आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 138 Candidates And 32 Million Voters, News In Marathi

138 उमेदवारांचे भवितव्य 32 लाख मतदारांच्या हाती, दोन माजी मंत्र्यांसह दहा विद्यमान आमदारांची प्रतिष्ठा पणाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांतील 138 उमेदवारांचे भवितव्य बुधवारी (15 ऑक्टोबर) 32 लाख 30 हजार मतदार ठरवणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत चौरंगी व पंचरंगी लढती होत आहेत. काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांसह दहा विद्यमान आमदारांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. त्यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीचा जाहीर प्रचार सोमवारी (13 ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजता थांबला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठी व प्रचारफे-या यावर जोर देत शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे यांच्यासह दहा विद्यमान आमदार पुन्हा आपले भवितव्य अजमावत आहेत. मतदानाची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.
अशा आहेत लढती

अकोले : अशोक भांगरे (भाजप), मधुकर तळपाडे (शिवसेना), वैभव पिचड (राष्ट्रवादी), सतीश भांगरे (काँग्रेस), नामदेव भांगरे (माकप). संगमनेर : बाळासाहेब थोरात (काँग्रेस), आबासाहेब थोरात (राष्ट्रवादी), जनार्दन आहेर (शिवसेना), प्रकाश आहेर (बसप), राजेश चौधरी (भाजप). शिर्डी : अभय शेळके (शिवसेना), राजेंद्र गोंदकर (भाजप), राधाकृष्ण विखे (काँग्रेस), शेखर बोऱ्हाडे (राष्ट्रवादी). कोपरगाव : आशुतोष काळे (शिवसेना), नितीन औताडे (काँग्रेस), स्नेहलता कोल्हे (भाजप), अशोक गायकवाड (राष्ट्रवादी). श्रीरामपूर : लहू कानडे (शिवसेना), भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस), सुनीता गायकवाड (राष्ट्रवादी), भाऊसाहेब वाकचौरे (भाजप). नेवासे : शंकरराव गडाख (राष्ट्रवादी), बाळासाहेब मुरकुटे (भाजप), दिलीप वाकचौरे (काँग्रेस), दिलीप मोटे (मनसे) व साहेबराव घाडगे (शिवसेना) शेवगाव-पाथर्डी : मोनिका राजळे (भाजप), चंद्रशेखर घुले (राष्ट्रवादी), अजय रक्ताटे (काँग्रेस), देविदास खेडकर (मनसे), बाबासाहेब ढाकणे (शिवसेना). राहुरी - अमोल जाधव (काँग्रेस), उषा तनपुरे (शिवसेना), शिवाजी कर्डिले (भाजप), शिवाजी गाडे (काँग्रेस). पारनेर : िवजय आैटी (शिवसेना), शिवाजी जाधव (काँग्रेस), बाबासाहेब तांबे (भाजप), मोहनराव रांधवन (मनसे), सुजित झावरे (राष्ट्रवादी). नगर : अनिल राठोड (िशवसेना), अभय आगरकर (भाजप), सत्यजित तांबे (काँग्रेस), संग्राम जगताप (राष्ट्रवादी). श्रीगोंदे : शशिकांत गाडे (शिवसेना), राहुल जगताप (राष्ट्रवादी), बबनराव पाचपुते
(भाजप), हेमंत ओगले (काँग्रेस). कर्जत-जामखेड : राम शिंदे (भाजप), प्रा. किरण ठोंबे (काँग्रेस), रमेश खाडे (शिवसेना), जयसिंग फाळके (राष्ट्रवादी).
प्रमुख लढत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप यांच्यात असली, तरी शेवगाव, नेवासे व पारनेर या तीन मतदारसंघांत मनसेने उमेदवार उभे करून या पक्षांच्या उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे.

11 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील
जिल्ह्यातील 11 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील व 42 केंद्रे संवेदशील आहेत. या मतदान केंद्रांवर सूक्ष्म निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर शहरातील माळीवाडा (177) मतदान केंद्राचा अतिसंवेदनशील मतदान केंद्रात समावेश आहे. मंगळवारी दुपारी सर्व मतदान यंत्रे मतदारसंघांमध्ये दाखल झाली.

जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, मतदान, मतमोजणी व दिवाळी या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी 11 ते 25 ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. शस्त्रे, काठ्या, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडा अगर लाठया या वस्तू ‍बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे किंवा तयार करणे, जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजवणे, आवेशपूर्ण भाषण करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे, सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ, तसेच अन्य कारणास्तव सभा घेणे, मिरवणुका काढणे व पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास जिल्हा प्रशासनातर्फे मनाई करण्यात आली आहे.