आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजासाठी जमली तेरा लाखांची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिक्षक समाज घडवतो, तर शेतकरी समाजाला जगवतो. हे दोन वर्ग समाजाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. अनियमित पावसामुळे नापिकी, कर्जबाजारी वाढली. समाजाचा पोशिंदा शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग पत्करू लागला. हे विदारक चित्र पाहून समाज शिक्षकवर्गही हेलावला. कर्ता माणूस गमावलेल्या शेतकरी कुटुंबाला मदत केली पाहिजे, असे शिक्षकांना वाटले. सुरुवातीला किमान लाख रुपये जमवण्याचे उद्दिष्ट ठरले. पण माणुसकी अन् सामाजिक जाणिवा जिवंत असलेल्या जिल्ह्यात आठवडाभरातच १३ लाख रुपये जमा झाले. मदतीचा हा ओघ अजूनही सुरू आहे.

प्राथमिक शिक्षक संघटनेतील गुरुकुल मंडळाचे नेते लेखक संजय कळमकर यांनी ही कल्पना मांडून त्यासाठी पुढाकार घेतला. प्राथमिक शिक्षक बँकेतर्फे शिक्षकांना सुमारे २५.७८ लाखांचा लाभांश वितरित केला जाणार होता. कळमकर यांनी हा लाभांश आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटंुबीयांसाठी द्यावा, असा प्रस्ताव सर्वच मंडळांपुढे व्यक्त केला. पण त्यातून श्रेयाचे राजकारण होईल, असे कारण पुढे करत काहीजणांनी नाकं मुरडली. मग कळमकर यांनी गुरुकुल मंडळ प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने हा उपक्रम यशस्वी करण्याचा विडा उचलला. सप्टेंबरपासून या विधायक उपक्रमाला सुरुवात झाली.

प्रत्यक्ष उपक्रम सुरू झाल्यानंतर त्याला शिक्षकांचा (विशेषत: महिला) भरभरून प्रतिसाद मिळाला. "व्हॉट्सअॅप'सारख्या सोशल माध्यमाची मदत घेण्यात आली. एकाच हाकेला प्रतिसाद मिळाल्यामुळे अवघ्या आठवडाभरातच तब्बल ११ लाख रुपये जमा झाले. "सोशल अॅप'द्वारेही सकारात्मक चळवळ उभी राहू शकते, हेही यानिमित्ताने दिसून आले. तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांमधील शिक्षकांनी ५०० रुपयांपासून २१ हजार रुपयांपर्यंत मदत दिली आहे. शिक्षकांचा आदर्श घेत प्राथमिक शाळांचे काही विद्यार्थीही बळीराजाच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. काहींनी तर खाऊचे, तर काहींनी वाढदिवसाचे पैसे दिले आहेत.

गुरुकुल मंडळाचे पदाधिकारी रा. या. औटी, संतोष भोपे, अनिल आंधळे, संजय धामणे, नितीन काकडे, रघुनाथ लबडे, राजेंद्र ठाणगे यांनी या उपक्रमासाठी स्वत:ला झोकून दिले आहे. तालुकावार दौरे करुन शिक्षकांना मदतीचे आवाहन केले जात आहे. शिवाय रोजच्या रोज गोळा होत असलेल्या मदतीचा हिशेबही त्याच दिवशी जाहीर केला जात आहे. त्यामुळे या उपक्रमात पारदर्शकता दिसून येत आहे.
सध्या "व्हॉट्सअॅप'द्वारे केलेल्या आवाहनामुळेच ही मदत गोळा झाली आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत जाऊन सर्व शिक्षकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले जाईल. हाच उपक्रम प्राथमिक शिक्षक समिती राज्यभरात राबवणार आहे, असेही कळमकर यांनी सांगितले.

मदत थेट गरजूंच्या हातात
शिक्षकांनीगोळा केलेली मदत मुख्यमंत्री निधीत जमा होणार नाही. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची शासकीय आकडेवारी गोळा करुन कुटुंबीयांची माहिती घेऊन थेट कुटुंबीयांच्या हातात मदतीचे धनादेश दिले जातील. मान्यवरांच्या हस्ते जाहीर कार्यक्रमात ही मदत वितरीत केली जाईल. त्यामुळे आपण देऊ करत असलेली मदत थेट शेतकरी कुटुंबीयांच्या हातात मिळणार आहे, याचे समाधान शिक्षकांना आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मदतीचा ओघ वाढत आहे. आपण देत असलेली मदत गरजूपर्यंत पोचेल का, अशी शंका अनेकांना येते. त्यामुळे या पारदर्शक उपक्रमाचे कौतुक होत आहे.

आमचाही खारीचा वाटा...
मदतीसाठीशिक्षकांनी कंबर कसली, हे समजल्यानंतर काही विद्यार्थ्यांनीही खारीचा वाटा उचलला. नगर तालुक्यातील आदित्य स्वप्निल बोरुडे नेवासे तालुक्यातील भैरवी संतोष भामरे या दोन विद्यार्थ्यांनी स्वत:च्या वाढदिवसाचा डामडौल टाळला. त्याऐवजी शेतकऱ्यांना मदत द्या, असा बालहट्ट त्यांनी पालकांकडे धरला. पालकांनी वाढदिवसाच्या खर्चाची रक्कम दिली आहे. शेवगाव तालुक्यातील माळवाडीच्या विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे मदतीसाठी दिले. बालवयातच भूतदया जपणाऱ्या या चिमुकल्यांची मदत स्वीकारताना कळमकर यांचे डोळेही पाणावले.

मलाही मदत करू द्या...
कळमकरत्यांचे सहकारी नेवासे दौऱ्यावर गळनिंब गावात गेले. तेथे काही शिक्षकांशी या उपक्रमाबद्दल चर्चा सुरू होती. शेजारी एक अल्पभूधारक शेतकरी बसलेला होता. त्यानेही मला तुमच्या उपक्रमात सहभागी करून घ्या, असा आग्रह धरला. मीसुद्धा शेतकरी आहे. पावसाच्या भरवशावर बसून पेरलेले बी वाया गेले. शेतीचा काहीच भरवसा उरलेला नाही. तुम्ही शिक्षक लोकं आमच्यासाठी एवढं करता, मग मलाही काहीतरी मदत करू द्या, असे म्हणत त्या शेतकऱ्याने कोपरीच्या खिशातून दोनशे पन्नास रुपये काढून मदतीसाठी शिक्षकांच्या हातात दिले.

आत्मिक समाधान हवे
नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे या संवेदनशील कलावंतांनी मोठे काम उभे केले आहे. नगर जिल्ह्याचा भूमिपुत्र अजिंक्य रहाणे यानेही लाखांची मदत दिली. अभिनेता अक्षय कुमारने शेतकऱ्यांना ९० लाखांची मदत दिली. प्राथमिक शिक्षकही मागे नाहीत, हे नगरने दाखवून दिले. शेतकरी दु:खी असताना शिक्षक सुखी राहू शकत नाही. आपल्या मदतीने कुणाचे तरी आयुष्य उभे राहणार असेल, तर त्यातून आत्मिक समाधान मिळते. संजय कळमकर, प्राथमिक शिक्षक समिती.