाळासाहेब वाकचौरे, उपाध्यक्ष मिथुन डोंगरे, संध्या कुलकर्णी, एस. एस. बांगर, ए. आर. काळे, डी. ए. बारड आदी मुख्याध्यापक उपस्थित होते.