आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"अमृत'मधून नगरसाठी, १४९ कोटी रुपये मंजूर- पाणी योजना आणि सौरऊर्जा प्रकल्प साकारणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापौर अभिषेक कळमकर यांनी आपल्या अवघ्या दहा महिन्यांच्या कार्यकाळात शहरासाठी तब्बल १४९ कोटींचा निधी मिळवून दिला. केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत हा निधी मिळाला असून त्यासाठी महापौर मागील काही महिन्यांपासून पाठपुरावा करत होते. पाणी योजनेची कामे, सौरऊर्जा प्रकल्प, उद्याने, तसेच भुयारी गटारसारखी महत्त्वाची कामे या निधीतून मार्गी लागणार आहेत.
महापौर कळमकर यांनी जून २०१५ मध्ये महापौर पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी केंद्र शासनाच्या अमृत योजनेत शहराचा समावेश होण्यासाठी प्रयत्न केले. नोव्हेंबर २०१५ मध्ये अमृत योजनेसाठी प्रस्ताव तयार करून त्यास महासभेची मंजुरी घेतली. प्रस्तावास शासनाची मंजुरी घेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. शहरासाठी प्रथमच तब्बल १४९ कोटींचा निधी मंजूर झाला. याकामी आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्य मिळाले.
शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेनंतर (फेज टू) शहराला प्रथमच एवढा मोठा निधी मिळाला आहे. या निधीतून सौरऊर्जासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येणार आहे. शहराला पिण्याचे पाणी देण्यासाठी महापालिकेला दरवर्षी तब्बल १७ कोटी वीजबिल भरावे लागते. अमृत योजनेंतर्गत मिळालेल्या निधीतून महापालिका सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. त्यातून महापालिकेचा विजेचा प्रश्न सुटणार आहे. पाणी योजनेची इतर कामे, उद्याने, तसेच भुयारी गटारसारखी महत्त्वाची कामे या निधीतून मार्गी लागणार आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने अमृत योजनेंतर्गत १४२ कोटी ४७ लाखांच्या निधीला तांत्रिक मान्यता दिली होती. परंतु महापौर कळमकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यावर आठ कोटी रूपयांचा अधिक निधी उपलब्ध झाला. त्यातून पाणी योजनेवरील उद््भवाच्या ठिकाणचे जॅकवेल, पाणी योजनेचे बळकटीकरण सुधारीकरणाची कामे होणार आहेत. शहराला प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात निधी मिळाला. त्यातून शहराची विकासाकडे वाटचाल होण्यास मोठी मदत होणार आहे. महापौर कळमकर यांनी अल्पावधीत शासनाकडून एवढा मोठा निधी आणल्याने त्यांचे सर्व क्षेत्रांतून कौतुक होत आहे.
शहराचा विकास महत्त्वाचा
कमीकार्यकाळात शहरासाठी एवढा मोठा निधी मिळवता आला, याचे समाधान आहे. महापौरपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासूनच शहर विकासासाठी प्रयत्न केले. अमृत योजनेंतर्गत मिळालेल्या निधीतून शहराची वाटचाल निश्चितच विकासाकडे होणार आहे. आमदार संग्राम जगताप यांनी वेळोवेळी सहकार्य केले. उर्वरित कार्यकाळातही शहर विकासाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू राहतील.'' अभिषेक कळमकर, महापौर.
"मूलभूत'चे ४० कोटीही आणले
शासनानेशहरातील मूलभूत सोयी- सुविधांसाठी २० कोटी रूपयांचा निधी दिला होता. महापालिकेने स्वहिस्सा म्हणून तेवढाच निधी टाकत ४० कोटींच्या निधीला विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळवली होती. परंतु विरोधकांनी राज्यातील सत्तेचा गैरफायदा घेत या निधीला स्थगिती आणली होती. महापौर कळमकर यांनी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ही स्थगिती हटवली. "मूलभूत'चे ४० अमृतचे १४९ कोटी असा एकूण १८९ कोटींचा निधी महापौर कळमकर यांनी आपल्या कार्यकाळात शहराला मिळवून दिला.

उद्यानांसाठी प्रकल्प अहवाल
अमृत योजनेंतर्गत मिळालेल्या निधीतून शहर उपनगरांमध्ये उद्याने उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. उद्यान प्रकल्पांचे प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. शहरासह उपनगरांमध्येही उद्यान प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार असल्याचे महापौर कळमकर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...