आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलमगीर जळितकांड प्रकरणी 15 जणांवर गुन्हा, जळितकांडाचे कारण अजून गुलदस्त्यातच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नागर देवळे ग्रामपंचायतमधील आलमगीर येथे मंगळवारी रात्री १० च्या सुमारास एका घराला लागलेल्या आगीत पतीपत्नी गंभीर भाजले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, उपचार घेत असलेल्या जखमी रुक्सार उर्फ गुरिया अजहर शेख (२५) हिच्या जबाबवरून भिंगार पोलिसांनी सादिक शेख, जुबेर सय्यद, आजम खान (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. ही आग कोणत्या उद्देशाने लावण्यात आली, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. 
 
आलमगीर येथे वास्तव्यास असलेला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अजहर मंजुर शेख (वय ३०) याच्या राहत्या घरात मंगळवारी रात्री १० सुमारास अचानक सादिक शेख, जुबेर सय्यद, आजम खान यांच्यासह १५ जणांनी प्रवेश केला. या सर्वांनी घरात पेट्रोल टाकून आग लावल्याचा जबाब आगीत जखमी झालेल्या रुक्साना हिने पोलिसांना दिला. त्यानुसार भिंगार पोलिसांनी या सर्वांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अजहरच्या तीन मजली घरातील पहिला मजला पूर्णपणे जळून खाक झाला. या आगीत अजहर त्याची पत्नी रुक्साना गंभीर भाजले. शेजारीच असलेल्या नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. पतीपत्नींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, घरात झालेल्या स्फोटाचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अग्निशमन दलासह बॉम्ब शोधक पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, भिंगार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक कैलास देशमाने यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. बुधवारी सकाळी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. पेट्रोल रॉकेलमुळेच घराला आग लागली, तीन मजली घरातून धूर बाहेर पडण्यास कोणताच मार्ग नव्हता. त्यामुळे घरात गॅस तयार होऊन काचेची खिडकी फुटून स्फोटासारखा मोठा आवाज झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, ही आग कोणत्या उद्देशाने लावण्यात आली, याचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. पुढील तपास भिंगार पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक कैलास देशमाने करत आहेत. 
 
मोहरमला झाली घरावर दगडफेक 
मोहरमच्यादिवशी (१ आक्टोबर) अजहरच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक केली असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. तसेच सादिक शेख, जुबेर सय्यद, आजम खान अजहर यांच्यात वाद झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिव्य मराठीला दिली. मात्र, अजहर याची पार्श्वभूमी मुळातच गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्यामुळे या अग्नीकांडाशी अजहरचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिस करत आहेत. 
 
चौकशी नंतरच गुन्हे दाखल करा 
अग्नीकांडात जखमी झालेल्या अजहरचा पोलिसांनी जबाब नोंदवला, त्यात त्याने शहरातील दहा ते बारा प्रतिष्ठीत नागरिकांची नावे घेत त्यांनीच घराला आग लावल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिस अधीक्षक शर्मा यांची भेट घेऊन त्यांना अजहरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची आठवण करून दिली. जोपर्यंत सखोल चौकशी होत नाही, ताेपर्यंत अजहरने नावे घेतलेल्या कोणत्याच नागरिकांवर गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणी या नागरिकांनी शर्मा यांच्याकडे केली. 
बातम्या आणखी आहेत...