आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२७ डेंग्यूसदृश रुग्ण झाले बरे , साथीच्या आजाराने अनेक नागरिक त्रस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पावसाळ्या पूर्वीची कामे वेळेत पूर्ण झाल्याने शहराच्या विविध भागात साथीचे आजार पसरले आहेत. डेंग्यूसह कावीळ, टायफाॅइड, मलेरिया, गॅस्ट्रो यासारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. आठ दिवसांपूर्वी बुरूडगाव येथे डेंग्यूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. शहरातही तब्बल १२७ डेंग्यूसदृश रुग्णांपैकी नऊजणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. तथापि, हे सर्व रुग्ण आता बरे झाले असून महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ठोस उपाययोजना सुरू असल्याची आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी मंगळवारी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

मागील दोन वर्षे शहरात डेंग्यू कावीळ या आजारांनी थैमान घातले होते. यंदा मात्र ही परिस्थिती आटोक्यात आहे. जानेवारीपासून अातापर्यंत शहरात केवळ १२७ डेंग्यसदृश रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेत तपासणी केली असता नऊजणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले. हे सर्व रुग्ण आता पूर्णपणे बरे झाले असून परिस्थिती आटोक्यात आहे. दोन वर्षांपूर्वी शहरात कावीळ झालेल्या रुग्णांची संख्या पाचशेपेक्षा अधिक होती. त्यापाठोपाठ डेंग्यूचीदेखील मोठी साथ पसरली होती. यंदा मात्र मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने साथीचे आजार रोखण्यासाठी योग्य नियोजन केले आहे. धूर फवारणीसह साथीचे आजार झालेल्या रुग्णांचा सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे. नवीन आढळलेल्या डेंग्यूसदृश रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. धूर फवारणी कीटकनाशक फवारणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या लवकरच वाढवण्यात येणार आहे. जुलै महिना डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणून पाळण्यात येणार आहे.

नवीन डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढणार नाही, यासाठी आरोग्य विभाग यंदा प्रथमच वेळेत दक्ष झाला आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता, तोकडी यंत्रणा, अधिकारी पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाला नेहमीच नागरिकांच्या टीकेला तोंड द्यावे लागते. यंदा या विभागाने ठोस उपाययोजना हाती घेतल्याने साथीच्या अाजारांची परिस्थिती आटोक्यात आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे वेळेत पूर्ण झाल्याने या विभागाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. एक-दोन पावसांतच शहराच्या विविध भागात पाण्याची डबकी साचली आहेत. पाण्याचा निचरा झाला नाही, तर मात्र साथीचे अाजार शहरात झपाट्याने पसरण्याची शक्यता आहे.

अशी घ्या काळजी
>एडीस नावाचा डास चावल्याने होतो डेंग्यू.
>एडीस डास दिवसा चावतो.
>स्वच्छ साठलेल्या पाण्यात आढळतात एडीसची अंडी.
>घर भोवतालचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा.
>आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा.
>घरातील पाण्याचे साठे पूर्णपणे कोरडे करा
>घरातील सांडपाणी उघड्यावर सोडू नका.
>निरुपयोगी वस्तू घर परिसरात ठेवू नका.
>घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा.
>मच्छरदाणी डास प्रतिबंधक औषधे वापरा.
घराचा परिसर स्वच्छ ठेवा
नगर शहरात डेंग्यूसह इतर साथीचे आजार पसरणार नाहीत, यासाठी महापालिकेच्या वतीने उपाययोजना सुरू आहेत. मागील सहा महिन्यांत जे डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले होते, ते पूर्णपणे बरे झाले आहेत. नवीन डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या नाममात्र आहे. पुढचा महिना डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या गच्चीवर इतर ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. डॉ.अनिल बोरगे,
बातम्या आणखी आहेत...