आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 दिवसांत 146 तास पाणी बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-नगरच्या एमआयडीसीत गेल्या दीड महिन्यात एकूण 146 तास पाणीपुरवठा बंद होता, अशी धक्कादायक माहिती एका उद्योजकाने दिली. पाण्याशिवाय उद्योग कसे चालवायचे, असा उद्योजकांचा सवाल आहे. लाखोंची पाणीपट्टी भरूनही उद्योजकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.


कोणत्याही विकासासाठी पाणी, रस्ता, वीज या तीन मूलभूत गोष्टी आवश्यक असतात. उद्योगांच्या वाढीसाठी या तीनही बाबी जीवनावश्यक वस्तूंइतक्याच आवश्यक आहेत. औद्योगिक विकास महामंडळाने वरील तिन्ही सुविधांच्या बाबतीत नगरकरांवर अन्यायच केला आहे. एकतर अदूरदृष्टीच्या व स्वार्थी नेत्यांमुळे एमआयडीसीच्या विस्तारात अडचणी निर्माण झाल्या आहेत. मोठा उद्योग नगरमध्ये येत नाही. त्यातही नगरमध्ये कसेबसे टिकून असलेल्या उद्योगांनाही येथे अस्तित्व टिकवणे अवघड झाले असल्याची प्रतिक्रिया उद्योजक हरजितसिंग वधवा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.


गेल्या 7 डिसेंबरपासून 21 जानेवारीपर्यंत एमआयडीसीत 132.8 तास पाणीपुरवठा बंद होता. या काळात उद्योग काही तास बंद ठेवण्याची वेळ अनेक उद्योजकांवर आली. एका मोठय़ा उद्योगात 21 तारखेला कामगारांसाठी असलेली स्वच्छतागृहे बंद ठेवावी लागली. कारण सोमवारी रात्री सव्वा अकराला पाणीपुरवठा बंद झाला, तो थेट 22 ला सकाळी साडेसात वाजता सुरू झाला. याबद्दल उद्योजकांनी चौकशी केली असता, जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा बंद असल्याचे सांगण्यात आले. इतके मोठे काम करायचे होते, तर पाणीपुरवठा बंद करण्याबाबतची सूचना उद्योजकांना का दिली नाही, असा त्यांचा सवाल आहे.

नगरच्या एमआयडीसीत एल अँड टी, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, इंडियन सीमलेस, सन फार्मा, इटॉन, किलरेस्कर असे आठशे ते दोन हजार कर्मचारी असलेले मोठे उद्योग आहेत. या उद्योगांत 24 तास पाणीपुरवठा बंद असणे म्हणजे अक्षरश: गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. एमआयडीसीला पाणीपुरवठा करणार्‍या वाहिन्या 40 वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यामुळे त्या सतत फुटतात. मुळा धरणात एमआयडीसीसाठी 21 दशलक्ष घनमीटर पाणी राखून ठेवण्यात आले आहे. एवढे प्रचंड पाणी असतानाही उपसा यंत्रणेअभावी उद्योजकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे, अशी माहिती उद्योजक मोहोळे यांनी दिली.

विकासाचे रुतले गाडे

नगर एमआयडीसीत सातत्याने पाणीपुरवठा खंडित होत असल्यामुळे कामगारांना पिण्याचे पाणी उपलब्ध करणे उद्योजकांना अवघड होत आहे. त्यामुळे परिसरात हिरवाई फुलवण्याचा ते विचारही करू शकत नाही.

अधिकारी भेटत नाहीत..

अडचणींच्या वेळी एमआयडीसीतील उपअभियंता वाय. सी. सुतार भेटत नाहीत, अशा तक्रारी काही उद्योजकांनी केली. त्यांच्या कार्यालयात दूरध्वनी केला असता, ते बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मोबाइलवर अनेकदा संपर्क साधूनही त्यांनी उचलला नाही. एसएमएस केला, पण त्याचेही त्यांनी उत्तर दिले नाही.

दुहेरी फटका

उद्योजक लाखोंचे पाणीबिल भरतात. मात्र, अनेकदा कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी बंद केले जाते. त्यामुळे धावपळ करून उत्पादन सुरू ठेवण्यासाठी टँकरचे पाणी घ्यावे लागते. टँकरमालक व एमआयडीसीचे अधिकारी यांचे संगनमत असल्याचा संशयही काही उद्योजकांनी व्यक्त केला. अनेकदा टँकरही वेळेत मिळत नाही.

बोअरची परवानगी नाही

उद्योजकांना कूपनलिका घेण्यास परवानगी नाही. यामागे कोणतेही संयुक्तिक कारण नाही. केवळ एमआयडीसीच्या कृपेसाठी उद्योजकांनी लाचार राहावे म्हणून हा नियम केल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. एमआयडीसीच्या अधिकार्‍यांची दहशतही एवढी आहे, की बहुसंख्य उद्योजक नावानिशी बोलण्यास घाबरतात.

जलवाहिनी बदलण्यासाठी निधी मिळेना

मुख्य अभियंत्यांनी दोन वर्षांपूर्वी आठशे मीटर जलवाहिन्या उपलब्ध करून दिल्या. सहा महिन्यांत या जलवाहिन्या बदलण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. परंतु एमआयडीसीच्या आर्थिक उत्पन्नावर राज्य सरकार अक्षरश: डल्ला मारत आहे. त्यामुळे एमआयडीसीकडे कायमच निधीची कमतरता असल्याचे कारण सांगितले जाते. कोट्यवधींचा महसूल मिळत असताना जलवाहिन्या बदलण्याचे काम रखडले आहे. ’’ प्रमोद मोहोळे, उद्योजक.

नवीन अधिकारी आल्याने समस्या

सध्याची जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे उद्योजकांच्या बैठकांत अनेकदा सांगण्यात आले. चार किलोमीटर जलवाहिनी बदलण्याचे काम तातडीने करण्यात येईल, असे गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीत सांगण्यात आले होते. मात्र, तसे घडले नाही. उद्योजकांना ऐन दुष्काळी परिस्थितीत पाण्याची अडचण आली नव्हती. आता पाणी मुबलक असतानाही पुरवठा सारखा बंद पडणे, म्हणजे यंत्रणेचा नाकर्तेपणाच आहे.’’ हरजितसिंग वधवा, उद्योजक