नगर - नगर-कल्याण पुणे-मनमाड महामार्ग बाह्यवळण रस्त्याद्वारे जेथे एकत्र येतात, त्या चौकात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सहा महिन्यांत येथे किमान १५ जणांना प्राण गमवावे लागले. मंगळवारी बुधवारीही दोन अपघात होऊन चारजण जखमी झाले. त्यामुळे तेथे गतिरोधक आणि सर्कल उभारण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
रस्त्याची मजबुती डांबरीकरणाचे काम झाल्याने बाह्यवळण रस्त्यावरून वाहतूक वाढली आहे. नगर-कल्याण पुणे-मनमाड महामार्ग जेथे एकत्र येतात, तेथे अतिशय धोकादायक असा चौक तयार झाला आहे. या चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढे चौक असल्याचा कोणताही फलक कोणत्याच दिशेला लावलेला नाही. त्यामुळे आता चांगल्या झालेल्या रस्त्यावरून वाहने वेगात चौकात येतात.
चौकात येताना वाहनावर नियंत्रण ठेवणे अवघड होत असल्याने अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्वही आले आहे. या चौकात कोठेही पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत. झेब्रा क्रॉसिंगचे, तर नावही नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना जीव मुठीत ठेवूनच रस्ता ओलांडावा लागतो.
याबाबत परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला, तरी अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. उलट तुम्हीच जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत पाठपुरावा करण्याचा सल्ला त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देत आहेत. इतर ठिकाणी मात्र हेच अधिकारी बेकायदा गतिरोधक उभारण्यात आघाडीवर असतात. गतिरोधक उभारताना त्यांनी कोणताही महामार्ग सोडलेला नाही. कल्याण महामार्गावर शक्य नसेल, तर किमान चौकाच्या बाजूला बाह्यवळण रस्त्यावर सरकारी निकषांत बसणारे गतिरोधक उभारावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
बाह्यवळण रस्ता राज्य महामार्गांचा नगर-कल्याण हा राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे तेथे गतिरोधक उभारणे अशक्य आहे. परंतु या चौकात येण्याआधी तशा सूचनांचे फलक लावणे शक्य आहे. तसेच चौकात सर्कल उभारून वाहनांचा वेग कमी करणेही शक्य आहे. किमान या चौकात वाहतूक सिग्नल लावले, तरी अपघातांवर नियंत्रण ठेवता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
पुढील दहा दिवसांत याबाबत उपाययोजना झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा गोरख डागवाले, सतीश होळकर, माधवराव होळकर, अशोक बलाटे, बबन जपकर, राजू मोहिते, वाल्मिक खालमे, सुनील तुपे, अरुण होले, भाऊ कळमकर, बाळासाहेब होळकर, बबनराव सानप, नवनाथ भांबरे, श्याम गडाख, सोनू गायके, विजय गडाख, बाबासाहेब होळकर आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.
हद्दीच्या वादात अपघातग्रस्तांचे हाल
याचौकात एमआयडीसी, कोतवाली नगर तालुका या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दी भिडलेल्या आहेत. त्यामुळे अपघात झाल्यास तो कोणत्या हद्दीत झाला, याबद्दल नेहमी वाद उदभवतो. त्यामुळे पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी अपघातग्रस्तांचे मोठे हाल होतात. अनेकदा जखमींना पोलिस ठाण्यांच्या हद्दीच्या वादात वेळेत मदत मिळाल्याने प्राण गमवावे लागले आहेत. पोलिसांनी अशा वेळी माणुसकीची भूमिका घ्यावी, असे आवाहन नागरिकांनी केले आहे.
रस्ता झाला; पुढे काय?
बाह्यवळणरस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने मध्यंतरी सर्व वाहतूक शहरातून होत होती. आता हा रस्ता अतिशय चांगला झाला आहे. त्याबद्दल वाहन चालकांत आनंद असला, तरी सुरक्षिततेच्या काहीही उपाययोजना नसल्याने अपघातांत वाढ होत आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होत आहे. ही वाहने वेगात चौकात येत आहेत. ती चौकात येण्याआधी तेथे गतिरोधक किंवा सिग्नलची गरज आहे. शिवाय या चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी, अशी परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे.